Saturday, February 20, 2010

निर्लज्ज बेटांची नगरी

विठाबाईने साठीच नाही तर सत्तरीही ओलांडलीय. चालताना काठीचा आधार लागतो. कंबरही वाकलीय. गेल्या काही काळापासून डोळे पाणेजत असल्याची तक्रारही त्या करतात. आवाजात थरथर आहेच. आयुष्याची कातरवेळ झालीय पण म्हणून काही भाकरीचा चंद्र आपोआप उगवत नाही. जन्मापासून पाचवीला पुजलेल्या मोलमजुरीचा सूर्यास्त अजूनही दिसत नाही. विठाबाईला एकुलता एक पोरगा आहे पण त्याचं स्वत:चं बिऱ्हाड एवढं मोठं की रानबादा गेल्यानंतरही त्या त्याच्याकडे गेल्या नाहीत. उलट दुकानाला गेल्या तर नातरूंडं पोतरूंडांसाठी गोळ्या बिस्किटं आणायला त्या विसरत नाहीत. विठाबाईची चूल जशी मोलमजुरीवर चालली तसं रानबादाचं आयुष्य अर्ध्या गावची जनावरं राखण्यात गेलं. रानबादा गेल्याचं कळलं त्यावेळेस ते जनावराच्या पाठीमागेच होते आणि विठाबाई रोजंदारीवर. मी ज्या ज्या वेळी विठाबाईला पाहतो त्यावेळेस वाटतं, स्वातंत्र्याची साठी झाली पण आपण अजूनही अशी व्यवस्था का निर्माण करू शकलो नाही ज्यात विठाबाई काय किंवा रानबादा काय, दोघांचं आयुष्य सोपं झालं असतं. कातरवेळेतही संधीप्रकाश दिसला असता. डोळे मिणमिणले नसते. मी तीन वर्ष हैदराबादमध्ये राहिलो. आता दोन तीन वर्षापासून मुंबईत आहे. त्या अगोदर पुण्यात आणि दिल्लीतही राहिलो. दरम्यानच्या काळात काही पार्टीज पाहिल्या.काही वाढदिवसाच्या होत्या तर काही सेलिब्रेशनच्या. विक्रांत नावाच्या मुलाला मी याच काळात कित्येक वेळेस भेटलोय. त्याच्या घरी गाड्यांचे शो रूमस् आणि त्याचे वडील आर्म्स डीलर असल्याचं कळालं. त्याच्या एका पार्टीचा खर्च कमीत कमी 25 हजारापेक्षा जास्त असायचा. अशा पार्ट्या तो महिन्यातून चार पाच तरी करायचा. कदाचित जास्त पण कमी नाही. तेही हे सगळं विद्यार्थी असताना. मी कम्युनिस्ट नाही. संपत्तीप्रमाणे दारिद्र्याचंही समान वाटप झालं पाहिजे अशा विचारांचा नाही. उलट एका व्यक्तीला भरपूर काम मिळालयला हवं आणि तेवढेच पैसे कमवण्याची संधी आणि उधळण्याचीही. पण या देशात विक्रांतला जो पैसा मिळाला किंवा मिळतो तशी संधी इतरांना मिळते काय? तशी व्यवस्था निर्माण होईल यासाठी काही तरी प्रयत्न झाले काय? आमच्या पंचायत समितीचा सदस्य आहे. पाच एक वर्षापूर्वी या महाशयाचे बसच्या तिकीटाचे वांदे. निवडून आला तेही घोळ करून. आज पाच वर्षानंतर त्याची स्थिती अगदी ‘भक्कम’ आहे. म्हणजे स्वत:साठी स्कॉर्पिओ गाडी, काही महिन्यांपूर्वी ती बदलून नवी आली. दोन्ही मुलांसाठी बाजारात ‘लेटेस्ट’ आलेल्या दुचाकी, मोबाईल वगैरे तर चिल्लर. शिवाय काही आश्रम शाळा. काही इयत्ता शिकलेली बायको मुख्याध्यापक तेही घरीच बसून. पाठीमागच्या भेटीत असेच भेटले तर त्यांनीच चौकशी केली. ते म्हणाले, कुठे राहतोस? मी