Saturday, February 20, 2010

पंधरा मिनिटं...!

पंधरा मिनिटं...!
माणिक मुंढे

गंगाखेडहून मुंबईला निघालेल्या एसटीनं अंबाजोगाई सोडलं की दिवस मरायला लागलेला असतो आणि रात्रीला जाग येत असते. गाडी पश्चिमेकडे सरकत असल्यानं दोन अडीच तास सूर्य डोळ्यावर नाचत राहतो. ऊन्हाला चुकवत डोळे सावलीचा आश्रय शोधत राहतात. ऊनसावलीचा खेळ थांबतो तो कातरवेळेला, पण तोपर्यंत पेंगायला होतं. पापण्या जड पडतात आणि श्वासाला आवाज येतो. गेल्या तीन एक वर्षापासून हा अनुभव नेहमीचा.

तो दिवसही अपवाद नाही. गाडी ब्रेक लावून थांबली. झोपेची साखळी तुटली. बाहेर पाहिलं,पुर्ण अंधार. वाहनांचा कर्कश आवाज सुरु होता. समोर पाहिलं तर वाहनांची रांग लागलेली आणि मागे लांबत चाललेली. काहींच्या हेडलाईटस् डोळ्यांना त्रास देत होत्या तर काहींच्या बॅकलाईटस्. डोळे चोळतच एसटीच्या खाली उतरलो, पुढं चालायला लागलो. पहिला भेटला त्याला विचारलं, काय झालं हो! काय माहित? दोन पोरं पडलेत म्हणं. इसमाचं उत्तर. पायांना वेग आला. घटनास्थळी कसा पोहोचलो कळलं नाही. दोन तरूण रक्ताच्या थारोळ्यात पडलेले तेही एकमेकांवर. दृश्य केविलवाणं आणि विदारक. आजुबाजुला लोकांनी गर्दी केलेली आणि आपआपसात मोठ्यानं बोलणं. नव्यानं आलेला माणूस तेवढाच विहिरीत डोकावल्यासारखा पडलेल्या जखमींवर डोकावयाचा आणि चुकचुक करत बाजुला व्हायचा. मला भीती वाटली. कोण आहेत,कुठले आहेत, कसलाच पत्ता नाही. जीवंत आहेत की गेलेत? प्रश्नांचा भुंगा जागा झाला. दबकतच जखमींच्या जवळ गेलो. त्यातल्या वरच्या मुलाला शुद्ध होती. त्याचा हात हातात घेण्याचा प्रयत्न केला,तो जोरात विव्हळला. त्याची किती हाडं मोडली असावीत याचा अंदाज आला. खालच्या मुलाला स्पर्श केला तर तो बेशुद्ध. गेला असेल का हा? काही कळत नव्हतं. जखमींच्या तोंडातून वास येत होता. आणि पँटही ओली. तितक्यात माझ्या आजुबाजुला तीन चार तरूण जमा झाले. ‘दोघेही जीवंत आहेत पण उशीर झाला तर जातीलही कदाचित. बऱ्याच वेळापासून असेच पडून आहेत कुणी लक्ष देत नाहीए. अंगावर झंझट येईल असं वाटतं लोकांना’. एकानं सांगितलं. मी माझी त्यांना ओळख करून दिली. त्यांच्यावर काहीही येणार नाही याचा विश्वास दिला. ते मदतीला पुढं धावले. मी जखमींच्या खिशात मोबाईल आहे का याची चाचपणी करत होतो तर तो कुणी तरी ढापल्याचं सांगितलं. ढापणाराही तिथच होता. त्याच्याकडनं मोबाईल घेतला. मोबाईलमध्ये नंबर चेक करायला लागलो तर त्यावरच फोन आला. पलिकडून महिलेचा आवाज होता. तिला सर्व माहिती दिली. घाबरण्याचं कारण नसल्याचही सांगितलं. पण तिचा विश्वास बसत नव्हता. दोघांनाही अंबाजोगाईच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करतोयत तिकडेच पोहचायला सांगितलं. बोलणं संपेपर्यंत त्या महिलेच्या आवाजात अश्रु मिसळले होते. तिनं सांगितल्याप्रमाणं हे दोघे जण पुण्याचे होते आणि ते परत निघालेले असावेत. पण जखमींना ह़ॉस्पिटलमध्ये हलवणार कसं? मोठा आणि महत्वाचा प्रश्न. कुणीही गाडी पुरवायला तयार नसल्याचं कुणी तरी सांगितलं. पंचायत समितीचे सभापती पाठीमागं एका गाडीत आहेत तुम्ही बोललात तर कदाचित ते तयार होतील. एकानं आशा जागवली. आम्ही तिकडं मोर्चा वळवला. एका लाल स्कॉर्पियोत सभापतीसाहेब फोनवर बोलत होते. गाडीच्या काचा अर्थातच बंद. त्याच्यावर टकटक केली. त्यांना ओळख करून दिली आणि गाडीची सोय करण्याची विनंती केली. सभापती ना हो देत होते ना ना. वेळ निघून जात असल्याची भीती घर करायला लागली. दहा पंधरा मिनीटं निघून गेलीच. अनास्थेनं का होईना सभापतीसाहेब गाडी द्यायला तयार झाले तितक्यात पोलीसांची गाडी केजकडून आल्याचं कुणी तरी सांगितलं. आम्ही सर्व जण तिकडे धावलोत. वरच्या मुलाला सर्वांनी उचलला, तो जोरात विव्हळला. पण पर्याय नव्हता तसच त्याला पोलीसांच्या गाडीत ठेवलं. दुसऱ्याला शुद्धच नव्हती. तो गेलाय का? मनात पुन्हा पाल चुकचकुली बसमध्ये परतलो आणि खिडकी वर केली. अंधार दाट होता पण दुरवर काही दिवेही चमकत होते.
जाग आली त्यावेळेस मुंबईत मी माझ्या रूमवर होतो. डोळे चोळतच सुशीलला फोन केला. तो आमचा बीडचा प्रतिनिधी. त्याला घडलेली घटना सांगितली आणि मुलांचं काय झालं याची माहिती घ्यायला लावली. मुलं जीवंत असावीत का? सकाळ त्यांना दिसली असेल का? ट्रीटमेंट मिळाली असेल का? की आपण झोपेत पेंगत असताना त्यांचा पक्षी कायमचा उडाला असेल? प्रश्नांच्या मुंग्या थांबत नव्हत्या आणि काही वेळानं त्या पुन्हा पुन्हा गोलाकार फिरत होत्या.

