Tuesday, December 20, 2011

भेटीचा नवा कट्टा

माझे ब्लॉग आता मी वर्डप्रेसवर लिहायला सुरुवात केलेली आहे. जुने ब्लॉगही टाकलेले आहेत. त्याची लिंक
इथं देतोय. www.manikmundhe.wordpress.com अपेक्षा आहे तुम्हाला लिखान आणखी फ्रेश वाटेल.

Tuesday, August 30, 2011

झऱ्यांच्या शोधातले दिवस

विदर्भात प्रवेश करताना मंठा म्हणजे मराठवाड्यातलं शेवटचं मोठं ठिकाण. त्यानंतर विदर्भ कधी सुरु होतो आणि मराठवाडा कुठं संपतो हे लक्षात येत नाही. आपण धुसररेषा शोधेपर्यंत तर लोणार सरोवराच्या काठावर असतो. डोळ्यात न सामावणारा गोलाकार भूभाग, खाली पाहिलं तर प्रचंड हिरवं पाणी, वर जूनच्या पहिल्या आठवड्यातलं स्वच्छ निरभ्र आकाश. उंच जावं आणि तिथून हा गोल पाहावा, कसा दिसेल? शक्य नाही. मग मी शहरातून विष्णू मंदिराच्या बाजूनं खाली उतरायला लागलो. मंदिराच्या कुंडात बायामाणसं झुंडीनं अंघोळ करतायत. पण या गोमुखात पाणी कुठून येतंय? तेही एवढं स्वच्छ? सोबत कधी नाही ते गाईड घेतलेला. तो म्हणाला हे अनादी काळापासून असंच सुरुय. बाराही महिने पाणी असतं. उन्हाळ्यात धार थोडी कमी होते पण पाणी कधीच थांबत नाही. आश्चर्य आहे? मी त्याच धारेनं खाली पायऱ्या उतरत गेलो तर एक दोन ठिकाणी आणखी काही जण अंघोळ करत होते. मी हे ऐकून होतो की लोणारच्या गंधकयुक्त पाण्यानं त्वचेचे रोग दूर होतात पण लोक तर स्वच्छ पाण्याखाली उभे? शेवटी पायरस्ता तुडवत त्या हिरव्यागार पाण्याजवळ गेलो तर प्रचंड वास येत होता. समोरच केळीची बाग. गंधकयुक्त पाण्यावर केळी? तिकडे गेलो तर लक्षात आलं की गोमुखातून जी धार खाली आलीय तिच्यावरच ही केळीची बाग फुललीय. मला लोणारच्या हिरव्या पाण्यापेक्षाही उत्सुकता वाटली ती गोमुखातून निघालेल्या स्वच्छ पाण्याची. वर आल्यावर हॉटेलमध्ये एक वयस्कर गृहस्थ भेटले. बोलके वाटले. त्यांना विचारलं, गोमुखातली धार जर बारा महिने वाहते तर मग जगप्रसिद्ध लोणारमध्ये पाणीटंचाई नसेल?
हैदराबादला जायचं तर बिदर ओलांडावच लागतं. हैदराबादमध्ये शिक्षित झालेली पण आता उतारवयात असलेली मराठवाड्यातली पिढी अजूनही जिवंत आहे. त्यामुळे बिदरचं नृसिंह मंदिर किंवा तिथला प्रसिद्ध किल्ला लोकांच्या बोलण्यात सहज येतो. आम्ही काही जणांनी फेब्रुवारी महिन्यातल्या सकाळी सकाळी बाईक्स काढल्या आणि उदगीरमार्गे बिदर गाठलं. रमत गमत गेल्यानं थोडा उशीर झाला. पण नृसिंह झरना बघताच दिवसभरात अंगावर चढलेलं ऊन उतरून गेलं. इथंही गोमुखातून पाणी बाहेर पडतंय तेही गढूळ. पण लोकांना त्याचं काय? आंघोळीसाठी इथंही झुंबड उडालेली. ‘नरशा’चं दर्शन घ्यायचं तर अंगावरचे सगळे कपडे काढून कंबरेइतक्या पाण्यातून चालत जावं लागतं तेही बोगद्यात. प्रचंड गढूळ पाणी, वर लटकलेल्या वटवाघळी अगदी डोक्याला लागतील अशा, त्यातच बल्बचा पिवळा उजेड हॉरर सिनेमातल्यासारखा. विशेष म्हणजे ह्या बोगद्यातलं पाणीही असंच अनादी काळापासून सुरुय. नृसिंह झरना म्हणून तो प्रसिद्ध. बोगद्यातून दर्शन घेऊन बाहेर आलं की समोर ओसाड प्रदेश दिसतो. पाऊस माहित असेल का या प्रदेशाला? केवढा हा विरोधाभास?
नानक झिरा साहिब यांचा गुरुद्वाराही आहे बिदरमध्ये. दक्षिण भारतातल्या महत्वाच्या गुरुद्वाऱ्यांपैकी एक. आम्ही पोहोचलो त्यावेळेस गुरुद्वाऱ्यात जाण्याऐवजी काही जण बाजूच्या एका खोलीकडे जात होते. आम्हीही गेलो. आश्चर्य म्हणजे इथंही पाण्याची धार आहे जिचा उगम कुणालाही माहित नाही. गुरु नानक देवजींनी खडकाला स्पर्श केला आणि हा झरा सुरु झाल्याची अख्यायिका. येणारे पाण्याचं दर्शन घेतात, खिशातली काही नाणी टाकतात आणि निघून जातात.
पाण्याचा हा चमत्कार फक्त काही लोणार, बिदरमध्येच नाही. दौलताबादचा किल्ला चढून गेल्यानंतर किंवा विस्तीर्ण कोयना डॅम नावेतून पार करत, पाच एक तासाचा ट्रेक करून आपण ज्यावेळेस वासोटा किल्ल्याच्या माथ्यावर पोहोचतो त्यावेळेस तिथं एका डबक्यातलं पाणी बघून आश्चर्यचकीत होतो. ऐन उन्हाळ्यात किल्ल्याच्या माथ्यावर पाणी? महाबळेश्वरमध्ये तर एकाच गोमुखातून पाच नद्यांचा उगम. मला मोह आवरला नाही. झऱ्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला पण काही ठावठिकाणा लागला नाही. पन्हाळगडावर तर पाणी चक्क हाताला येतं. आपण डोकावून बघितलं तर स्वच्छ पाण्यात आपलं प्रतिबिंब बघत राहावं असं. बरं पन्हाळ्यात अशा किती तरी विहिरी. मग पन्हाळ्यात पाणी टंचाई नाही? दुर्देवानं उत्तर भीषण आहे. लोणारमध्येही पाणीटंचाई आहे. देवाच्या धारेनं कुठं दुष्काळ जातो का? हे कधीही न विसरता येणारं त्या वयस्कर गृहस्थाचं वाक्य. मग देवाच्या या चमत्कारीत धारेचा शोध का नाही घेतला जात? तेही पिढ्यानपिढ्या? मला वाटतं ज्याला तेलाच्या विहिरी सापडल्या तो खरं तर पाण्याच्या शोधात गेला असावा. असं पाणी ज्यानं त्याला चकीत केलं असेल. आपल्याला कदाचित तेल नाही सापडायचं. पण कमीत कमी दुष्काळ तरी दूर होईल? पिढ्यानपिढ्या डोळ्यावर बांधलेली पट्टी तरी उतरेल? डोळ्यावर पट्टी बांधून घेतलेल्या पिढ्या एक तर पाण्यात जातात किंवा त्यांच्यावर पाणी पडतं. म्हणजे व्यर्थ.
Monday, July 4, 2011

साऊथ पोल,सोमनाथ!

