Tuesday, February 23, 2010

हजारो ख्वाहिशें ऐसी..

दोन बातम्या माझ्या डोक्यातून जात नाहीयत. एक आहे विश्वविक्रमी उसेन बोल्टची आणि दुसरी विनोद कांबळीची. कोण किती ग्रेट आहे आणि कोण किती नशीबवान यात मला फारसा रस नाही. पण एका व्यक्तीला कुठली गोष्ट जिंकत ठेवते आणि एका व्यक्तीकडे जिंकण्याची सर्व साम्रगी असतानाही तो पराभूत कसा काय होतो याची मला मोठी उत्सुकता आहे.
उसेन बोल्ट म्हटलं की कष्ट आणि कष्ट आणि विनोदी कांबळी म्हटलं की नशीब, नियती असे शब्द वापरले जातात. खरं तर विजेत्याला एका चौकटीत आणि पराभूत झालेल्याला दुसऱ्या चौकटीत टाकून आपण मोकळे होतो. पण म्हणून काही जय पराजयाचं भयानक वास्तव बदलत नाही. श्वास करपणं आणि श्वास श्रीमंत होणं हे त्यातलंच.
विनोद कांबळी क्रिकेटमधून निवृत्त झाला. खरं तर तो शेवटचा कधी खेळला हेच आठवणं कठीण. त्यामुळे त्याच्या निवृत्तीला महत्व शून्य. लक्षात राहिल असा तो खेळला त्याला दीड दशक उलटून गेलंय. उजवा पाय किंचितसा वर घेऊन हूक मारणार डावखुरा विनोद, डोळ्याच्या बाहुलीवर जशास तसा कोरला गेलाय. मी आता तिशीचा आहे आणि माझ्या विशीत ज्या क्रिकेटर्सच्या प्रेमात पब्लिक पागल होती त्यात कांबळी सर्वात वरचा. सचिनपेक्षाही तो अधिक भावलेला. विनोदला क्रिकेटची देणगी होतीच, याबद्दल शंकाच नाही. पण प्रॅक्टीससाठी लोकलच्या दुसऱ्या वर्गातून प्रवास करणारा विनोद अधिक जवळचा झाला. त्याच्या दिसण्यातलं “गल्ली”पण असेल किंवा त्याच्या नावातला कांबळी शब्द. त्यामुळे तो श्रीमंतांच्या क्रिकेटमध्ये “आपला” जरा लवकरच झाला. क्रिकेटवर अधिराज्य गाजवण्यासाठी खेळाची सर्वकाही देणगी मिळाली असतानाही विनोद अपयशी का ठरला?
यश आणि अपयश यात एका बाराखडीचं अंतर. “अ”. इंग्रजीत दोन. म्हणजे SUCCESS आणि UNSUCCESS मधे “UN”. सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी यांच्यातलं यश-अपयश या एका बाराखडीत सामावलंय. पण एकाचं आयुष्य Larger than life आणि दुसऱ्याचं आयुष्य “Small things of god”
माझ्यापेक्षा तुम्ही सचिन किंवा कांबळीबद्दल अधिक वाचलं असेल किंवा ऐकलं असेल. पण ऐकीव हे शेवटी ऐकीवच. ते वास्तवाच्या जवळ असतं पण वास्तव नसतं. त्यामुळे सचिन-कांबळीबद्दलच्या तुलनेत उणीवा राहिल्या तर त्या माझ्या. मी सचिनला भेटलेलो नाही पण कांबळीला भेटलोय. त्याच्याशी फार बोलणं झालंय असंही नाही पण काही काळ त्याचं निरीक्षण केलय. मी झी 24 तासला असतानाची गोष्ट. कांबळीचा आमच्याकडे शो होता. तो सकाळी चालायचा आणि सायंकाळीही. एक प्रसंग पुरेसा असतो महानतेची प्रचिती यायला. विनोद सकाळी लवकरच पोहोचायचा. स्टुडिओत खायला प्यायला परवानगी नसते. विनोदला त्याची किती तरी वेळेस कल्पना दिली पण तो काही बदलला नाही. अशा एक ना अनेक गोष्टी. शेवटी चॅनलनं विनोदलाच बदललं. विनोद बेशिस्त आहे का? याच बेशिस्तीनं विनोदला संपवलं का? माईक टायसनच्या कुळातला आहे विनोद?
सचिन आणि कांबळी दोघेही गाणी भरपूर ऐकायचे. दौऱ्यावर असतानाही. रात्री उशिरापर्यंत कांबळींच्या रूममध्ये आवाज यायचा. सचिनचा लवकरच थांबायचा. सचिन सकाळी प्रॅक्टीससाठी हजर असायचा तर कांबळीची दांडी. परिणाम आपल्यासमोर आहे. सचिन विक्रमादित्य तर विनोदला ओहोटी. विनोदच्या डोक्यात यशाची हवा गेली? सचिननं नवनवे विक्रम केले पण तो कायम भुकेला दिसला? विनोदची भूक लवकरच संपली? मध्यमवर्गीय मुलांना यश मिळालं की ते समाधानी होतात आणि कायमचे संपतात.
मोजता न येणारा पैसा खोऱ्यानं मिळतो. स्वप्नातल्या बायका प्रत्यक्षात अवतरतात, फार कमी मध्यमवर्गीय मुलं यातून सहीसलामत सुटतात, काही अडकतात? सचिन आणि विनोदचं वर्गीकरण या दोन्हीत करता येईल? अपयश अनाथ असतं आणि यशाला बाप अनेक. नऊ वेळेस कमबॅक करणाऱ्या विनोदलाही ही पट्टी लावता येईल?
शाहरूख खान असो की अमिर खान, हे काही शतकातले महान कलाकार नाहीत. पण आपल्या जवळ जे “एवढूसं” आहे ते कसं जपायचं आणि दाखवायचं त्याचं “एवढं” मोठं डोकं त्यांच्याकडे आहे. त्याच्या मुलाखती ऐकल्या की त्याची प्रचिती येतेच. विनोद कांबळीसारखी गुणी पोरं यात कमी पडतात का? प्रत्येक माणसाच्या आयुष्यात त्याच्या पातळीएवढी यशाची लाट येतेच, पण प्रत्येकाला ती समजतेच असं नाही. ज्यांना त्या लाटेवर स्वार होता येतं ते पुढच्या लाटेत फेकले जातात तर इतर पहिल्याच लाटेत गटांगळ्या खातात. Some survive better than others. विनोदबाबतही असच घडलं असावं का? या रांगेत विनोद एकटा आहे, असं म्हणावं की तुमच्या माझ्यासारखे कित्येक जण?
बोरीस बेकर आणि स्टेफी ग्राफ हे माझे आवडते टेनिसपटू. मला टेनिस फार कळत नाही पण बेकरच्या कारकिर्दीचा विनोद झाला तर स्टेफीच्या कारकिर्दीचा सचिन. विश्वास बसत नाही की स्टेफी आणि बेकर एकत्र प्रॅक्टीस करायचे. बेकरबाबत मी आजही काही वाचलं, ऐकलं की हळवा होतो रूखरूख लागते जशी विनोदबद्दल. पण त्यांच्या पराभवाचं काय? की यशाला चौकट बिकट काही नसते? तिला नसते नियती आणि कसलीच वासना? यश हे यश असतं. ना आघाती आणि ना अपघाती ? का यश अपयशाची तुलनाच फुटकळ, जिंकणारे जिंकतात हारणारे हारतात. काहींच्या नशीबात यश आणि यशच आणि काहींच्या नशीबात पराभवाचे फेरे?
पण असं म्हणून सगळी संकटं, माणसं अंगावर घेऊन जिंकणाऱ्या आयन रँडच्या रोअर्कवर किंवा गेल वायनँडवर आपण अन्याय तर करत नाहीत ना? उसेन बोल्ट, मायकल शूमाकर, रॉजर फेडररसारखे जगज्जेते यात मोडतात का? उसेन बोल्टनं तर वीज चमकवलीय. त्याच्याबद्दल वाचताना वाटलं, साल्यासोबत आपणही पळायला पाहिजे. काय हरकत आहे. आपण शेवटून पहिले येऊ फार तर. पण बोल्टच्या सोबत स्पर्धा केली हे काय कमी आहे?
काही पराभव यशापेक्षा किती तरी मोठे असतात. खरं तर सकाळी लवकर उठणंसुद्धा मला जमत नाही. पण काही तरी वाटणं हाच तर जिवंतपणा. असमाधानी असण्याची पहिली खूण. गालिबच्या शब्दात,
हजारो ख्वाहिशे ऐसी की हर ख्वाहिश पर दम निकले बहुत निकले मेरे अरमाँ फिर भी क्यूँ कम निकले.....
मला स्वत:ला असं वाटतं की माणूस एकदा हवं ते मिळवण्यात समाधानी झाला की तो संपला, हे बेसिक. बाकी इतर गोष्टी लढण्याच्या. अपयश येत नाही असं नाही पण “चल साले की बजाते है” म्हणण्याची हिंमत असलीच पाहिजे. तुम्हाला “गुलाल” मधला रणसा आठवतो. तो दहा वेळेस मार खातो पण अकराव्या वेळी मारण्याची हिंमत ठेवतो. तो एकदा म्हणतोही, देने गये थे, बना, पर लेने पडे पण म्हणून काही रणसाचं महत्व कमी होत नाही.
विनोदला जर निवृत्ती जाहीर करेपर्यंत असं वाटलं असेल की मिळाली संधी तर देऊ दणका तर तो ग्रेटच. तो रणसा. पण यातलं काहीच नसेल तर आयुष्य म्हणजे गाठोडं. न सुटलेलं. श्वास जड करणारं.