10 मिनीटांनी सुशीलनं फोन केला. दोन्ही मुलं जीवंत असल्याचं सांगितलं. त्यांच्या घरचेही पोहोचले होते. पण उपचारांना दहा पंधरा मिनीट उशीर झाला असता तर...तर काहीही झालं असतं. सुशीलचे शब्द. मला बरं वाटलं. मी रूमची खिडकी उघडली. रस्ता निर्मनुष्य होता आणि आकाश स्वच्छ.
*************************************
सोलापूर-हैदराबाद हायवेवर ज्यावेळेसही प्रवास केलाय त्यावेळेस मी झोपू शकलेलो नाही. त्याला कारण आहे एक घटना. मी ती ऐकलीय की वाचलीय हे नीट आठवत नाही पण ती मेंदूच्या घरात विटेसारखी फिट्ट बसलीय. घटना अशी. एका दुचाकीवर दोघे जण सोलापूरहून पुण्याला जात होते. पुण्यात पोहोचायला अर्धा तास असेल की त्यांना एक जण हायवेच्या बाजुला अपघातग्रस्त होऊन पडलेला दिसला. तो जीवंत आहे की गेलाय याची त्यांना कल्पना नव्हती. दुचाकीवरच्या एकानं विचारलं बघावं का कोण आहे ते? जमलं तर मदत करूया! पण त्यातला दुसरा म्हणाला,नको इथून लवकर चल उगीच भानगड नको. त्यालाही वाटलं कशाला घ्या अंगावर? जखमी तरूणाला सोडून ते तसंच निघून गेले. दोन्ही दुचाकीस्वार आपआपल्या घरी पोहोचले. त्यातल्या एकाचा मुलगा त्या रात्री घरी परतलाच नाही. त्याला वाटलं एखाद्या मित्राकडे थांबलेला असेल. त्यांनी फारशी काही चौकशी केली नाही. दुसरा दिवसही उलटून गेला. मुलगा काही घरी परतला नाही. त्यांनी न राहवून पोलीस स्टेशनचा रस्ता धरला आणि मुलगा हरवल्याची तक्रार नोंदवली. पोलीसांनी त्यांना सरळ हॉस्पिटलमध्ये नेलं. तिथं एका तरूणाची डेडी बॉडी दाखवली. त्याचा चेहरा पाहाताच त्यांच्यावर आभाळ कोसळलं. कारण डेडबॉडी त्यांच्या मुलाचीच होती. सोलापूर-पुणे हायवेवरच्या एका अपघातात त्याचा मृत्यू झाला होता. त्यालाही २४ तास उलटून गेले होते. डेड बॉडीची नोंद बेवारस म्हणून झालेली. पण दुर्देव हे की हा त्यांचाच मुलगा होता ज्याला ते स्वत:च हायवेवरच्या अपघातात भानगड नको म्हणून सोडून आले होते. त्यांच्या नंतर कुणी तरी त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं पण तोपर्यंत उशीर झाला. डॉक्टरांच्या अंदाजानुसार १५ ते २० मिनीटं अगोदर त्याला दाखल केलं असतं तर त्याचा जीव कदाचित वाचला असता.
************************************

1 comment:

  1. फार वास्तववादी आणि अंगावर आलेलं लिहलं आहेस.. ब्लॉग सुरु केल्याबद्दल अभिनंदन, तुझ्या डोक्यात नक्की काय भुंगा सुरु आहे, हे कळेल तरी या निमित्तानं.. आणखी एका नेमाडे पंथियांचे ब्लॉगच्या जगात स्वागत

    ReplyDelete