आग्य्राच्या गल्लीबोळातून रिक्षा जायला लागली की या बोळाच्या शेवटी कुठे तरी जगातली सर्वोत्तम सौंदर्याची वास्तू उभी आहे, यावर विश्वास बसत नाही. एक छोटासा रस्ता आणि त्याच्या दोन्ही बाजूला दुकानांची प्रचंड गर्दी. रिक्षावाला अशा काही कसरत करत असतो, की जणू प्रत्येकाला खो देत असावा. सोमनाथाच्या मंदिराकडे जाणारा रस्ताही त्याला अपवाद नाही. फरक फक्त एवढाच की इथे रस्ता मोठा आहे आणि ज्या परिसरातून तो आपल्याला घेऊन येतो तो नारळाच्या दुतर्फा झाडांनी भरून गेलेला. कोकण पाहिलेले असेल तर सोमनाथाचा परिसर पाहताना त्याची आठवण होतेच. घनदाट झाडी इथे नाही पण सपाट काळ्या मातीवरची नारळाची झाडे बघताना नजर स्थिरावत नाही. जसा कोकणात हापूस तशी या भागात केसर आंब्यांची आंबराई लगडून गेलेली. आपण देवाच्या भूमीत आहोत याची प्रचिती यायला पुरेशी.

सोमनाथ म्हणजे गुजरातचे दक्षिण टोक. बारा ज्योर्तिलिंगांपैकी आद्य. आश्चर्य म्हणजे सोमनाथ नावाचे शहर असे काही नाही. वेरावळ नावाचे शहर, त्यातला प्रमुख भाग प्रभास पाटण. त्यात सोमनाथाचे भव्य मंदिर. गर्भगृह, सभामंडप, नृत्यमंडप आणि त्यावर दीडशे फूट उंच शिखर. घोंगावणा-या अरबी समुद्राच्या लाटांवर सोमनाथ पाहताना भान हरपते. फक्त सौराष्ट्रच नाही तर जगभरातून लोक इथे येतात. मी पोहोचलो मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात. मुंबईतून सौराष्ट्र मेल सुटते रात्री साडेआठला. वेरावळला पोहोचते दुस-या दिवशी दुपारी चार वाजता.

वीस एक तासांचा प्रवास. पण मी सरळ सोमनाथला नाही गेलो. सौराष्ट्र मेल राजकोटला विभागली जाते. त्यातली एक गाडी वेरावळला, तर दुसरी जुनागडला जाते. जुनागड म्हणजे जगप्रसिद्ध गिरनार टेकड्यांचे शहर. गुजरातचे सर्वात उंच शिखरही गिरनारच. टेकड्यांवर हिंदू आणि जैन मंदिरे आहेत. ती पाहण्यासाठी दहा हजार पाय-या चढून जाव्या लागतात. मी राजकोटवरून जुनागड गाठले आणि तिथून सोमनाथ. सोमनाथाला आलो ते देवावर श्रद्धा वगैरे म्हणून नाही, तर एखादे मंदिर सहा वेळा लुटले जाते आणि तेवढ्याच वेळा ते पुन्हा बांधले जाते; असे काय आहे या जागेत, ते पाहण्यासाठी. वाटले की सोमनाथाचे मंदिर कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरासारखे असेल. काळ्या पाषाणात कोरलेले; पण प्रत्यक्ष डोळ्यांसमोर उभे होते ते लाल दगडातले नवे कोरे चकचकीत मंदिर. त्यामुळे परळी वैजनाथ किंवा औंढा नागनाथाच्या मंदिरात गेल्यानंतर जे काहीसे नॉस्टॅल्जिक व्हायला होते ते इथे नाही. पण एखादे मंदिर कसे ठेवावे याचा उत्कृष्ट नमुना म्हणजे सोमनाथ. कुठेही अस्वच्छता नाही. सातव्यांदा मंदिर उभारायला घेतले ते सरदार पटेलांनी. १९५१ मध्ये. अजूनही काही काम सुरूच. पण मी शोधत होतो ते मोहंमद गझनीने लुटलेले सोमनाथाचे श्रीमंत मंदिर. त्याच्या अगोदर तीन वेळेस मंदिर लुटले, पण आपल्या लक्षात राहिला तो गझनीच. पण जुन्या मंदिराचे अवशेष आता कुठे असणार? ते आहेत फक्त फोटोत. विशेष म्हणजे सोमनाथाची श्रीमंती १७ वेळेस लुटली, त्याचा कुठेही उल्लेख मंदिर परिसरात नाही. अगदी गझनीचाही नाही.

आणखी एक ठळक गोष्ट. सोमनाथाला आलेले मराठी लोक. रस्त्यावरच्या किलोमीटरच्या पाट्या मराठीतही कशा, याचे उत्तर मिळते ते इथे. अर्धेअधिक तर मराठीच. मराठी लोक फारसे मुशाफिरी करत नाहीत या समजाला छेद देणारे दृश्य. रात्री अकराला गिरनारच्या टेकड्यांवर चढाई करण्याच्या तयारीत असलेले पन्नास एक मराठी लोक भेटले, त्या वेळेस तर अटकेपार झेंडा फडकतोय असेच वाटले. सोमनाथही त्याला अपवाद नाही. विशेष म्हणजे औरंगजेबाने सोमनाथ उद्ध्वस्त केले ते १७०१ मध्ये. त्यानंतर त्याचा जीर्णोद्धार केला अहिल्याबाई होळकरांनी. १७८५ मध्ये. ते मंदिर अजूनही आहे आणि त्याच्या प्रवेशद्वारावर शुद्ध मराठीत त्याचा उल्लेखही करण्यात आलाय; पण सोमनाथाला जायलाच का हवे? फक्त एक कारण पुरेसे आहे. मंदिर परिसरात समुद्राच्या बाजूला एक बाण दाखवण्यात आलाय. त्याच्या खाली लिहिले आहे साउथ पोल. दक्षिण ध्रुव.

