मी नेमाडेंची कोसला वाचली त्यावेळेस पंचवीशीत होतो. लातूरला शाहू कॉलेजला ग्रॅज्युएशन करत होतो. आमच्या वक्तृत्व मंडळाची जबाबदारी त्यावेळेस ‘धुळपेरणी’चे लेखक शेषराव मोहितेंकडे होती. खरं तर अनेक चांगल्या पुस्तकांची ओळख मला त्यांच्यामुळेच झाली. कोसलाही त्यापैकीच एक. कोसला देताना ते म्हणाले, ‘एक तर कोसला वाचून तिला डोक्यावर घेऊन नाचणारे आहेत किंवा तिला कचऱ्यात फेकणारे. बघ तुझं काय होतं.’ मी कोसला बद्दल ऐकलेलं होतं. आणि बहुतांश जण कोसला डोक्यावर घेऊन नाचणारेच भेटलेले होते. त्यामुळे आपण कचऱ्यात फेकणाऱ्यांच्या पंगतीत असू नये असं ओझंही जाणवलं. त्याकाळात मी झपाटल्यासारखा वाचायचो. म्हणजे एकदा पुस्तक हातात पडलं तर ते संपवल्याशिवाय दुसरं काहीच करायचं नाही. मग कॉलेजलाही दांडी. एक दिवस जावो की आठवडा. पुस्तक संपलं तरच दुसऱ्या कामांना सुरुवात. विश्वास पाटलांची हजार पानांची महानायक मी अशीच संपवलेली. त्या पाचही दिवसात मी हॉस्टेलची रूम सोडलेली नव्हती. कोसलाबद्दल तर मी अधिक उत्सुक होतो.
पुस्तक असो की फिल्मस् किंवा एखादा टीव्ही प्रोग्राम. माझी दोनच मतं असतात. एक तर ती ‘भारी’ असतात किंवा टाकाऊ. एकदा वाचण्यासारखी किंवा एकदा पाहण्यासारखी असं मला कधी म्हणता येत नाही.. मी तसं म्हणत नाही. असं म्हणणाऱ्यांना नेमकी त्यांचीच चव कळलेली नसते किंवा ते संभ्रमित असतात असा माझा अनुभव. कोसला हातात आली त्यावेळेसही मी याच मताचा होतो. मला नक्की आठवतं,कोसला वाचायला घेतली त्यावेळेस लातूरमध्ये भरपूर पाऊस पडत होता. त्यामुळे हॉस्टेलच्या भोवती तळं साचलेलं होतं. रूमवर जाताना कोसला पाण्यात पडता पडता राहिलेली. हॉस्टेल म्हणजे पन्नास एक खोल्यांचं हॉस्टेल. सर्वात वरच्या मजल्यावर सर्व दादा लोक राहायचे. जिथं एका खोलीत तीन जण राहू शकायचे तिथं दादा मंडळींनी स्वतंत्र खोली लाटलेली. त्यातल्या सर्वात शेवटच्या कोपऱ्यातली खोली माझी. रूम नंबर ३३.
पुढचे दोन दिवस तरी रूम नंबर ३३ ला मी मुक्कामी होतो. मेसवाल्याला डब्बा रूमबाहेरच ठेवून जायला सांगितलं, कुठली वक्तृत्त्व स्पर्धा आली तरी जायचं नाही हे निश्चित केलं. आणि कोसला उघडली. त्यावेळेस ढगाळ वातावरणामुळे नेमके किती वाजलेत याचा अंदाज यायचा नाही. माझ्या रूमच्या खिडकीच्याबाहेर एक पिंपळाची फांदी फुटलेली होती. त्यावर पावसाच्या पाण्याचा रपरप आवाज यायचा. त्यामुळे पाऊस सुरु आहे की बंद हे बघण्यासाठी खिडकी उघडी ठेवायची गरज नव्हती. त्याच खिडकीला लागून कॉट होती. जिथं मी कोसलाची सुरुवात केली. पुस्तक आवडेल की नाही याचा अंदाज बांधायची माझी पहिली पट्टी म्हणजे तिचं पहिलं पान. म्हणजे पुस्तक आई वडिलांना अर्पण वगैरे केलं असेल तर ते नक्की दुय्यम दर्जाचं. कोसला शंभरातील नव्व्याण्णवास अर्पण केलीय. पुढच्या पानावर कुठल्या तरी तिबेटीयन ओळी छापलेल्या. त्या अजुनही समजलेल्या नाहीत. त्या समजून घेण्याच्या प्रयत्नात न पडता पुढे सुरु ठेवलं.