Saturday, February 20, 2010

animal farm

ही घटना गेल्या महिन्यातली. मी मुंबईहून हैदराबादला जात होतो. माझ्या बसमध्ये एक प्रवासी चढला. माझ्या बाजुच्याच रांगेत बरोबरीनं त्याचा नंबर आलेला. गाडीत चढला तेव्हापासूनच त्याची चुळबुळ चाललेली. उगीचच त्यांनं गाडीच्या क्लिनरला बोलण्याचा प्रयत्न केला. काही वेळानं त्याला काय हवं आहे ते कळलं. त्यानं गाडीच्या मधोमध खाली झोपायची परवानगी मागितली होती. क्लिनरनं त्याला पहिल्याच प्रयत्नात नकार दिला. त्याची चुळबुळ सुरुच होती. गाडीनं पुणं सोडलं त्यावेळेस रात्रीचे अकरा वाजलेले. त्यानं पुन्हा त्या क्लिनरला हटकलं. क्लिनरनं पुन्हा नकार दिला. शेवटी तो प्रवाशी वैतागून म्हणाला मी ‘सरकार’चा माणूस आहे, बघून घेईन. क्लिनरच्या चेह-यावरची रेषाही हलली नाही. मला मात्र त्या सरकारी माणसाची कीव आली. स्वतःची सरकारी ओळख देऊनही त्याच्या पदरी निराशाच आली होती. हा प्रसंग लक्षात राहण्यासाठी निमित्त घडलं होतं, दिल्लीतल्या घटनेचं... ही घटना होती एप्रिल महिन्यातली. माजी राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दूल कलाम कॉन्टिनेंटल एअरलाईन्सनं दिल्लीहून न्यूयॉर्कला जात होते. देशाचे माजी राष्ट्रपती असूनही त्यांच्यासोबत फारसा लवाजमा नाही. त्यामुळं, विमानाकडं जात असताना विमानाच्या चार कर्मचा-यांनी त्यांना वाटेतच थांबवलं. आणि त्यांची झडती सुरु केली. कलामांनी कसलाही विरोध न करता सर्व प्रक्रिया पुर्ण केली. सुरक्षा रक्षकांनी सांगितलं, बुट काढा तर त्यांनी तेही केलं. तेही आपल्या युनिक स्मितहास्यासह. त्या टिनपाट कर्मचा-यांपुढं आपला रुबाब गाजवावा असं त्यांना चुकूनही वाटलं नाही.... आणि तसाच हाही एक प्रसंग. हा प्रसंग लिओ टॉलस्टॉयबद्दलचा. नेमका कुठल्या रेल्वेस्थानकावरचा आहे हे नक्की माहित नाही. पण तो मॉस्कोतलाच असावा. टॉलस्टॉय त्यावेळेस रशियन सैन्यात कार्यरत होते. ते आपल्या काही सैनिकांची स्टेशनवर वाट पाहत होते. मॉस्कोत गोठवणारी थंडी असते त्यामुळे त्यांच्या अंगावरच्या कपड्यांमुळे कोण लष्करातले आणि कोण सर्वसामान्य हे काहीच कळत नव्हतं. एक बाई तिथं आली. तिला वाटलं, हा उभा असलेला गृहस्थ कुली आहे. तिनं टॉलस्टॉयला गाडीतलं सामान उतरायला सांगितलं. टॉलस्टॉय काही वेळ गोंधळले. पण त्यांनी पुढच्याच क्षणी त्या बाईचं सगळं सामान ऊतरवून दिलं. तितक्यात तिथं सैनिक आले आणि त्यांनी टॉलस्टॉयला सॅल्यूट ठोकला. त्या बाईला काही कळेच ना! हे सैनिक एका कुलीला का सॅल्यूट मारतायत? त्या बाईनं विचारल्यानंतर टॉलस्टॉयनं आपली ओळख करून दिली. त्या बाईचा विश्वासच बसेना. आपल्यासमोर सार्वकालीन महान कादंबरीकार उभा आहे. एवढच नाही तर त्यानं आपलं सामानही उतरवून दिलं. बाई खजिल झाल्या. त्यांनी टॉलस्टॉयची माफी मागण्याचा प्रयत्न केला. पण टॉलस्टॉयनेच त्यांचे आभार मानले, ते त्यांनी दिलेल्या कामाबद्दल. एवढच नाही तर कुलीला देणार होत्या ती रक्कमही टॉलस्टॉयनं स्विकारली. टॉलस्टॉय ग्रेट!ही घटना गेल्या काही दिवसातलीच. लालु प्रसाद यादव, शिवराज पाटील, मुलायमसिंग यादव, रामविलास पासवान अशा सत्तेत नसलेल्या लोकांची झेड दर्जाची सुरक्षा काढून घेण्याचा निर्णय सरकार घेत आहे, याचा सुगावा या मंडळींना लागला आणि त्यांनी अख्खी संसद डोक्यावर घेतली. आपल्या जीवाला कसा धोका आहे, याचे ढिगभर दाखले दिले. सरकारला इशारेही. या कसलाही धोका नसलेल्या नेत्यांच्या सुरक्षेसाठी सरकार दरवर्षी पाचशे कोटी रूपये खर्च करतं. काही राज्यातल्या शेतक-यांना जी कर्जमाफी दिलीय त्याच्या रकमेपेक्षा जास्त.