म्हणालो, नवी मुंबईत, नेरूळला.... ते म्हणाले, मीही अधून मधून येतो मुंबईत ताजला थांबतो. मी काहीच बोललो नाही. कारण प्रश्नाचं उत्तर अस्वस्थ करणारं आहे. असं काय कार्य केलं की आमच्या पंचायत समिती सदस्याचा पाच वर्षात कायापालट झाला? बसच्या तिकीटाचे वांदे असणारा चक्क ताजमध्ये राहायला लागला? पंचायत समिती सदस्याचा विकास म्हणजे आजच्या राजकारणाचं प्रातिनिधीक चित्रं नाही का? नसेल तर तीन चार महिने मंत्री जनतेच्या पैशावर कसं काय फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये राहू शकतात? एस.एम. कृष्णासारखे मंत्री म्हणतात, आम्ही वैयक्तिक खर्चातून राहिलोत. पण तो पैसाही कुठून आला? शशी थरूरसारखे मंत्री तर त्याही पुढे जाऊन म्हणतात, इकॉनॉमी क्लास म्हणजे जनावरांचा कोंडवाडा. म्हणजे इकॉनॉमी क्लासनं प्रवास करणारे जनावरं आहेत काय? तुम्ही आम्ही तर एसटीच्या लाल डब्यातून प्रवास करतो, त्याला शशी थरूर काय म्हणतील.... जनावरांच्या पार पार पलिकडले... आमच्या मराठी साहित्यात तर शब्दच नाही कदाचित पण थरूरांच्या इंग्रजी साहित्यात असावा... सोनिया काय किंवा प्रणव मुखर्जी काय, आता कुणी रेल्वेतून जातंय तर कुणी इकॉनॉमी क्लासनं... पण याला एवढा उशीर का लावला गेला? बरं सोनिया गांधींनी कमी पैशातून प्रवास केला तर विठाबाईला त्याचा फायदा होईल अशी व्यवस्था होणार आहे का? की इकडे खर्च कमी आणि तिकडे भरती. काय उपयोग होईल काटकसरीचा? मला गेल्या काही काळात राहून राहून एक प्रसंग आठवतोय. तो आहे गुंथर ग्रास यांचा. ग्रास हे जगप्रसिद्ध जर्मन लेखक. 1997 ला ते भारतात आले. कोलकात्त्याच्या झोपडपट्टीत राहिले. भारतावर काही पुस्तकही त्यांनी लिहिली. त्याच वर्षी देश स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव साजरा करत होता. एवढा मोठा लेखक भारतात आहे आणि त्याला निमंत्रण नाही असं कसं होईल. वाजपेयींनी त्यांना 15 ऑगस्टच्या कार्यक्रमात पाहुणे म्हणून बोलवलं. पण ग्रास काही आले नाहीत. सगळ्यांना आश्चर्य वाटलं. माध्यमांनीही विचारपूस केली. पण ग्रास काही बोलले नाहीत. शेवटी भारत सोडून जाताना ग्रास जे बोलले ते अस्वस्थ करणारं आहे. ते म्हणाले, भारतात दैन्य आणि दारिद्र्याचा महासागर आहे आणि त्याच महासागरात एका रात्रीला लाखो करोडो रूपये खर्च करणारे निर्लज्ज बेटही आहे. बेटांचा आणि महासागराचा संबंध क्षणोक्षणीचा, पण भारत हा असा एक अतर्क्य देश आहे. जिथे या दोन्हीचा कधीच संबंध येत नाही. पुढच्याच वर्षी म्हणजे 1998 ला ग्रास यांना साहित्याचं नोबेल मिळालं. पण ज्यांच्याबद्दल ग्रास यांनी लिहिलं त्या विठाबाईसारख्या लाखो, करोडो जणांना काय मिळालंय? ते कशाच्या आशेवर जगतायत? आणि कशाच्या आशेवर जगावं....?

No comments:

Post a Comment