अबाधित समुद्र मार्ग. त्याला तीर्थस्तंभ म्हटले जाते. मी चौकशी केली तर कळले की, या दिशेने सरळ गेले तर जमिनीच्या कुठल्याही अडथळ्याशिवाय आपण दक्षिण ध्रुवावर पोहोचू. दक्षिण ध्रुवाला सर्वाधिक जवळची भूमी म्हणजे सोमनाथ. ९९४६ कि.मी. मी सोमनाथाच्या शेजारी असलेल्या लाटांच्या बघताक्षणी प्रेमात पडलेलो. पण आता त्या लाटा मी पुन्हा पाहून घेतल्या. मला या भूमीचे प्रचंड अप्रूप वाटले. ती पहिली व्यक्ती कोण असेल जी या मार्गाने गेली असेल? मी त्या व्यक्तीला शोधत राहिलो. शोधत जाऊ म्हणजे सापडत जाईल.Saturday, March 12, 2011

चौकटीपलिकडची 'हिंदू'


नेमाडेंची हिंदू वाचण्यापूर्वी मी नेमकं सॉमरसेट मॉमचं ‘ऑफ ह्युमन बॉन्डेज’ संपवलं होतं. बॉन्डेज सॉमरसेटची आत्मचरित्रात्मक कादंबरी. सातशे पानांपेक्षा मोठी. पण बॉन्डेजमध्ये युरोपातला असाही एक काळ उभा राहतो ज्यावेळेस विविध कलेत नवनवीन अविष्कार जन्माला येत होते आणि तेच लोक जगण्यासाठी प्रचंड संघर्षही करत होते. सॉमरसेटच्या लिखाणाची जादू अशी की एवढी सोपी इंग्रजी कशी काय लिहिली जाऊ शकते असा प्रश्न पडतो. सोप्या भाषेमुळे पुस्तक प्रवाहीत राहतं आणि आपण प्रसंगाचा कधी भाग होऊन जातो कळत नाही. एका ठिकाणी सॉमरसेट म्हणतोही, सगळ्यात अवघड काय असेल तर ते सोपं लिहिणं. हिंदू वाचताना मला बॉन्डेजची आठवण येत राहिली. कारण सोप्या भाषेत हिंदू लिहिणं नेमाडेंना खरंच एवढं अवघड होतं?
हिंदूचा आवाका प्रचंड आहे. प्रत्येकालाच तो पेलेल याची खात्री देता येत नाही. हिंदूत काळ, अवकाश याची तर अशी काही गुंफण घातलीय की वाचल्यानंतर अनेकांनी वह्या घेऊन गणितं मांडायला सुरुवात केल्याचं दिसतंय. खंडेरावचं वय कुठलं? कुठल्या काळात हिंदूचं कथानक घडतं? हिंदूतल्या पात्रांची वयं किती? हिंदूत दिसलेला इतिहास आणि भूगोल खराच तसा आहे काय? हिंदूनं राम खराच कोण होता, याचं उत्तर दिलंय का? आर्य, द्रविड कसे होते? आर्य नेमके कुठले आणि त्यांच्या आताच्या पिढ्या कुठल्या? आर्यांनी खरंच द्रविड लोकांचा विश्वासघात केला का? हिंदूत दिसलेला पाकिस्तान खरंच तसा आहे काय? हिंदूत रेखाटली गेलेली त्या त्या जाती, धर्माची पात्रं वास्तववादी वाटतात का? राम खरंच मांसाहारी होता काय? हिंदूत उभ्या राहिलेल्या बायकांचं जीवन खरंच एवढं भीषण आहे काय? हिंदूच्या प्रत्येक पानावर आलेल्या ओव्या, म्हणी, अभंग वाचणाऱ्याला ठेचा देतात की आशय दिर्घ करतात? हिंदू पसरट झालीय काय? एक ना अनेक प्रश्न हिंदूनं निर्माण केल्याचं दिसतंय. खरं तर नेमाडेंच्या म्हणण्यानुसार हिंदू त्यांनी लिहिली ती अनेक प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी, शोधण्यासाठी. पण मग हिंदूनं उत्तरांपेक्षा प्रश्न जास्त निर्माण केले की प्रश्नांची उकल करता करता हिंदू क्लिष्ट झाली?
नेमाडेंची कोसला ही मराठीतली सर्वाधिक वाचली जाणारी कादंबरी. लातूर, जळगाव तर सोडाच पण पुण्या मुंबईतल्या कॉलेज कट्ट्यावर टॉम क्रुझच्या मिशन इम्पॉसिबल आणि त्याला जोडूनच कोसलावर कट्टा जमवणारे पोरा पोरींचे टोळके दिसले की नेमाडेंची क्रेझ किती पिढ्यानंतरही टिकून आहे हे दिसतं. नेमाडेंची कोसला जेवढ्या उंचीची आहे ती उंची हिंदूनं गाठलीय ?
कोसला अभिजात आहे आणि हिंदूचा आवाका प्रचंड. साहजिक आहे कोसला नेमाडेंनी अवघ्या काही दिवसात लिहिली आणि हिंदूसाठी नेमाडेंनी ३५ वर्ष लावले. कोसला त्यांनी सहज लिहिली तर हिंदू नेमाडेंनी संशोधन करून लिहिली? संशोधनात जे जे काही सापडलं ते ते लिहिण्याचा मोह कदाचित नेमाडेंना रोखता आलेला नाही. त्यामुळेच अनेक ठिकाणी हिंदू संदर्भहीन वाटत राहते. नेमाडेंच्या संशोधनानं आपण आश्चर्यचकित होतो. विठ्ठलाचं दर्शन झाल्याचा साक्षात्कार होईल पण वाचक म्हणून मी विठ्ठलाच्याच दर्शनाला निघालो होतो की आणखी काही हवं होतं नेमाडेंकडून? ते जे काही हवं होतं ती देण्यात यशस्वी झालीय का हिंदू?
होय! गोष्ट सांगा राव खंडेराव म्हणणाऱ्या नेमाडेंनी हिंदूत अशा काही गोष्टी सांगितल्यात की त्यातल्या प्रत्येक गोष्टीसाठी त्यांना नोबेल द्यायला हवं. कारण प्रत्येक गोष्टीला एका कादंबरीचा आवाका आहे. म्हणजेच नेमाडेंची हिंदू अनेक कादंबऱ्यांची अनुभूती देणारी एक महान कादंबरी आहे. त्यामुळे काही प्रसंग वाचल्यानंतर आपल्याला काही वेळ जाऊ द्यावा लागतो आणि मग पुन्हा मोकळे झालोत की पुढचा प्रसंग. एका दूरच्या प्रवासावर असल्याचा अनुभव. काही प्रसंग तर चार एक वाक्यात एवढे सहज आलेत पण ते केवढं मोठं आकाश आपल्यासमोर मोकळं करतात. उदाहरणार्थ अलीच्या वडीलांचा खून. जे हिंदूची प्रेतं घेऊन आलेल्या आगगाडीत रडणाऱ्या, ओरडणाऱ्या लहान मुलांना कर्फ्यु असतानाही पाणी पाजायला गेले आणि बाकाखाली लपलेल्या कोणाकडून तरी ते मारले गेले. मारणारा हिंदू होता की मुसलमान काही कळलं नाही. फाळणीची दाहकता सांगण्यासाठी नेमाडेंची एवढी एक गोष्ट पुरेशी आहे.