ख-या-खोट्या प्रतिष्ठेसाठी देशामध्ये अशा अनेकविध प्रकारच्या घडामोडी घडत असताना अचानकपणे एक गोष्ट ध्यानात आली की, आपल्या देशात अशीही एक व्यक्ती आहे, ज्याची कधीही, कुठेही झडती घेतली जाऊ शकत नाही. विशेष म्हणजे, तो कधी या देशाचा पंतप्रधान नव्हता वा राष्ट्रपती. तो कधी सरन्यायधीशपदावरही राहिलेला नाही. एवढंच कशाला, ज्यांची कधीही झडती घेतली जाऊ शकत नाही अशा पदांची जी यादी भारत सरकारनं तयार केलीय, त्यापैकीही कुठल्या पदावर हे महाशय राहिलेले नाहीत. आणि तरीही त्याची झडती कुणीच घेत नाही घेऊ शकत नाही. तसा सरकारचाच फतवा आहे. ही व्यक्ती जवाहरलाल नेहरू यांचा पणतू जावई, इंदिरा गांधी यांचा नातजावई,राजीव आणि सोनिया गांधी यांचा जावई,राहुल गांधी यांचा मेहुणा आणि प्रियंका गांधी यांचा नवरोबा आहे. या महाशयाचं नांव रॉबर्ट वडेरा, वधेरा किंवा वड्रा... काहीही म्हणा. कारण याची ओळख त्याचं आडनाव नाहीच मुळी. या रॉबर्ट वडेराची कधीही, कुठेही झडती घेतली जाऊ शकत नाही, कारण तो गांधी घराण्याचा जावई आहे. त्यामुळे, या देशाच्या आजी-माजी राष्ट्रपतींना, पंतप्रधानांना, सरन्यायधीशांना जी ट्रीटमेंट विमानतळावर दिली जाते, तीच रॉबर्टलाही दिली जाते. याचा अर्थ, हे रॉबर्ट महाशय पंतप्रधान, सरन्यायधीश यांच्या इक्वल आहे. तुम्हाला जॉर्ज ऑरवेल आठवतो. ऑल आर इक्वल बट सम आर मोअर इक्वल.रॉबर्ट मोअर इक्वलमध्ये मोडतो. पाच प्रसंग वेगवेगळ्या लोकांचे. वेगवेगळ्या ठिकाणी घडलेले आणि वेगवेगळ्या उंचीच्या लोकांचे. पण यातच सामाजिक संघर्ष आहे, तक्रार आहे आणि हिंसाही. काही माणसं नेहमीच इतरांच्या ओळखीवर जगतात तर काही स्वतःची ओळख इतरांना देतात ज्या व्यक्तींची उंची मोठी आहे तो फळानं लगडलेल्या झाडासारखा असतो, तर काही माणसं बुटकी असतात. ती तशीच राहतात आणि दाखवतातही. सरकारी बाबू हा या बुटक्यांच्या जातकुळातला..., लालू, मुलायम ही मंडळी सत्तासाधनांवर ओळख टिकवणा-यांपैकी... रॉबर्ट वडेरा दुस-याच्या ओळखीवर जगणारा तर टॉलस्टॉय, कलाम दुस-यांना ओळख देणारे. आपण यापैकी नेमके कोण? किंवा कुणीही नाही! कलामांबाबत जे घडलं, त्यानं प्रत्येक सदविवेकी माणसाचा संतापच झाला असेल. पण त्यांनी ज्या शांतपणे झडती घेऊ दिली... त्यामागच्या हेतुचा विचार मनात आल्यावर मात्र संतापाची जागा जाणीवेनं घेतली. कलामांनी खरं तर एक चांगली सुरुवात केलीय, ती आपण का फॉलो करू नये? का या देशातल्या पदावर नसणा-या नेत्यांना, अधिका-यांना सामान्य माणसाप्रमाणेच वागणूक दिली जाऊ नये? या लोकांना आपण असं महत्व का द्यावं आणि कुणी देत असेल तर ते का खपवून घ्यावं? का सरकारी अधिका-यांना आणि नेत्यांना सांगू नये की आता बस्स.., खुप झालं! तुमचा उद्दामपणा आता खपवून घेतला जाणार नाही. रॉबर्ट वडेराचं असं काय कर्तृत्व आहे, ज्यामुळे त्याची झडती होत नाही तुमची आणि माझी होते? यासंदर्भात, नुसती बोलबच्चनगिरी करण्याऐवजी मी माझ्यापासून सुरुवात केलीय. कलामांची घटना घडल्यानंतर मला स्वत:लाही काही गोष्टी नव्यानं उमजल्या. सुरुवातीला मी ऑफिसमध्ये प्रवेश करत असताना सुरक्षा रक्षकांमुळे अवघडून जायचो. ओळखीचा झाल्यानं तेही मला कधी हटकत नाहीत. पण आजकाल मी स्वत:च आपले ओळखपत्र दाखवून ऑफिसात प्रवेश करतो. सुरक्षा आणि सुरक्षारक्षक माझ्या सुरक्षेसाठी आहेत, याची जाणीव ए. पी. जे. कलाम आणि टॉलस्टॉय यांच्या संस्कारांमुळे माझ्या मनाला झालेली आहे. काल थोडी गंमत झाली... ऑफिसच्या गेटमधून मी आत शिरत होतो, त्याच वेळेस तिथून लक फिल्मची हिरोईन आणि कमल हसन-सारिकाची मुलगी श्रुती हसन आत शिरत होती. सुरक्षारक्षकाकडं ढुंकनही न बघता. त्यांना धुडकावून, ती ऑफिसमध्ये सरळ आतपर्यंत निघून गेली. सुरक्षारक्षक तिच्याकडेच अवाक होऊन पाहतच राहिले.... हे थांबलं तरच जॉर्ज ऑरवेलचं वाक्य आपल्याला आठवावं लागणार नाही. खरं की नाही?