कोसलाची सुरुवात आवडली. मी पांडुरंग सांगवीकर. आज उदाहरणार्थ अमक्या अमक्या वर्षाचा आहे वगैरे. कोसला हे काही मी वाचलेलं पहिलं पुस्तक नाही. त्याअगोदर वि.स.खांडेकर,वपु काळे, ना.सी.फडके असं उठता बसता नाव घेतले जाणारे लेखक वाचलेले होते. एवढच नाही तर सुहास शिरवळकर,बाबा कदम या मराठीतल्या सिडने शेल्डनचीही पुस्तकेही वाचलेली. खांडेकर,फडकेंच्या कादंबऱ्या म्हणजे जोहर,सुरज बडजात्याच्या फिल्मसच. खांडेकरांच्या कादंबऱ्यातलं २० -२० पानांचं वर्णन वाचून विलक्षण आश्चर्य वाटायचं. पण, नंतर कॉलेजच्या शब्दगंध मध्ये असं लिहिणारे आमच्याच वर्गात भरपूर सापडले. मग मात्र खांडेकर,फडके कधी उडाले कळालच नाही. त्या पार्श्वभूमीवर कोसलाची सुरुवात एकदम वास्तववादी वाटली. त्यातल्या त्यात पांडुरंग सांगवीकर हे नाव एकदम जवळचं वाटणारं. आमच्या गावातूनही असे अनेक पांडुंरग गावाबाहेर पडलेले त्यामुळेही असेल कदाचित. खरं तर मी त्यांच्यापैकीच एक. सुरुवातीच्या पानांवर पहिल्या उताऱ्यात आलेलं वगैरे वगैरे थोडंसं खटकलं पण ते कधी मागे पडलं कळालं नाही. बाहेर जसं अंधारून येत राहिलं तसं कोसलातली पानंही मागे पडत गेली. कधी तरी रात्री पोटात खड्डा पडला त्यावेळेस कोसला बाजूला सारली आणि डब्बा काढला. जेवत असताना खरं तर कोसलावरच लक्ष अधिक. जेवण संपेपर्यंत वाचलेली अख्खी कोसला रिपीट होतेय असं वाटलं. एक गोष्ट प्रकर्षानं जाणवली, कोसलाला भयंकर स्पीड आहे. कोसलात कुठंच वर्णन नाही की एखादं पात्रं उभं करण्याचा प्रयत्न केलेला नाही. पात्रं अशी काही भेटतात की दादरच्या मोठ्या दादऱ्यावर रात्री पिक अवरला माणसं मुंग्यांसारखी येऊन आदळतात तशी. काही क्षणांपूर्वी आपल्याला नेमकं कोण भेटलं? असा प्रश्न पडावा आणि पुढच्याच क्षणी आता कोण भेटणार असं दचकून उभं राहावं तसं. आणि तरीही काही पात्रं पुन्हा पुन्हा भेटतात ते डोक्यावर वेगवेगळे ढग घेऊन. कोसला आपली होते ती इथंच.
कोसला कधी संपली हे कळलं नाही. पण तिला संपायला दोन दिवस लागले नाहीत. दुसऱ्या दिवशी कधी तरी ती दुपारी संपली. बाहेर पावसाळी वातावरण असल्यानं तिची सुरुवात आणि शेवट एकाच बिंदूत जाणवतो. पण कोसला संपल्यानंतर माझं काय झालं? मुंग्यांनी वारूळ करावं तसं माझ्या आयुष्यात कोसलातल्या पात्रांनी वारूळ केलं. मी कुणालाही एक शब्द न बोलता त्या दिवशी शहरभर फिरून आलो. पावसाची सुरु असलेली भूरभूर जाड होत गेली. रस्त्यावरच्या लोकांमध्ये कोसलातली पात्रं दिसायला लागली. आणि स्वत:च्या जीवनातली काही माणसं अधिक भयाण झाली.
