Saturday, February 20, 2010

दीर्घ होऊ पाहाणारी कातरवेळ

देवळात दिवा लावण्याची वेळ झालेली. गुरं ढोरं घराकडे परतत होती. तेवढ्यात किसनबाबा गेल्याचं कुणी तरी सांगितलं आणि मावळू पाहणारी संध्याकाळ अचानक थांबली. गावकऱ्यांनी लगबगीनं त्यांच्या मुलाचा फोन नंबर शोधून फोन केला. आणि किसनबाबाच्या मुलींनाही सांगावा धाडला. किसनबाबांचा एकुलता एक मुलगा असतो परभणीत, आरोग्य अधिकारी म्हणून. किसनबाबा गेल्याचं त्याला गावकऱ्यांनी कळवलं तर आता उद्याच येतो. रात्रीचं तेवढं लक्ष ठेवा म्हणून त्यानं गावकऱ्यांना निरोप दिला. किसनबाबाच्या मुलाच्या निरोपानं गावकऱ्यांना धक्काच बसला. गावापासून परभणी अवघ्या दोन तासाच्या अंतरावर आहे. आणि येणं होत असतानाही किसनबाबाच्या मुलानं रात्रीचं येणं टाळलंय. मग काय दिवस मावळून गेलेला असल्यामुळे किसनबाबांची “माती” होऊ शकत नव्हती. त्यामुळे गावातल्या चार दोन मुलांसह साठीच्या पुढं असलेल्या किसनबाबाच्या मित्रांनीच त्यांच्या प्रेताचा रात्रभर सांभाळ केला. दुसऱ्या दिवशी सकाळी किसनबाबावर अंत्यसंस्कार झाले. किसनबाबा गेले पण त्यांना आयुष्यभर साथ देणाऱ्या बुकाबाईंचं आता काय होणार ?बुकाबाई आता घरी एकट्याच असतात. किसनबाबा होते त्यावेळेस त्या लादणीच्या दुसऱ्या मजल्यावर राहायच्या पण आता उतारवयात वर खाली जाणं होत नाही म्हणून त्यांनी आपलं बिढार लादणीच्या तळमजल्यावर मांडलंय. मुलगा कधी तरी येतो. किसनबाबा गेल्यानंतर बुकाबाईंना त्यांच्या मुलानं परभणीला नेलं, पण जीव रमत नाही म्हणत त्या काही महिन्यातच गावी परतल्या. आता त्या एकट्याच असतात आणि एकटेपण त्यांना खायला उठतं. अगोदर दिवाळी पंचमीला मुली यायच्या. मुलाबाळांनी घर भरून जायचं. दिवाळीचे दिवस कसे लख्ख असायचे. पण आता दिवस बदललेत. मुलींनाही नातवंडं झालीत त्यामुळे त्या आता येत नाहीत. मुलांच्या मुलांचेही लग्न झालीत. त्यामुळे तेही गावाकडे फिरकत नाहीत. पण बुकाबाईंचं वाट पाहणं संपत नाही. त्या आजही बायाबापड्यांमध्ये नातवंडं पोतरूंडांबाबत भरभरून बोलतात.बुकाबाई काय किंवा किसनबाबा काय यांच्यासोबत जे घडलंय. ते काही फक्त एका व्यक्तीबाबत घडलेलं नाही. स्वातंत्र्याच्या अगोदर किंवा नंतर जन्मलेल्या पिढीची आजची ही शोकांतिका आहे. उमेदीच्या काळात त्यांना कदाचित याची कल्पनाही नसेल की आयुष्याची कातरवेळ अशी नातवंडांच्या आठवणीत घालवावी लागेल. स्वातंत्र्यानंतर जन्मलेली पिढी शिकून सवरून मोठी झाली. नोकरी धंद्याला लागली आणि हळूहळू ती तिकडचीच झाली. तालुक्याच्या ठिकाणी किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी त्यांना जमेल तसं घरटी उभारली. त्यांच्याच वाडवडीलांनी म्हणजे किसनबाबाच्या पिढीनं स्वत:च्या मुलांना राहण्यासाठी गावाकडे वाडे बांधले. जमीनी खरेदी केल्या. त्यांच्या नावानं आंब्याची झाडेही लावली. या अपेक्षेनं की कधी तरी त्यांची पुढची पिढी गावात येईल, घरात रमेल आणि आपण पाणी देऊन वाढवलेल्या आंब्याचा रस चाखेल. ते घडलं नाही असं नाही, पण आता ते कायमचं थांबलय. गावाकडचे वाडे आता ओस पडलेत. बुकाबाईसारख्यांची संख्या जास्त झालीय. या गावात कुणी तरूण राहतो की नाही, अशी शंका यावी इतकी उतारवयातली माणसं गावात झालीत. गावातून एखादा वाटसरू गेला तर हे गावचं म्हातारं झालंय की काय असं वाटावं. नाही म्हणायला जे शिक्षक रिटायर होतात ते आता गावाकडे येतायत. पण त्यांचे लेकरं बाळं इकडं फिरकतच नाहीत. त्यामुळे गावात एकटं राहणाऱ्यांच्या संख्येत भर पडतेय. नुकतीच नोकरी सुटलेली असल्यानं नुसतं बसून राहणं जमत नाही. मग गेल्या वीसेक वर्षापासून पडीक असलेली वाडवडिलांची जमीन पुन्हा कसण्याचा प्रयत्न करतायत. पण पाहिजे तसं जमत नाही. उतारवयात चिडचिड झालीय. एक मात्र नेहमीचं. या सगळ्या मंडळींचा आता रिटायर्ड ग्रुप तयार झालाय. हा ग्रुप दुपारी पारावर जमतो. गावात पेपर आलेलाच असतो. तो सकाळी वाचलेला असतानाही दुपारच्या चर्चेसाठी आणला जातो. गावच्या सरपंचापासून ते अमेरिकेच्या ओबामांपर्यंत तसंच गावात तमाशात नाचलेल्या विठाबाईपासून ते ब्रिटनी स्पिअर्सपर्यंत सर्वच घडामोडींवर चर्चा होते. जमलंच तर पत्त्याच्या एखादा डाव मांडला जातो. संध्याकाळ झाली की गुरंढोरं परतली का नाही याची चाचपणी ही रिटायर मंडळी आवर्जून करतात. पार सोडताना त्याच पारावरच्या देवापुढे दिवा लावतात. आणि अशा वेळेस किसनबाबासारखं कुणी गेल्याचं कळालं की त्यांचं आयुष्य अचानक थिजल्यासारखं होतं. जीवनात निर्माण झालेला एकांतपणा अंगावर येतो. त्यात किसनबाबाच्या मुलाचा निरोप ऐकला की सगळ्या अंगाला बधिरता येते. घरात परतलं तर घरात असतो अर्धा अंधार आणि अर्धा ऊजेड कारण सगळं घरभरून दिवे लावावेत एवढी माणसंच कुठं असतात घरात ?फोटोग्राफी- माणिक मुंढे

No comments:

Post a Comment