दीर्घ होऊ पाहाणारी कातरवेळ

देवळात दिवा लावण्याची वेळ झालेली. गुरं ढोरं घराकडे परतत होती. तेवढ्यात किसनबाबा गेल्याचं कुणी तरी सांगितलं आणि मावळू पाहणारी संध्याकाळ अचानक थांबली. गावकऱ्यांनी लगबगीनं त्यांच्या मुलाचा फोन नंबर शोधून फोन केला. आणि किसनबाबाच्या मुलींनाही सांगावा धाडला. किसनबाबांचा एकुलता एक मुलगा असतो परभणीत, आरोग्य अधिकारी म्हणून. किसनबाबा गेल्याचं त्याला गावकऱ्यांनी कळवलं तर आता उद्याच येतो. रात्रीचं तेवढं लक्ष ठेवा म्हणून त्यानं गावकऱ्यांना निरोप दिला. किसनबाबाच्या मुलाच्या निरोपानं गावकऱ्यांना धक्काच बसला. गावापासून परभणी अवघ्या दोन तासाच्या अंतरावर आहे. आणि येणं होत असतानाही किसनबाबाच्या मुलानं रात्रीचं येणं टाळलंय. मग काय दिवस मावळून गेलेला असल्यामुळे किसनबाबांची “माती” होऊ शकत नव्हती. त्यामुळे गावातल्या चार दोन मुलांसह साठीच्या पुढं असलेल्या किसनबाबाच्या मित्रांनीच त्यांच्या प्रेताचा रात्रभर सांभाळ केला. दुसऱ्या दिवशी सकाळी किसनबाबावर अंत्यसंस्कार झाले. किसनबाबा गेले पण त्यांना आयुष्यभर साथ देणाऱ्या बुकाबाईंचं आता काय होणार ?बुकाबाई आता घरी एकट्याच असतात. किसनबाबा होते त्यावेळेस त्या लादणीच्या दुसऱ्या मजल्यावर राहायच्या पण आता उतारवयात वर खाली जाणं होत नाही म्हणून त्यांनी आपलं बिढार लादणीच्या तळमजल्यावर मांडलंय. मुलगा कधी तरी येतो. किसनबाबा गेल्यानंतर बुकाबाईंना त्यांच्या मुलानं परभणीला नेलं, पण जीव रमत नाही म्हणत त्या काही महिन्यातच गावी परतल्या. आता त्या एकट्याच असतात आणि एकटेपण त्यांना खायला उठतं. अगोदर दिवाळी पंचमीला मुली यायच्या. मुलाबाळांनी घर भरून जायचं. दिवाळीचे दिवस कसे लख्ख असायचे. पण आता दिवस बदललेत. मुलींनाही नातवंडं झालीत त्यामुळे त्या आता येत नाहीत. मुलांच्या मुलांचेही लग्न झालीत. त्यामुळे तेही गावाकडे फिरकत नाहीत. पण बुकाबाईंचं वाट पाहणं संपत नाही. त्या आजही बायाबापड्यांमध्ये नातवंडं पोतरूंडांबाबत भरभरून बोलतात.बुकाबाई काय किंवा किसनबाबा काय यांच्यासोबत जे घडलंय. ते काही फक्त एका व्यक्तीबाबत घडलेलं नाही. स्वातंत्र्याच्या अगोदर किंवा नंतर जन्मलेल्या पिढीची आजची ही शोकांतिका आहे. उमेदीच्या काळात त्यांना कदाचित याची कल्पनाही नसेल की आयुष्याची कातरवेळ अशी नातवंडांच्या आठवणीत घालवावी लागेल. स्वातंत्र्यानंतर जन्मलेली पिढी शिकून सवरून मोठी झाली. नोकरी धंद्याला लागली आणि हळूहळू ती तिकडचीच झाली. तालुक्याच्या ठिकाणी किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी त्यांना जमेल तसं घरटी उभारली. त्यांच्याच वाडवडीलांनी म्हणजे किसनबाबाच्या पिढीनं स्वत:च्या मुलांना राहण्यासाठी गावाकडे वाडे बांधले. जमीनी खरेदी केल्या. त्यांच्या नावानं आंब्याची झाडेही लावली. या अपेक्षेनं की कधी तरी त्यांची पुढची पिढी गावात येईल, घरात रमेल आणि आपण पाणी देऊन वाढवलेल्या आंब्याचा रस चाखेल. ते घडलं नाही असं नाही, पण आता ते कायमचं थांबलय. गावाकडचे वाडे आता ओस पडलेत. बुकाबाईसारख्यांची संख्या जास्त झालीय. या गावात कुणी तरूण राहतो की नाही, अशी शंका यावी इतकी उतारवयातली माणसं गावात झालीत. गावातून एखादा वाटसरू गेला तर हे गावचं म्हातारं झालंय की काय असं वाटावं. नाही म्हणायला जे शिक्षक रिटायर होतात ते आता गावाकडे येतायत. पण त्यांचे लेकरं बाळं इकडं फिरकतच नाहीत. त्यामुळे गावात एकटं राहणाऱ्यांच्या संख्येत भर पडतेय. नुकतीच नोकरी सुटलेली असल्यानं नुसतं बसून राहणं जमत नाही. मग गेल्या वीसेक वर्षापासून पडीक असलेली वाडवडिलांची जमीन पुन्हा कसण्याचा प्रयत्न करतायत. पण पाहिजे तसं जमत नाही. उतारवयात चिडचिड झालीय. एक मात्र नेहमीचं. या सगळ्या मंडळींचा आता रिटायर्ड ग्रुप तयार झालाय. हा ग्रुप दुपारी पारावर जमतो. गावात पेपर आलेलाच असतो. तो सकाळी वाचलेला असतानाही दुपारच्या चर्चेसाठी आणला जातो. गावच्या सरपंचापासून ते अमेरिकेच्या ओबामांपर्यंत तसंच गावात तमाशात नाचलेल्या विठाबाईपासून ते ब्रिटनी स्पिअर्सपर्यंत सर्वच घडामोडींवर चर्चा होते. जमलंच तर पत्त्याच्या एखादा डाव मांडला जातो. संध्याकाळ झाली की गुरंढोरं परतली का नाही याची चाचपणी ही रिटायर मंडळी आवर्जून करतात. पार सोडताना त्याच पारावरच्या देवापुढे दिवा लावतात. आणि अशा वेळेस किसनबाबासारखं कुणी गेल्याचं कळालं की त्यांचं आयुष्य अचानक थिजल्यासारखं होतं. जीवनात निर्माण झालेला एकांतपणा अंगावर येतो. त्यात किसनबाबाच्या मुलाचा निरोप ऐकला की सगळ्या अंगाला बधिरता येते. घरात परतलं तर घरात असतो अर्धा अंधार आणि अर्धा ऊजेड कारण सगळं घरभरून दिवे लावावेत एवढी माणसंच कुठं असतात घरात ?फोटोग्राफी- माणिक मुंढे