माझी आजी होती. आईची आई. ती गेली त्यावेळेस बिलकुलच रडलो नाही. म्हणजे डोळ्यात पाणीच आलं नाही. याचा अर्थ असा नाही की ती मला आवडायची नाही. उलट तिच्या चेहऱ्यावरच्या रेषा पाहिल्या की तिनं जगलेल्या आयुष्याची धग जाणवायची. पण अडगळीत पडलेल्या जीवाबद्दल कुणाला काय वाटणार..मी पोटात होतो त्यावेळेस माझे आजोबा गेले. त्यानंतर आजीनंच पाचही मुलींचं सगळं केलं. आजोबा गेले म्हणजे त्यांचा काही नैसर्गिक मृत्यू झाला नाही. भजन कीर्तन करणाऱ्या या माणसानं भर दुपारी गावाच्या पाठीमागच्या विहिरीत कंबरेला दगड बांधून उडी घेतली. संध्याकाळी कधीतरी त्यांचं प्रेत सापडलं. तेव्हापासून गावकऱ्यांनी ती विहीर टाकली आणि आजीही अडगळीत पडली ती कायमचीच. पण कोसला वाचल्यानंतरच ही धग अधिक गडद झाली. का? त्याला कारण आहे ती कोसलाची मनी. मनी भेटते ती कोसलाच्या मध्यावर. म्हणजे पांडुरंग सांगवीकरचे कॉलेजचे प्रताप अनुभवल्यानंतर.
कुठलंही कथानक त्याच वेळेस टिकतं ज्यावेळेस ते पुढं काय? याची उत्सुकता निर्माण करतं. मनी भेटते ती अशाच एका वळणावर. नेमाडे ग्रेट ठरतात ते इथंच. मनीचा मृत्यू हाच कोसलाचा आत्मा आहे. मनी, तिचं जीवन आणि तिचा मृत्यू याचं वर्णन कोसलात ज्या पद्धतीनं आलंय एवढा जिवंत मृत्यू ना वाचण्यात आलाय ना पाहण्यात, ना ऐकण्यात. मनी गेल्यानंतर नेमाडेंनी एक वाक्य टाकलंय ते वाक्य अल्बर्ट कामुच्या outsider मधल्या mother died today. or, may be yesterday. i can't be sure. या वाक्याएवढंच किंवा त्यापेक्षाही जास्त चिरंतन आहे. कोसलातलं ते वाक्य असं. मनी गेली आणि तिच्यासोबत तिचं इवलसं गर्भाशयही. तिनं खानेसुमारीची मोठीच ओळ वाचवली. या प्रसंगानंतर कोसला जी उंची गाठते ती शेवटपर्यंत सोडत नाही. पुढच्या प्रत्येक प्रसंगात कोसलात घडतो तो फक्त साक्षात्कार. कोसलाची जशी सुरुवात आहे तसाच क्लास क्लायमॅक्स आहे आणि शेवटही. पण कुठेही कोसला नाटकी नाही ना जाणीवपूर्वक पेरलेला शेवट नाही. गिरीधर जो कोसलातून गायब झालाय त्याचा शोध मी अजुनही का घेतोय? मनीचा मृत्यू माझ्या अंगावर शहारे का आणतो? रात्री अपरात्री ती माझा पिच्छा का पुरवते?. गिरीधरसारखी माणसं आपल्याही आयुष्यात आहेत. जी चूक पांडुरंगनं केली ती आपल्याही हातून कधी घडेल याची भीती का वाटत राहते? पांडुरंगला न दिसलेला दिवा आपल्याला दिसेलच याची काय खात्री? पांडुरंग म्हणतो तसं आपापली वर्षे वगैरे उरलेलीच असतात, वाया वगैरे गेली हे साफ खोटं. तर मग आपला मृत्यू काय आहे? मला वाटतं मी थांबलेलं बरं. कोसला तुम्ही वाचलेली बरी. जगलेली बरी.
Sunday, June 27, 2010
Subscribe to:
Posts (Atom)