आग्य्राच्या गल्लीबोळातून रिक्षा जायला लागली की या बोळाच्या शेवटी कुठे तरी जगातली सर्वोत्तम सौंदर्याची वास्तू उभी आहे, यावर विश्वास बसत नाही. एक छोटासा रस्ता आणि त्याच्या दोन्ही बाजूला दुकानांची प्रचंड गर्दी. रिक्षावाला अशा काही कसरत करत असतो, की जणू प्रत्येकाला खो देत असावा. सोमनाथाच्या मंदिराकडे जाणारा रस्ताही त्याला अपवाद नाही. फरक फक्त एवढाच की इथे रस्ता मोठा आहे आणि ज्या परिसरातून तो आपल्याला घेऊन येतो तो नारळाच्या दुतर्फा झाडांनी भरून गेलेला. कोकण पाहिलेले असेल तर सोमनाथाचा परिसर पाहताना त्याची आठवण होतेच. घनदाट झाडी इथे नाही पण सपाट काळ्या मातीवरची नारळाची झाडे बघताना नजर स्थिरावत नाही. जसा कोकणात हापूस तशी या भागात केसर आंब्यांची आंबराई लगडून गेलेली. आपण देवाच्या भूमीत आहोत याची प्रचिती यायला पुरेशी.
सोमनाथ म्हणजे गुजरातचे दक्षिण टोक. बारा ज्योर्तिलिंगांपैकी आद्य. आश्चर्य म्हणजे सोमनाथ नावाचे शहर असे काही नाही. वेरावळ नावाचे शहर, त्यातला प्रमुख भाग प्रभास पाटण. त्यात सोमनाथाचे भव्य मंदिर. गर्भगृह, सभामंडप, नृत्यमंडप आणि त्यावर दीडशे फूट उंच शिखर. घोंगावणा-या अरबी समुद्राच्या लाटांवर सोमनाथ पाहताना भान हरपते. फक्त सौराष्ट्रच नाही तर जगभरातून लोक इथे येतात. मी पोहोचलो मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात. मुंबईतून सौराष्ट्र मेल सुटते रात्री साडेआठला. वेरावळला पोहोचते दुस-या दिवशी दुपारी चार वाजता.
वीस एक तासांचा प्रवास. पण मी सरळ सोमनाथला नाही गेलो. सौराष्ट्र मेल राजकोटला विभागली जाते. त्यातली एक गाडी वेरावळला, तर दुसरी जुनागडला जाते. जुनागड म्हणजे जगप्रसिद्ध गिरनार टेकड्यांचे शहर. गुजरातचे सर्वात उंच शिखरही गिरनारच. टेकड्यांवर हिंदू आणि जैन मंदिरे आहेत. ती पाहण्यासाठी दहा हजार पाय-या चढून जाव्या लागतात. मी राजकोटवरून जुनागड गाठले आणि तिथून सोमनाथ. सोमनाथाला आलो ते देवावर श्रद्धा वगैरे म्हणून नाही, तर एखादे मंदिर सहा वेळा लुटले जाते आणि तेवढ्याच वेळा ते पुन्हा बांधले जाते; असे काय आहे या जागेत, ते पाहण्यासाठी. वाटले की सोमनाथाचे मंदिर कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरासारखे असेल. काळ्या पाषाणात कोरलेले; पण प्रत्यक्ष डोळ्यांसमोर उभे होते ते लाल दगडातले नवे कोरे चकचकीत मंदिर. त्यामुळे परळी वैजनाथ किंवा औंढा नागनाथाच्या मंदिरात गेल्यानंतर जे काहीसे नॉस्टॅल्जिक व्हायला होते ते इथे नाही. पण एखादे मंदिर कसे ठेवावे याचा उत्कृष्ट नमुना म्हणजे सोमनाथ. कुठेही अस्वच्छता नाही. सातव्यांदा मंदिर उभारायला घेतले ते सरदार पटेलांनी. १९५१ मध्ये. अजूनही काही काम सुरूच. पण मी शोधत होतो ते मोहंमद गझनीने लुटलेले सोमनाथाचे श्रीमंत मंदिर. त्याच्या अगोदर तीन वेळेस मंदिर लुटले, पण आपल्या लक्षात राहिला तो गझनीच. पण जुन्या मंदिराचे अवशेष आता कुठे असणार? ते आहेत फक्त फोटोत. विशेष म्हणजे सोमनाथाची श्रीमंती १७ वेळेस लुटली, त्याचा कुठेही उल्लेख मंदिर परिसरात नाही. अगदी गझनीचाही नाही.
आणखी एक ठळक गोष्ट. सोमनाथाला आलेले मराठी लोक. रस्त्यावरच्या किलोमीटरच्या पाट्या मराठीतही कशा, याचे उत्तर मिळते ते इथे. अर्धेअधिक तर मराठीच. मराठी लोक फारसे मुशाफिरी करत नाहीत या समजाला छेद देणारे दृश्य. रात्री अकराला गिरनारच्या टेकड्यांवर चढाई करण्याच्या तयारीत असलेले पन्नास एक मराठी लोक भेटले, त्या वेळेस तर अटकेपार झेंडा फडकतोय असेच वाटले. सोमनाथही त्याला अपवाद नाही. विशेष म्हणजे औरंगजेबाने सोमनाथ उद्ध्वस्त केले ते १७०१ मध्ये. त्यानंतर त्याचा जीर्णोद्धार केला अहिल्याबाई होळकरांनी. १७८५ मध्ये. ते मंदिर अजूनही आहे आणि त्याच्या प्रवेशद्वारावर शुद्ध मराठीत त्याचा उल्लेखही करण्यात आलाय; पण सोमनाथाला जायलाच का हवे? फक्त एक कारण पुरेसे आहे. मंदिर परिसरात समुद्राच्या बाजूला एक बाण दाखवण्यात आलाय. त्याच्या खाली लिहिले आहे साउथ पोल. दक्षिण ध्रुव.
अबाधित समुद्र मार्ग. त्याला तीर्थस्तंभ म्हटले जाते. मी चौकशी केली तर कळले की, या दिशेने सरळ गेले तर जमिनीच्या कुठल्याही अडथळ्याशिवाय आपण दक्षिण ध्रुवावर पोहोचू. दक्षिण ध्रुवाला सर्वाधिक जवळची भूमी म्हणजे सोमनाथ. ९९४६ कि.मी. मी सोमनाथाच्या शेजारी असलेल्या लाटांच्या बघताक्षणी प्रेमात पडलेलो. पण आता त्या लाटा मी पुन्हा पाहून घेतल्या. मला या भूमीचे प्रचंड अप्रूप वाटले. ती पहिली व्यक्ती कोण असेल जी या मार्गाने गेली असेल? मी त्या व्यक्तीला शोधत राहिलो. शोधत जाऊ म्हणजे सापडत जाईल.
Monday, July 4, 2011
साऊथ पोल,सोमनाथ!
Subscribe to:
Posts (Atom)