निर्लज्ज बेटांची नगरी

विठाबाईने साठीच नाही तर सत्तरीही ओलांडलीय. चालताना काठीचा आधार लागतो. कंबरही वाकलीय. गेल्या काही काळापासून डोळे पाणेजत असल्याची तक्रारही त्या करतात. आवाजात थरथर आहेच. आयुष्याची कातरवेळ झालीय पण म्हणून काही भाकरीचा चंद्र आपोआप उगवत नाही. जन्मापासून पाचवीला पुजलेल्या मोलमजुरीचा सूर्यास्त अजूनही दिसत नाही. विठाबाईला एकुलता एक पोरगा आहे पण त्याचं स्वत:चं बिऱ्हाड एवढं मोठं की रानबादा गेल्यानंतरही त्या त्याच्याकडे गेल्या नाहीत. उलट दुकानाला गेल्या तर नातरूंडं पोतरूंडांसाठी गोळ्या बिस्किटं आणायला त्या विसरत नाहीत. विठाबाईची चूल जशी मोलमजुरीवर चालली तसं रानबादाचं आयुष्य अर्ध्या गावची जनावरं राखण्यात गेलं. रानबादा गेल्याचं कळलं त्यावेळेस ते जनावराच्या पाठीमागेच होते आणि विठाबाई रोजंदारीवर. मी ज्या ज्या वेळी विठाबाईला पाहतो त्यावेळेस वाटतं, स्वातंत्र्याची साठी झाली पण आपण अजूनही अशी व्यवस्था का निर्माण करू शकलो नाही ज्यात विठाबाई काय किंवा रानबादा काय, दोघांचं आयुष्य सोपं झालं असतं. कातरवेळेतही संधीप्रकाश दिसला असता. डोळे मिणमिणले नसते. मी तीन वर्ष हैदराबादमध्ये राहिलो. आता दोन तीन वर्षापासून मुंबईत आहे. त्या अगोदर पुण्यात आणि दिल्लीतही राहिलो. दरम्यानच्या काळात काही पार्टीज पाहिल्या.काही वाढदिवसाच्या होत्या तर काही सेलिब्रेशनच्या. विक्रांत नावाच्या मुलाला मी याच काळात कित्येक वेळेस भेटलोय. त्याच्या घरी गाड्यांचे शो रूमस् आणि त्याचे वडील आर्म्स डीलर असल्याचं कळालं. त्याच्या एका पार्टीचा खर्च कमीत कमी 25 हजारापेक्षा जास्त असायचा. अशा पार्ट्या तो महिन्यातून चार पाच तरी करायचा. कदाचित जास्त पण कमी नाही. तेही हे सगळं विद्यार्थी असताना. मी कम्युनिस्ट नाही. संपत्तीप्रमाणे दारिद्र्याचंही समान वाटप झालं पाहिजे अशा विचारांचा नाही. उलट एका व्यक्तीला भरपूर काम मिळालयला हवं आणि तेवढेच पैसे कमवण्याची संधी आणि उधळण्याचीही. पण या देशात विक्रांतला जो पैसा मिळाला किंवा मिळतो तशी संधी इतरांना मिळते काय? तशी व्यवस्था निर्माण होईल यासाठी काही तरी प्रयत्न झाले काय? आमच्या पंचायत समितीचा सदस्य आहे. पाच एक वर्षापूर्वी या महाशयाचे बसच्या तिकीटाचे वांदे. निवडून आला तेही घोळ करून. आज पाच वर्षानंतर त्याची स्थिती अगदी ‘भक्कम’ आहे. म्हणजे स्वत:साठी स्कॉर्पिओ गाडी, काही महिन्यांपूर्वी ती बदलून नवी आली. दोन्ही मुलांसाठी बाजारात ‘लेटेस्ट’ आलेल्या दुचाकी, मोबाईल वगैरे तर चिल्लर. शिवाय काही आश्रम शाळा. काही इयत्ता शिकलेली बायको मुख्याध्यापक तेही घरीच बसून. पाठीमागच्या भेटीत असेच भेटले तर त्यांनीच चौकशी केली. ते म्हणाले, कुठे राहतोस? मी म्हणालो, नवी मुंबईत, नेरूळला.... ते म्हणाले, मीही अधून मधून येतो मुंबईत ताजला थांबतो. मी काहीच बोललो नाही. कारण प्रश्नाचं उत्तर अस्वस्थ करणारं आहे. असं काय कार्य केलं की आमच्या पंचायत समिती सदस्याचा पाच वर्षात कायापालट झाला? बसच्या तिकीटाचे वांदे असणारा चक्क ताजमध्ये राहायला लागला? पंचायत समिती सदस्याचा विकास म्हणजे आजच्या राजकारणाचं प्रातिनिधीक चित्रं नाही का? नसेल तर तीन चार महिने मंत्री जनतेच्या पैशावर कसं काय फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये राहू शकतात? एस.एम. कृष्णासारखे मंत्री म्हणतात, आम्ही वैयक्तिक खर्चातून राहिलोत. पण तो पैसाही कुठून आला? शशी थरूरसारखे मंत्री तर त्याही पुढे जाऊन म्हणतात, इकॉनॉमी क्लास म्हणजे जनावरांचा कोंडवाडा. म्हणजे इकॉनॉमी क्लासनं प्रवास करणारे जनावरं आहेत काय? तुम्ही आम्ही तर एसटीच्या लाल डब्यातून प्रवास करतो, त्याला शशी थरूर काय म्हणतील.... जनावरांच्या पार पार पलिकडले... आमच्या मराठी साहित्यात तर शब्दच नाही कदाचित पण थरूरांच्या इंग्रजी साहित्यात असावा... सोनिया काय किंवा प्रणव मुखर्जी काय, आता कुणी रेल्वेतून जातंय तर कुणी इकॉनॉमी क्लासनं... पण याला एवढा उशीर का लावला गेला? बरं सोनिया गांधींनी कमी पैशातून प्रवास केला तर विठाबाईला त्याचा फायदा होईल अशी व्यवस्था होणार आहे का? की इकडे खर्च कमी आणि तिकडे भरती. काय उपयोग होईल काटकसरीचा? मला गेल्या काही काळात राहून राहून एक प्रसंग आठवतोय. तो आहे गुंथर ग्रास यांचा. ग्रास हे जगप्रसिद्ध जर्मन लेखक. 1997 ला ते भारतात आले. कोलकात्त्याच्या झोपडपट्टीत राहिले. भारतावर काही पुस्तकही त्यांनी लिहिली. त्याच वर्षी देश स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव साजरा करत होता. एवढा मोठा लेखक भारतात आहे आणि त्याला निमंत्रण नाही असं कसं होईल. वाजपेयींनी त्यांना 15 ऑगस्टच्या कार्यक्रमात पाहुणे म्हणून बोलवलं. पण ग्रास काही आले नाहीत. सगळ्यांना आश्चर्य वाटलं. माध्यमांनीही विचारपूस केली. पण ग्रास काही बोलले नाहीत. शेवटी भारत सोडून जाताना ग्रास जे बोलले ते अस्वस्थ करणारं आहे. ते म्हणाले, भारतात दैन्य आणि दारिद्र्याचा महासागर आहे आणि त्याच महासागरात एका रात्रीला लाखो करोडो रूपये खर्च करणारे निर्लज्ज बेटही आहे. बेटांचा आणि महासागराचा संबंध क्षणोक्षणीचा, पण भारत हा असा एक अतर्क्य देश आहे. जिथे या दोन्हीचा कधीच संबंध येत नाही. पुढच्याच वर्षी म्हणजे 1998 ला ग्रास यांना साहित्याचं नोबेल मिळालं. पण ज्यांच्याबद्दल ग्रास यांनी लिहिलं त्या विठाबाईसारख्या लाखो, करोडो जणांना काय मिळालंय? ते कशाच्या आशेवर जगतायत? आणि कशाच्या आशेवर जगावं....?