खुशवंतसिंग यांनी ‘ट्रेन टू पाकिस्तान’ लिहून जे काही सांगण्याचा प्रयत्न केलाय तो नेमाडेंच्या हिंदूत अवघ्या चार ओळीत आलाय. गोष्ट सांगण्याची ही केवढी मोठी हातोटी.
भाषा शुद्धतेचा आग्रह धरणारे लोक भाषेला एका विशिष्ट वर्गाची मालमत्ता करण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामुळे संकरीत भाषेलाही सदाशिव पेठी विद्वानांचा विरोध असतो. नेमाडेंच्या हिंदूत मराठीची किती रूपं पाहायला मिळावीत? पाकिस्तानमध्ये सुरु झालेला खंडेरावचा प्रवास जसजसा मुलतान, लाहोर, अमृतसर, दिल्ली आणि तिथून पुढं मध्य भारत आणि मोरगावकडे होत राहतो तसतशी नेमाडेंच्या हिंदूतली मराठी भाषा आणि प्रसंग कुस बदलत राहतात.
खंडेरावचे पाकिस्तानातले दिवस मराठीत वाचत असताना असं कुठंही वाटत नाही की जाणीवपूर्वक उर्दू किंवा हिंदी शब्द तोंडी लावण्यासाठी वापरलेत. नेमाडेंनी शमशाद बेगमचा आवाज रेडिओवर गुलशन कार्यक्रमात इतक्या सहजपणे ऐकवलाय की आपण रात्रीतून तीन वेळा मोहमदराम अज कराची ढाब्यावर सहज जाऊन येतो. डॉ.जलील, अली, दिलवर यांचं जगणं वाचताना आपल्याला आपल्या वर्गातला हनिफ आणि कॉलेजच्या गेटवर उधारीवर कधीही पैसा न विचारता चहा देणारे शुकुरचाच्या आठवल्याशिवाय राहात नाहीत. धडक रहा है दिल तो क्या की धडकने न गिन, फिर कहाँ ये रातदिन अशा काही रेकॉर्डीनी पाकिस्तान सहज जीवंत होत जातो.
पाकिस्तानमधला प्रवास रेखाटताना नेमाडेंनी ज्या पद्धतीनं तिरोनी आत्याचं पात्र हिंदूत पेरलंय त्याला तोड नाही. नेमाडेंच्या कोसलातल्या मनुचा मृत्यू जसा आपला आयुष्यभर पिच्छा पुरवतो तसंच खंडेरावच्या तिरोनी आत्याचं होतं. तिरोनी आत्याचा न लागलेला शोध आपल्या डोक्यात पोकळी निर्माण करतो आणि त्या पोकळीत आपण तिला शोधू लागतो. ही केवढी मोठी भग्नअवस्था?
दिलवरचं आयुष्य मांडताना कोळ्याच्या नशीबाची सांगितलेली गोष्ट, जागोजागी फैजच्या पेरलेल्या नज्म, नुरजहाँची एका ओळीत मांडलेली शोकांतिका, इक्बालच्या ओळी आपल्या डोक्यातला पाकिस्तान सहज बदलून टाकतात.
विशेष म्हणजे मुस्लिम समुदयाचं चित्रं रेखाटताना बुरखे, नमाजाचे भोंगे, मशिदी यांचं वर्णन कऱण्याचा मोह अनेकांना आवरत नाही, नेमाडेंनी मात्र तो प्रकर्षानं टाळलाय आणि तरीही नेमाडेंचा पाकिस्तान अमृता प्रीतम, गुलजार, सआदत हसन मंटो यांच्या कथा कादंबऱ्यात दिसलेल्या पाकिस्तान एवढाच परिपूर्ण आहे.
हिंदूतली तिरोनी आत्या जर कोसलातल्या मनुची आठवण करून देत असेल तर हिंदूतलं धनजी बुवाचं मडकं कशाचं आठवण करून देतं? जी.ए. कुलकर्णींच्या राधीची की कोसलात गायब झालेल्या गिरधरची? शेवटच्या वेळेस त्यानं चल म्हणाला तर जायला हवं होतं त्यानं आपल्याला त्याच्या आयुष्यातलं काही तरी भयंकर सांगितलं असतं अशी खंत कोसलात पांडुरंग सांगवीकर शेवटी व्यक्त करतो. त्यानंतर आपण आयुष्यभर गिरधरनं काय सांगितलं असतं या भोवऱ्यात सापडतो. तोच भोवरा हिंदूत दिसतो तो धनजी बुवाच्या मडक्यात.
धनजी बुवाच्या मडक्याचा प्रसंग वाचल्यानंतर मी पुढं नाही वाचू शकलो. पुस्तकात खून केली आणि ठेवून दिलं. कुणाशीच न बोलता तसाच अंधारात बराच काळ पडून राहिलो. कुणाशी बोलण्याची वासनाच नाही राहिली. असं का झालं? धनजीबुवानं जे दु:ख अनुभवलं जे नेमाडे इतकीवर्ष अश्वथ्थाम्याच्या जखमेसारखं स्वत:बरोबर घेऊन फिरले असतील, ते दु:ख आपल्याला सांगून नेमाडेंची मुक्तता झाली असेलही कदाचित. पण आपण त्या भोवऱ्यात कायमचे अडकलो त्याचं काय?
धनजीबुवाचा प्रसंग उणापुरा पाटपोट पाणाभराचा. पण तो एक प्रसंग काय सांगत नाही? आपली अवस्था धनजीसारखी नाही कशावरून? घरदार,शिवार सोडून पैसा कमवण्यासाठी देशोदेशी आपण काय उगीचच मनोरंजन म्हणून भटकतोय? किती काळ? अनंत पिढ्यांची ही साखळी? धनजीला जसं वाटलं की छनछन कलदार चांदीचा आवाज म्हणजे सगळ्या जगावर हुकूमत गाजवता येण्याचा आत्मविश्वास तसं आपल्याला वाटत नाही? असे आपण एकटेच आहोत की ही न संपणारी लाल मुंग्यांची जमात? आपण एकटेच असतो तर मग वास्को द गामा भारतात आला असता का आणि कोलंबसला अमेरिकेचा शोध लागला असता? लाखो लोक एकमेकांच्या घामाचा वास घेत शंभर एक किलोमीटर एकमेकांच्या तंगड्यात तंगडे टाकून मुंबईच्या लोकलमधून काय पर्यटनासाठी ये जा करतात? संध्याकाळी घरी परतल्यानंतर त्यांना धनजीसारखा नोटांचा आवाज न येताच ते सुखानं झोपत असतील? धनजीनं शेवटी स्वत: जवळचे सगळे रूपये मडक्याच्या आत टाकून मधूर प्रतिध्वनी ऐकण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस त्याला काय सापडलं? पोकळी. सकाळी घराबाहेर पडणाऱ्या माणसाला आज काय सापडतं पोकळीच ना? जसा धनजी अनंत वर्षाचा तळ पाहात राह्यला तसेच आपणही कित्येक ना? शेवटी ते पाहण्यातच धनजी गुदमरला आणि मडकं त्याच्या मुंडक्याला तसंच राह्यलं. खरं तर तो एकदाचा सुटला. आपला तर रोजच धनजी होतो त्याचं काय? दररोज मरण्याचा आपल्याला शाप नेमक्या कुठल्या जन्मात मिळाला असेल? नेमाडे शेवटी म्हणतातही, खंडेराव, ह्या आकाशाच्या पोकळीत तूही तसाच तोंड खुपसून पाहतो आहेस. हे तेच मडकं आहे.