टोकदार सावलीचे वर्तमान


घटना नऊ वर्षापूर्वीची.... तरीही श्वासाइतकी ती आयुष्यात ठळक आहे. जून महिना होता. पावसाळी ढगं दाटून यायची. पडायला लागला की धो धो पाऊस पडायचा, नसेल तर काळी ढगं फक्त दाटलेली. मी त्या दिवशी गावाकडून लातूरला पोहोचलो, ते अशाच एका काळवंडलेल्या दिवशी. तारीख 21 जून 2001. हॉस्टेलला पोहोचलो तेव्हा भिजलेला होतो. दार काढत असतानाच मी शिवाची चौकशी केली. कारण मला गिरीशची काळजी वाटत होती. कुणी तरी सांगितलं शिवाच्या भावानं सुसाईड केली. माझ्या अंगावर अक्षरश: वीज कोसळली. बाहेर कोसळणाऱ्या पावसाचा आवाज अचानक जाणवेनासा झाला. ज्याची भीती होती ते आता वास्तव होतं.

काही वेळापूर्वी धो धो कोसळणारा पाऊस अचानक थिजला. काळवंडलेली ढगं अधिक गडद झाली. मी शिवाचं घर गाठलं. गिरीशचा मृतदेह जिथं पुरला होता तिथं लालभडक कुंकू पडलेलं होतं. माझा विश्वासच बसेना, पुढच्या भेटीत हेमंतकुमारचं ‘ना तुम हमे जानो’ ऐकवतो म्हणणारा गिरीश आता कायमचा मुका झालाय. का?

माणसांची स्वप्नं माणसाला मुकी बनवतात. गेल्या महिन्यात गावचे ग्रामसेवक भेटले. फार ओळख नाही. परेशानीत होते. मला ते जाणवलं. त्यांना काही तरी बोलायचं असावं पण माझ्या सोबत मित्र असल्यामुळे ते बोलत नव्हते. काहीवेळानं मित्र गेले ग्रामसेवक बोलते झाले. त्यांचा मुलगा बारावीला आहे. अहमदपूरला. गेल्या काही महिन्यातल्या टेस्टमध्ये त्याचे मार्कस् पासिंगचे सुद्धा नाहीत. चिंता वाटणं साहजिक होतं. अपेक्षा मोठ्या आणि वास्तव भयंकर. मी मुलाची चौकशी केली. दहावीला मुलाला चांगले मार्कस् होते. त्यामुळे सायन्स घेतलं. अकरावीला प्रगती चांगली होती. पण अचानक बारावीच्या उत्तरार्धात मात्र घसरण. मुलासाठी घर अहमदपूरला ठेवलेलं. स्वतःची नोकरी दुसऱ्याच गावी. दुसरा मुलगा आणि मुलगी तिसऱ्याच गावी. तेही शिक्षणासाठी. पण लक्ष्य बारावीच्या मुलावर... कारण तो डॉक्टरकीचं स्वप्न पूर्ण करेल असा विश्वास. पण त्या विश्वासाला आता तडे जातायत. ज्या एका आशेवर सगळं आयुष्य पणाला लावावं त्याचा अंत होतोय. मुलांच्या शिक्षणासाठी वेगवेगळ्या ठिकाणी मांडलेलं बिऱ्हाड आता काय कामाचं? असा उद्विग्न सवाल ग्रामसेवक विचारतायत. पण दोष कुणाचा स्वच्छंद आयुष्य जगू पाहणाऱ्या मुलाचा की अपेक्षा ठेवणाऱ्या बापाचा?

मुलींचं जीवन वडीलांकडे झुकलेलं असतं. पण ते किती झुकावं? मी गेल्या आठवड्यात एका मुलीला भेटलो. तीही १२ वीला. तास दिड तास आमची चर्चा सुरु होती. तिचं कॉलेज. तिच्या मैत्रीणी. तिचे छंद. आई-वडील याबाबत ती भरभरून बोलत होती. तिच्या बोलण्यात आत्मविश्वास होता पण टोकदारपणाही होता. ते ऐकताना मात्र भीती वाटत होती. सिनेमाला कधी गेलीस का? ती म्हणाली, नाही. कारण पप्पा जाऊ देत नाहीत. कॉलेजमध्ये मित्र आहेत का? नाहीत. कारण पप्पाला आवडत नाही. घरी टी.व्हीवर काय बघायचं कोण ठरवतं? पप्पा. आई आवडते का? नाही. आई साक्षात समोर उभी असतानाही मुलीचं हे उत्तर. बाहेर कधी फिरायला जाते का? नाही. पप्पांनी सांगितलंय जायचं नाही. मग ते फायनल. आयुष्यातलं स्वप्न काय? पप्पांना आनंद होईल असं काही तरी करायंच. पण ते नेमकं काय? सीए. स्वप्न मोठं आहे पण सिनेमाला जायचं की नाही याचं स्वातंत्र्य नसलेली मुलगी सीए होणार कशी? नाही झाली तर पुन्हा स्वप्नांचा चुराडा. आयुष्य ओझं नाही वाटणार का?

अशाच कुठल्या तरी ओझ्यानं गेल्या आठवड्याभरात पाच जणांचा जीव संपवलाय. त्यात तीन शाळकरी मुलं आहेत, तर दोन इंजिनीअरिंगच्या मुली. गिरीशही याच साखळीतला होता. घुसमट झाली आणि त्यानं स्वत:ला संपवलं. गिरीश उत्तम स्केचिंग करायचा. रंगरेषा हा त्याचा श्वास. घरात वातावरण मात्र घुसमटीचं. वडील कडक शिस्तीचे. संघाचे कार्यकर्ते. त्यांच्या घरात मी कधी कुणी उंच आवाजात बोलल्याचं ऐकलं नाही. गिरीश नेमका उलटा. तो मुंबईत राहिला. काही काळ कोल्हापुरातही होता. गोव्यातही फिरून आला. तो स्वच्छंद होता. हेमंतकुमार त्याचा आवडता गायक. घरच्यांनी त्याच्यावर बळजबरी केली. लग्न मनाविरोधातच लावून दिलं. तो काही फार समाधानी नव्हता. त्याला रंगरेषांशिवाय फारसं काही आयुष्य नसावं. त्याला व्हेनिसमध्ये जाऊन चित्रं रंगवायची होती. पिकासोबाबत तो भरभरून बोलायचा. त्याचं पेंटिंगप्रेम घरच्यांना आवडलं नाही. पेंटिंगचं सामान घरचे लपवून ठेवतात, असं तो मला एकदा म्हणाला होता. अखेर त्याच्या डोक्यावर परिणाम झाला. त्याला वेड लागलं. त्यातच त्यानं सुसाईड केली.
माणूस आत्महत्या कधी करतो? मी दहावीला होतो, अहमदपूरला. 95 साल असावं. त्यावेळेस महाराष्ट्रातल्या सर्वोत्तम शाळांपैकी माझी शाळा होती यशवंत विद्यालय. आमची तुकडी हुशार मुलांची म्हणजे या तुकडीतले मुलं मेरिटमध्ये येणार असं गृहीत धरलेलं. त्यादिवशी निकाल लागला. बोर्डावर निकाल लावलेला होता. मेरिटला आलेल्यांचं फोटोसेशन सुरु होतं. सगळीकडे आनंदी वातावरण. मी मेरिटचा विद्यार्थी नाही, नव्हतो. मी बोर्डावरची पहिली लिस्ट बघितली. माझ नावच नको. काळजाचा ठोका चुकला. मी दुसरी लिस्ट बघितली, तिसरी बघितली माझं नाव सगळीकडून गायब. काळजाच्या ठोक्यांनी धोक्याची पातळी ओलांडी. पाय थरथर कापायला लागले. आपल्या बापानं आपल्याला चौथीपासून शिक्षणासाठी काय काय उद्योग करून बाहेर ठेवलं, ते सगळे प्रसंग डोळ्यात जमा व्हायला लागले. मी माझं नाव शोधत होतो आणि ते सापडत नव्हतं. तसा घसाही कोरडा पडायला लागला. तितक्यात कुणीतरी म्हणालं, नापासांची नाव लावत नसतात. आभाळच कोसळलं. आता काय करायचं ? नापास होऊन घरच्यांना तोंड दाखवण्यापेक्षा मेलेलं बरं. विचार डोक्यात घोळायला लागला. मी तसाच आपल्याला कुणी बघणार नाही, याची काळजी घेत शाळेच्या गेटकडे निघालो. त्याचवेळी साबळे सरांनी मला हटकलं. ते इतिहास शिकवायचे. मला शब्दच फुटेना. त्यांना माझी अडचण समजली. मी नापास झालोय असं म्हणालो. त्यांचा विश्वासच बसेना. ते म्हणाले असं कसं होईल? त्यांनी मला परत शाळेत नेलं. बोर्डाकडे गेलो. नाव शोधलं, नाव नव्हतं. साबळे सरांनी ऑफिसात नेलं. तिथं निकाल बघितला. मी पास झालो होतो. मार्कसही चांगले होते. मी पुन्हा पुन्हा खात्री करून घेतली. साबळे सरांनी बोर्डावर पुन्हा चाचपणी केली तर तिथली एक लिस्टच कुणीतरी गायब केली होती. जिच्यावर माझं नाव होतं. माझ्या शरीरात पुन्हा जीव आला. आपल्या डोक्यात आत्महत्येचा आलेला विचार मला हास्यास्पद वाटला. पण साबळे सर जर मला त्यावेळी भेटले नसते तर? गिरीशला स्वातंत्र्य हवं होतं. आयुष्यात धुकं जमा होतंय असं वाटत असताना पिकासोबद्दल बोलणारा कुणी तरी. मुलांना ‘काय झालं रे’ म्हणून सहज विचारपूस करणारे साबळे सर. मृत्यू चुकला असता की नाही माहिती नाही पण क्षण कदाचित चुकला असता. नेमाडेंच्या कोसलातली शेवटची वाक्य त्यासाठी समर्पक. “शेवटच्या वेळी तो म्हणाला, चल तर मी जायला पाहिजे होतं. त्यानं काही तरी प्रचंड आपल्याला सांगितलं असतं. अशी माणसं आपल्या जवळून जातात पण आपल्याला त्यांची किंमत कळत नाही. आपल्या आयुष्यातही वैताग आहेच पण वांझोटा. ज्या प्रमाणे घरात दिवा असला की खिडक्यातून दारातून झरोक्यातून उजेड दिसतो आणि आपल्याला कळतं घरात दिवा आहे. त्याप्रमाणे प्रत्येक थोर माणसाच्या वागण्यातून बोलण्या-चालण्यातून असा उजेड दिसलाच पाहिजे, नाही तर त्या घरात दिवा नाही. तो माणूस भंपक.”

पंधरा मिनिटं...!

पंधरा मिनिटं...!
माणिक मुंढे

गंगाखेडहून मुंबईला निघालेल्या एसटीनं अंबाजोगाई सोडलं की दिवस मरायला लागलेला असतो आणि रात्रीला जाग येत असते. गाडी पश्चिमेकडे सरकत असल्यानं दोन अडीच तास सूर्य डोळ्यावर नाचत राहतो. ऊन्हाला चुकवत डोळे सावलीचा आश्रय शोधत राहतात. ऊनसावलीचा खेळ थांबतो तो कातरवेळेला, पण तोपर्यंत पेंगायला होतं. पापण्या जड पडतात आणि श्वासाला आवाज येतो. गेल्या तीन एक वर्षापासून हा अनुभव नेहमीचा.