नेमाडेंची हीच गोष्ट सआदत हसन मंटोच्या ‘टोबा टेक सिंह’ची आठवण करून देते. टोबा टेक सिंह आणि धनजी बुवा म्हणजे तळ न सापडलेल्या कोट्यावधी लोकांच्या जगण्याचं प्रतीक.
हिंदू ही स्थलांतरीतांची कादंबरी आहे. खुद्द हिंदूचा नायक हा एका प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशात जाणारा तिथल्या सामाजिक, सांस्कृतिक कोलाजच्या प्रेमात पडणारा. एवढंच नाही तर एका प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशात स्थिरावणाऱ्या माणसांमुळेच मुळच्या समाजाचा विकास होतो, त्यांच्या जगण्याची श्रीमंती वाढते असा वैश्विक संदेश देणारा आहे, भलेही त्यात संघर्ष असेल. हिंदूत ‘ग्रेट मायग्रेशन’ मांडताना नेमाडेंनी जी सकलेच्या मारवाड्याची गोष्ट सांगितलीय ती वैश्विक आहे. एवढंच नाही तर शेतकऱ्याच्या दारिद्र्याचं मुळ शेतीतच असल्याचं वास्तवही मांडते. दारीद्र्यातून मुक्त व्हायचं असेल तर शेतीतून बाहेर पडा असं सांगणाऱ्या शरद जोशींच्या शेतकरी आंदोलनाची आठवणही हिंदू वाचताना होते. बहुजन ‘भारता’तच का राहिले आणि ब्राम्हण,मारवाडी असे समाज ‘इंडिया’चे कसे झाले याचा विस्तीर्ण पट नेमाडेंनी सकलेच्या मारवाड्याच्या गोष्टीतून मांडलाय.
सकलेच्या मारवाड्याची गोष्ट एवढी चांगली आहे की आपण आपसुकच नेमाडेंना दाद देऊन जातो. सुकलाल हा खंडेरावचा लहानपणीचा दोस्त. सुकलालच्या आजोबांना खंडेरावच्या आजोबांनी मारवाडहून स्वयंपाकी म्हणून घेऊन आले. त्यावेळेस सुकलालचे आजोबा स्वयंपाकी होते तर खंडेरावच्या आजोबांची पत काशीला सोन्याची मांजर अर्पण करण्याची. आता त्यांच्याच पुढच्या पिढ्यांची स्थिती काय आहे? खंडेराव २०० रूपये महिना पगाराची नोकरी शोधतोय तर सुकलाल आणि त्याचे पाच काका जळगावच्या शंभर कोटीच्या व्यापाराचे मालक आहेत. हे कसं झालं?
एकदा सुकलाल दुकानावर बसलेला. त्याचे वडिलही दुकानात आहेत. त्यावेळेस तिथं एक दारूडा येतो आणि खजुरला राकेलचा वास असल्याचं सांगत शिवीगाळ सुरु करतो. सुकलालचे वडील त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न करतात. पण दारूड्याची शिवीगाळ सुरुच राहते. काही वेळानं दारूडा निघून जातो. त्यावेळेस सुकलाल वडिलांना संतापून म्हणतो, काय ऐकून घेता नानाजी? किती शिव्या दिल्या त्यानं? त्यावेळेस सुकलालचे वडील त्याला म्हणतात, काही तरी देऊनच गेला नं? घेऊन तर गेला नाही नं? कुछ देकं ही गया नं? लेकं तो कुछ नही गया नं? खुशी राख्यो. खुशी महत्वाची.
काहीच टाकाऊ न समजणारा समाज कसा समृद्ध होत जातो आणि त्यातूनच समृद्ध सांस्कृतिक अडगळ कशी तयार होते हे सांगायला सकलेचा मारवाड्याचा प्रसंग पुरेसा आहे.
भौतिकदृष्ट्या विकसित असलेल्या किंवा पैसा असलेल्या समाजाचा समाचार घेणारी काही गृहीतकं फार प्रेमानं पूर्वापार बाळगली जातात. मग त्यात ब्राम्हण आहेत मराठा आहेत आणि मुसलमानही. मारवाडी बायकाही त्यातून सुटलेल्या नाहीत आणि पुरूषही. पण गृहीतकं कुठल्या गर्भाशयात जन्माला येतात? नेमाडेंनी तेही शोधलंय. सुकलालच्या पाचही काकांच्या बायका राजस्थानातल्या. सारख्या दिसणाऱ्या. एकत्र कुटुंब पद्धती. एकाच घरात पाच जणांच्या पाच झोपायच्या खोल्या. रात्री जेवणं झाल्यावर सगळेच जण दिवसभराचा हिशेब करत बसायचे आणि नंतर एक एक जण खोलीत जाऊन झोपायचा. एकदा धाकटा नथूमल चुकून मधल्याच खोलीत शिरून झोपला. त्यामुळे नंतर आलेले सगळेच असेच चुकीच्या खोलीत झोपले. सकाळी हे सगळं उघड झालं पण व्हायची ती गोष्ट होऊन गेलेली. नंतर ही गोष्ट गावभर झाली. मग काय मारवाड्याच्या सारख्या दिसणाऱ्या पोरांना गावातल्या बायका बोलवायच्या आणि कुणाचा रे तू म्हणून विचारायच्या. त्यानं बापाचं नाव सांगितलं की पोट धरून हसायच्या.
हसायच्या शब्दानंतर कुठलाही फापट पसारा न मांडता नेमाडेंनी फक्त एक शब्द लिहिलाय. ‘धनमत्सर’ आणि पूर्णविराम दिलाय. मारवाड्यांना विशेषत: बायकांना एका शब्दात नेमाडेंनी संशयमुक्त केलंय.
अशा कित्येक गोष्टी नेमाडेंनी हिंदूत सहजपणे सांगितलेल्या आहेत. पण हिंदूचं मोठेपण नेमाडेंनी सांगितलेल्या गोष्टीत नाही. ते उत्तम गोष्टी सांगतात हे कोसला, बिढार, झूल, जरीला या त्यांच्या कादंबऱ्यांनी अगोदरच सिद्ध केलंय. हिंदूची संपत्ती आहे ती नेमाडेंनी हिंदूत जीवंत केलेल्या बायका.
मी उद्धव शेळकेंची ‘धग’ वाचलीय. एक कलाकृती म्हणून ती कोसलापेक्षा कितीतरी पटीनं सरस आहे. पण शेळकेंनी धगमध्ये जी कौतिक उभी केलीय तिची सर अजून तरी कुणाला नाही. शेषराव मोहितेंच्या ‘ असं जगणं तोलाचं ’ मधल्या धुरपा, कासा आणि आनंद यादवांच्या झोंबीतली तारा, रा.रं. बोराडेंच्या पाचोळ्यातली ‘ पार्बती ’ या काही इतर नायिका ज्या कौतिकच्या परिघरात उभ्या राहतात पण ‘ कौतिक ’ होत नाहीत.
नेमाडेंच्या हिंदूत नेमक्या किती बायका येतात आणि जातात हे लक्षात ठेवणं अवघड आहे. पण एका वाक्यापुरता जीव असूनही त्या आपल्या जगण्यात खड्डा पाडतात जो बुजणं अवघड आहे. मग ती खंडेरावची आई असो की आजी-पणजी. एवढंच नाही तर बिजा, छबा, सुभी, आंधळी काकू, धाकटी शशी, मुकी काकी, बायडी, तायडी अशा एक ना अनेक. धनाबय महारीण, सोनफुई चांभारीण, अंबू मांगीणमाय अशी काही पात्रं तर फक्त उल्लेखापुरतीच येतात आणि अडगळीत पडलेल्या एक जगाचा कवडसा दाखवतात पण तेवढ्याशा उजेडानंही आपल्या जगण्यावर सावली पडते.
विशेष म्हणजे कौतिक, धुरपा, कासा, पार्बती आणि हिंदूतल्या बायकांचं जगणं हे एकाच जातकुळीतलं आहे. हिंदूतल्या बायकांचं जग पुरूषप्रधान संस्कृतीच्या गराड्यात बायका कुठल्या स्तरापर्यंत पिचल्या जातात, शोषल्या जातात याचं ज्वलंत चित्रं उभं करतं.
याच पार्श्वभूमीवर नेमाडेंनी मंडीचं पात्र उभं केलंय. डॉ. मंडी ही संशोधनासाठी लंडनहून आलेली स्कॉलर. संशोधनासाठी तिनं नवऱ्यालाही घटस्फोट दिलाय. लभाणी बायकांची परंपरा ऐकूण ती मोरगावला येते. झेंडीच्या प्रणयनितान्ततेचे रहस्य शोधून काढण्याचा प्रयत्न करते. मंडीचे संशोधकी उद्योग उभे करतानाच भारतीय बायकांची मुक्ती कशात आहे ते नेमाडेंनी भावडूच्या पत्रातून दाखवलंय. ह्या विदुषी बाईमुळेच मला कळलं की, लैंगिकदृष्ट्या मुक्त झाल्याशिवाय असा निधडेपणा बायकांना येणार नाही. बस. बाकी दुसरं काही नाही. मुक्त ह्या संस्कृत शब्दाऐवजी आपला देशी शब्द मोकाटच ह्या संदर्भात वापरला पाहिजे. बस. तेवढं एक झालं की आपल्या मुली सुधारल्याच समज. नेमाडेंनी स्त्री मुक्तीची मांडलेली ही भूमिका काही पहिल्यांदा आलेली नाही पण त्यांनी ज्या पद्धतीनं ती हिंदूत पेरलीय ती एक सहजप्रक्रिया वाटते आणि म्हणूनच पटतेही.
मराठ्यांनी देशभर बाळगलेली पेंढारी संस्कृती, लभाणी बायकांचा बेधडक आणि जगण्याचा बेधुंदपणा, झेंडी गणिकेची गोष्ट, वारा, गजरा , इरदत्नी, आवंती, हरखू, खरखोती या लभाणी बायकांच्या गोष्ट सांगताना उभ्या राहिलेल्या काळानं आपला सांस्कृतिक परिघ दिर्घ होतो. ज्या काळात ‘एकेरी’ सांस्कृतिक चळवळीचे आवाज ऐकायला मिळतायत त्यावेळेस हिंदूतला हा व्यामिश्र सांस्कृतिक पट समृद्धतेचा संदेश देतो. एवढंच नाही तर इतिहासाच्या पुस्तकातून ही संस्कृती पिढ्यानपिढ्या दूर ठेवून आपण काय मिळवलंय हे समजत नाही.
नेमाडेंच्या लिखाणाची एक पद्धत आहे. हिंदूत शेकडो स्त्री-पुरूष पात्रं येतात. त्यातलं कोण कुणास बोलतंय हे नेमाडेंनी कुठंही लिहिलेलं नाही. तरीही कोण कुणास बोलतंय हे स्पष्टपणे कळतंय. नेमाडे कधीही पात्रं उभी करण्याच्या भानगडीत पडत नाहीत. त्यामुळे पात्रं एखाद्या वस्तुसारखे अंगावर येऊन कोसळतात. कधी कधी त्यांची एवढी गर्दी होते की आपल्याला दोन ओळीच्या पूर्वी कोण भेटलं होतं आणि आता कोण भेटतंय हेच कळत नाही. आपण एखाद्या चेंगराचेंगरीत तर सापडत नाहीत ना असं होऊन जातं पण ते आपल्या अनुभूतीचा आनंद हिरावत नाहीत हेही तितकच खरं.
आणखी एक गोष्ट हिंदूत प्रत्येक पानावर आहे. ती म्हणजे भन्नाटपणे केलेले भाष्य. ऐतखाऊ नागरी समाज आधीच स्वत:च्या आतल्या हिंसेच्या भुसभुशीत पायावर उभा असतो किंवा ज्या शोधाला वेड्यात काढलं नाही त्या शोधाचं भविष्य धोक्यात असतं किंवा मनापासून कोणालाच वाटत नाही की आपलं नशीब पुन्हा झोपावं. एकदा लाथ मारलेलं नशीब पूर्ण सूड उगवूनच तुमच्याबरोबर कबरीत झोपी जाईल. किंवा आलेला दिवस का मुक्कामाला असतो अशा वाक्यांचं संकलन केलं तरी ते काही पानांचं वेगळं पुस्तक तयार होईल. विशेष म्हणजे नेमाडेंची अशी वाक्य टाकण्याची प्रकृती नाही. कोसला, बिढार, जरीला, झूल, हूल या कादंबऱ्यांमध्ये एखादा प्रसंग आल्यानंतर प्रसंगाची गरज म्हणून काही वाक्य आलेले आहेत पण नेमाडेंचा नायक मग तो पांडुरंग सांगवीकर असो की चांगदेव पाटील हा फक्त ‘ बघ्या ’ राहिलेला आहे. हिंदूचा खंडेराव मात्र सक्रिय झालाय. त्यामुळेच नेमाडेंच्या आतला तत्वेत्ता हिंदूत जागा झालेला दिसतो.