तो दिवसही अपवाद नाही. गाडी ब्रेक लावून थांबली. झोपेची साखळी तुटली. बाहेर पाहिलं,पुर्ण अंधार. वाहनांचा कर्कश आवाज सुरु होता. समोर पाहिलं तर वाहनांची रांग लागलेली आणि मागे लांबत चाललेली. काहींच्या हेडलाईटस् डोळ्यांना त्रास देत होत्या तर काहींच्या बॅकलाईटस्. डोळे चोळतच एसटीच्या खाली उतरलो, पुढं चालायला लागलो. पहिला भेटला त्याला विचारलं, काय झालं हो! काय माहित? दोन पोरं पडलेत म्हणं. इसमाचं उत्तर. पायांना वेग आला. घटनास्थळी कसा पोहोचलो कळलं नाही. दोन तरूण रक्ताच्या थारोळ्यात पडलेले तेही एकमेकांवर. दृश्य केविलवाणं आणि विदारक. आजुबाजुला लोकांनी गर्दी केलेली आणि आपआपसात मोठ्यानं बोलणं. नव्यानं आलेला माणूस तेवढाच विहिरीत डोकावल्यासारखा पडलेल्या जखमींवर डोकावयाचा आणि चुकचुक करत बाजुला व्हायचा. मला भीती वाटली. कोण आहेत,कुठले आहेत, कसलाच पत्ता नाही. जीवंत आहेत की गेलेत? प्रश्नांचा भुंगा जागा झाला. दबकतच जखमींच्या जवळ गेलो. त्यातल्या वरच्या मुलाला शुद्ध होती. त्याचा हात हातात घेण्याचा प्रयत्न केला,तो जोरात विव्हळला. त्याची किती हाडं मोडली असावीत याचा अंदाज आला. खालच्या मुलाला स्पर्श केला तर तो बेशुद्ध. गेला असेल का हा? काही कळत नव्हतं. जखमींच्या तोंडातून वास येत होता. आणि पँटही ओली. तितक्यात माझ्या आजुबाजुला तीन चार तरूण जमा झाले. ‘दोघेही जीवंत आहेत पण उशीर झाला तर जातीलही कदाचित. बऱ्याच वेळापासून असेच पडून आहेत कुणी लक्ष देत नाहीए. अंगावर झंझट येईल असं वाटतं लोकांना’. एकानं सांगितलं. मी माझी त्यांना ओळख करून दिली. त्यांच्यावर काहीही येणार नाही याचा विश्वास दिला. ते मदतीला पुढं धावले. मी जखमींच्या खिशात मोबाईल आहे का याची चाचपणी करत होतो तर तो कुणी तरी ढापल्याचं सांगितलं. ढापणाराही तिथच होता. त्याच्याकडनं मोबाईल घेतला. मोबाईलमध्ये नंबर चेक करायला लागलो तर त्यावरच फोन आला. पलिकडून महिलेचा आवाज होता. तिला सर्व माहिती दिली. घाबरण्याचं कारण नसल्याचही सांगितलं. पण तिचा विश्वास बसत नव्हता. दोघांनाही अंबाजोगाईच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करतोयत तिकडेच पोहचायला सांगितलं. बोलणं संपेपर्यंत त्या महिलेच्या आवाजात अश्रु मिसळले होते. तिनं सांगितल्याप्रमाणं हे दोघे जण पुण्याचे होते आणि ते परत निघालेले असावेत. पण जखमींना ह़ॉस्पिटलमध्ये हलवणार कसं? मोठा आणि महत्वाचा प्रश्न. कुणीही गाडी पुरवायला तयार नसल्याचं कुणी तरी सांगितलं. पंचायत समितीचे सभापती पाठीमागं एका गाडीत आहेत तुम्ही बोललात तर कदाचित ते तयार होतील. एकानं आशा जागवली. आम्ही तिकडं मोर्चा वळवला. एका लाल स्कॉर्पियोत सभापतीसाहेब फोनवर बोलत होते. गाडीच्या काचा अर्थातच बंद. त्याच्यावर टकटक केली. त्यांना ओळख करून दिली आणि गाडीची सोय करण्याची विनंती केली. सभापती ना हो देत होते ना ना. वेळ निघून जात असल्याची भीती घर करायला लागली. दहा पंधरा मिनीटं निघून गेलीच. अनास्थेनं का होईना सभापतीसाहेब गाडी द्यायला तयार झाले तितक्यात पोलीसांची गाडी केजकडून आल्याचं कुणी तरी सांगितलं. आम्ही सर्व जण तिकडे धावलोत. वरच्या मुलाला सर्वांनी उचलला, तो जोरात विव्हळला. पण पर्याय नव्हता तसच त्याला पोलीसांच्या गाडीत ठेवलं. दुसऱ्याला शुद्धच नव्हती. तो गेलाय का? मनात पुन्हा पाल चुकचकुली बसमध्ये परतलो आणि खिडकी वर केली. अंधार दाट होता पण दुरवर काही दिवेही चमकत होते.
जाग आली त्यावेळेस मुंबईत मी माझ्या रूमवर होतो. डोळे चोळतच सुशीलला फोन केला. तो आमचा बीडचा प्रतिनिधी. त्याला घडलेली घटना सांगितली आणि मुलांचं काय झालं याची माहिती घ्यायला लावली. मुलं जीवंत असावीत का? सकाळ त्यांना दिसली असेल का? ट्रीटमेंट मिळाली असेल का? की आपण झोपेत पेंगत असताना त्यांचा पक्षी कायमचा उडाला असेल? प्रश्नांच्या मुंग्या थांबत नव्हत्या आणि काही वेळानं त्या पुन्हा पुन्हा गोलाकार फिरत होत्या.

10 मिनीटांनी सुशीलनं फोन केला. दोन्ही मुलं जीवंत असल्याचं सांगितलं. त्यांच्या घरचेही पोहोचले होते. पण उपचारांना दहा पंधरा मिनीट उशीर झाला असता तर...तर काहीही झालं असतं. सुशीलचे शब्द. मला बरं वाटलं. मी रूमची खिडकी उघडली. रस्ता निर्मनुष्य होता आणि आकाश स्वच्छ.
*************************************
सोलापूर-हैदराबाद हायवेवर ज्यावेळेसही प्रवास केलाय त्यावेळेस मी झोपू शकलेलो नाही. त्याला कारण आहे एक घटना. मी ती ऐकलीय की वाचलीय हे नीट आठवत नाही पण ती मेंदूच्या घरात विटेसारखी फिट्ट बसलीय. घटना अशी. एका दुचाकीवर दोघे जण सोलापूरहून पुण्याला जात होते. पुण्यात पोहोचायला अर्धा तास असेल की त्यांना एक जण हायवेच्या बाजुला अपघातग्रस्त होऊन पडलेला दिसला. तो जीवंत आहे की गेलाय याची त्यांना कल्पना नव्हती. दुचाकीवरच्या एकानं विचारलं बघावं का कोण आहे ते? जमलं तर मदत करूया! पण त्यातला दुसरा म्हणाला,नको इथून लवकर चल उगीच भानगड नको. त्यालाही वाटलं कशाला घ्या अंगावर? जखमी तरूणाला सोडून ते तसंच निघून गेले. दोन्ही दुचाकीस्वार आपआपल्या घरी पोहोचले. त्यातल्या एकाचा मुलगा त्या रात्री घरी परतलाच नाही. त्याला वाटलं एखाद्या मित्राकडे थांबलेला असेल. त्यांनी फारशी काही चौकशी केली नाही. दुसरा दिवसही उलटून गेला. मुलगा काही घरी परतला नाही. त्यांनी न राहवून पोलीस स्टेशनचा रस्ता धरला आणि मुलगा हरवल्याची तक्रार नोंदवली. पोलीसांनी त्यांना सरळ हॉस्पिटलमध्ये नेलं. तिथं एका तरूणाची डेडी बॉडी दाखवली. त्याचा चेहरा पाहाताच त्यांच्यावर आभाळ कोसळलं. कारण डेडबॉडी त्यांच्या मुलाचीच होती. सोलापूर-पुणे हायवेवरच्या एका अपघातात त्याचा मृत्यू झाला होता. त्यालाही २४ तास उलटून गेले होते. डेड बॉडीची नोंद बेवारस म्हणून झालेली. पण दुर्देव हे की हा त्यांचाच मुलगा होता ज्याला ते स्वत:च हायवेवरच्या अपघातात भानगड नको म्हणून सोडून आले होते. त्यांच्या नंतर कुणी तरी त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं पण तोपर्यंत उशीर झाला. डॉक्टरांच्या अंदाजानुसार १५ ते २० मिनीटं अगोदर त्याला दाखल केलं असतं तर त्याचा जीव कदाचित वाचला असता.
************************************