हिंदूतलं स्थलांतर स्थिरावलेलंही दिसतं. अनेक लहान मोठ्या जमातींचं वास्तव चित्र नेमाडे रेखाटतात. त्यामुळे हिंदूची वीण बहुरंगी झालीय. गावाकडे अजुनही गोधडी शिवली जातात. त्या गोधडीला घरात पडलेल्या धोतराचं पातही जोडलेलं असतं आणि लहानग्याच्या चड्डीचा खिसाही. दोरा वापरला जातो तोही वेगवेगळ्या रंगांचा. मिळेल तसा. त्यामुळे गोधडी बहुरंगी, बहुढंगी दिसते. भिल्ल, लभाणी, पावरा, नाईक, कोरकू, तडवी, धनगर, अशा किती तरी जमाती हिंदूत पसरलेल्या आहेत. त्यामुळे हिंदूही बहुरंगी, बहुढंगी झालीय. त्या त्या जमाती शिवताना नेमाडेंनी त्याच जमातीतल्या शब्दांचा दोऱ्यासारखा वापर केलाय. त्यामुळे तथाकथित प्रमाण भाषेत नसलेले शेकडो शब्द हिंदूत जागोजागी सापडतात. उदाहरणार्थ अधोडी, बिंदल्या, करगोटी, उदाशी, बन, उंडगी, काळमुखं, कटप, वैरणं, पाखडणं, भड, असे शेकडो शब्द. या शब्दांनी फक्त हिंदूच श्रीमंत झालीय असं नाही तर मराठी भाषेचं भांडारही वाढलंय. नेमाडेंचं हे योगदान कसं नाकारता येईल?
एक गोष्ट खरी की पाना पानावर रूढ अर्थानं वापरात नसलेले अनेक शब्द येत असल्यानं त्यांची प्रतिमा आपल्या मेंदूत चमकत नाही. त्यामुळे काही वेळेस हिंदू आपल्याला धाप लावते. एका कादंबरीकारावर एक संशोधक भारी पडला की काय अशीही शंका येत राहते. पण काय सांगता येईल तशा प्रतिमांच्याच शोधात एक दिवस एखादी पिढी निघेल ज्यावेळेस नेमाडेंची हिंदू त्यांचं ‘ बायबल ’ होईल. ‘हिंदू’ मराठीतून गेलेल्या किंवा लोप पावत असलेल्या किंवा परिचीत नसलेल्या अशा हजारो शब्दांची डिक्शनरी आहे.
हिंदूच्या पसाऱ्यानं सहा प्रकरणं व्यापलीयत. यातलं पाचवं प्रकरण ११८ पानांचं आहे. पहिली चार प्रकरणं म्हणजे नेमाडेंच्या चार अभिजात कादंबऱ्या. सहावं प्रकरणही क्लासिक ज्यात खंडेरावच्या बापाचा अंत्यसंस्कार होतोय. तो फार धगधगीत आहे. पाचवं प्रकरण म्हणजे नेमाडेंचा राम गोपाल वर्मा कसा झाला याचं उदाहरण. राम गोपाल वर्मानं ‘ सत्या ’सारखा एक अभिजात सिनेमा तयार केला आणि नंतर तो वेगवेगळ्या नावानं स्वत:च्याच सिनेमाचं रिमेक करत सुटला. परिणाम आपल्यासमोर आहे.
नेमाडेंच्या कोसलात एक मोठा ट्रॅप आहे. खरं तर तो ट्रॅप बिढार, झूल, जरीला यांच्यातही आहे ज्यात अनेक चांगल्या मराठी कादंबरीकारांचे बळी गेले.
तो ट्रॅप असा की नायक कॉलेजात शिकणारा असेल तर त्याचे कॉलेजचे किस्से रंगवायचे आणि तो कॉलेजात शिकवणारा असेल तर सहकाऱ्यांचे किस्से रंगवायचे. पण कोसला अभिजात झाली ती पांडुरंग सांगवीकरच्या भन्नाट जगण्यानं त्याच्यासोबत मनूसारख्या गोष्टी सांगितल्यानं. जरीला, झूल, बिढार, हूल यांच्यातही नेमाडेंनी तोच धागा कायम ठेवलाय पण नेमाडेंनी चारही कादंबऱ्यांमधून जो समाज चितारलाय त्यानं नेमाडेंना फक्त मराठीतलेच नाही तर भारतीय भाषांमधल्या सर्वोत्तम कादंबरीकारांच्या पंगतीत बसवलं. नेमाडेंच्या याच फॉरमॅटचा मोह कित्येक कादंबरीकारांना आवरता आला नाही. मग त्यात राजन गवसची ‘कळप’ अडकली, शेषराव मोहितेंची ‘ धूळपेरणी ’ सापडली आणि कमलेश वालावलकरच्या ‘ बाकी शून्या ’च्या शेवटी फक्त शून्य राहिले.
नेमाडे ज्यांनी ज्यांनी वाचला आणि नंतर जे जे लिहिते झाले त्यापैकी फार थोडे नेमाडेंच्या गारूडातून मुक्त होऊन स्वत: चं लिहू शकले. खरं तर चाळीशीपर्यंत कुठलाही कलाकार अभिजात निर्मिती करतो आणि नंतर तो पहिल्याचं कॉपी करत जातो. खुद्द नेमाडेही त्यातून सुटले नाहीत याचं उदाहरण म्हणजे पाचवं प्रकरण. हे प्रकरण रटाळ आहे, वाचलं जाऊ शकत नाही, नेमाडेंनी लिहिलंय म्हणूनही नाही. ते पुढच्या आवृत्तीत शक्य असेल तर काढून टाकावं एवढं ते टाकाऊ आहे.
ज्या वेळेस एखाद्या दोन पानाचं ललित लिहायचं असतं त्यावेळेस ते कसंही शब्दबद्ध केलं तरी चालतं. कारण वाचणाऱ्याला माहित असतं आपल्याला फक्त दोनंच पानं वाचायचीयत त्यामुळे तो सहज वाचून जातो. पण ज्यावेळेस सहाशे पानांपेक्षा जास्त पसारा मांडायचाय त्यावेळेस त्याला एक सांगाडा लागतो. कान, नाक, डोळे, हात पाय असं सगळं लागतं. एवढंच नाही तर ते सगळं जिथल्या तिथं लागतं आणि तेही व्यवस्थित तरच एक चांगला जीव तयार होतो.
वाचनीयता ही कुठल्याही पुस्तकाची पहिली अट आहे. मला जे काही हिंदूबद्दल एक वाचक म्हणून वाटलं ते मी लिहिण्याचा प्रयत्न केलाय. एखादी कादंबरी मला अनेक आयुष्य जगण्याचा अनुभव देतं का एवढी एक माफक फुटपट्टी लावून मी वाचत जातो. सॉमरसेटला मी वाचत गेलो कारण त्यानं मला ‘द मून अँड सिक्सपेन्स’मध्ये चार्ल्स स्ट्रीकलंडच्या रूपानं अकल्पीत व्यक्तीचं आयुष्य जगण्याचा अनुभव दिला. नंतर मग मी त्याची द पेन्टेड वेईल, द समिंग अप ही पुस्तकही झपाटल्यासारखी वाचली. संथ समुद्रात दूरवर प्रवास करून आल्यासारखं वाटलं. हिंदूनंही मला असेच अनेक आयुष्य जगण्याचा अनुभव दिला. कादंबरी लिहिण्याचे तीन नियम आहेत आणि दुर्देवानं ते कुणालाही माहित नसल्याचं सॉमरसेट म्हणतो. हिंदू फसली असं म्हणणारे, किंवा त्यात शिव्या भरपूर दिलेल्या आहेत असं म्हणणारे किंवा यात बौद्धांचं असं झालं, रामाचं असं नव्हतंच अशी हाकाटी पेटणारे स्वत:च्या वर्षानुवर्ष तयार असलेल्या चौकटांमध्ये हिंदूला बसवण्याचा प्रयत्न करतायत जेव्हा की हिंदू कुठल्याच चौकटीत न बसणारी एकमेव मराठी कादंबरी आहे.

Wednesday, January 12, 2011

काही तरी भन्नाट..शक्य असलेलं जग

झोप झालेली नसते त्यावेळेस अहमदाबाद येतं. सकाळ काहीशी निळसर वाटते, थांबल्यासारखी. दिवस उजाडण्यापुर्वी भरून राहिलेलं एक निशब्द जग. अहमदाबादला उतरतो, घ्यायला गाडी आलेली असते. मला गांधीनगरला जायचं असतं. गाडीत बसतो. अहमदाबाद रेल्वे स्टेशनवर कायम गर्दी असते. काही जण अजुनही झोपेतच असतात. पण गाडी गांधीनगर रस्त्याला लागली की शहर भर्रकन संपल्यासारखं वाटतं. शहरात कुठेही राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या होर्डींग्ज नाहीत की सकाळी सकाळी त्यांच्या मुंडक्यांचे फोटो पाहावे लागतील. मोदींचेही कुठे होर्डींग्ज दिसत नाहीत. अहो आश्चर्यम.
अहमदाबाद कुठं संपतं आणि कुठं गांधीनगर सुरु होतं हे लक्षात येत नाही. पण गाडी चकाचक रस्त्यांना लागली, ट्रॅफिकचे साईन बोर्ड सगळे जिथल्या तिथं दिसले, थोडीशी झाडी दिसायला लागली, स्वच्छ चौपदरी रस्ता लागला की आपण गांधीनगरमध्ये असल्याचं ओळखायचं. माझी आणखी एक खून. गाडीनं नर्मदेचा पाण्यानं भरलेला कॅनॉल ओलांडला की गांधीनगरमध्ये पोहोचल्याची पक्की खून पटते. मला ही जास्त जवळची वाटते कारण हे शांतपणे वाहणारं पाणी सातपुड्याच्या डोंगरात पडलेलं असेल ज्यानं गुजरात समृद्ध होतोय.
गांधीनगर हे राजधानीचं शहर. पण गुजरातची आर्थिक राजधानी अहमदाबादच. सगळे बाजार, व्यवहार अहमदाबादमध्येच. काही मोठी खरेदी करायची झाली तरी गांधीनगरहून अहमदाबादलाच आलेलं बरं. २० किलोमीटर पाऊनतासाचा रस्ता. अहमदाबाद-गांधीनगर म्हणजे दोन जुळी शहरं. सिकंदराबाद-हैदराबाद किंवा पुणे-पिंपरी चिंचवडसारखी.
जसे अहमदाबादमध्ये कुठल्या पक्षाचे पोस्टर्स दिसत नाहीत तसे गांधीनगरमध्येही नाहीत. ना काँग्रेस ना भाजपा ना नरेंद्र मोदी. गेल्या तीन एक महिन्यांपासून माझी कधी महिन्याला तर कधी पंधरा दिवसाला मुंबई-अहमदाबाद-गांधीनगर अशी फेरी असते. होत राहतील आमचं एक घर सध्या गांधीनगरला आहे.
गांधीनगरला होणाऱ्या चकरांनी माझ्यात सर्वात मोठा कुठला बदल झाला? मला वाटतं नरेंद्र मोदींबाबत माझं मत पुर्णपणे बदललं. मत बनवण्याची माझी एक पद्धत आहे. कुणी कितीही सांगितलं तरी इतरांच्या सांगण्यावरून माझं अमुक अमुक म्हणून मत बनत नाही. एक तर प्रत्यक्ष अनुभव घ्यायचा प्रयत्न करतो किंवा मग सारासार विचाराची फुटपट्टी लावतो. मोदींबाबतही तसच.
पाच सहा वर्षापासून मोदींबात उलटसुलट बरंच काही ऐकुण झालंय. त्यामुळे नैसर्गिकरित्या एक प्रतिमा डोक्यात तयार झाली. गुजरात दंगे घडवणारे मोदी. ते वास्तव आहेच. ते मोदीही नाकारणार नाहीत. पण तरीही मी मोदींच्या नेतृत्वानं भारावलोय.
गुजरातमध्ये सध्या व्हायब्रंट गुजरात समिट सुरु आहे. हे पाचवं जागतिक संमेलन. जवळपास ८० देशातून उद्योगपती गांधीनगरला तीन दिवसांसाठी एकत्र आलेत. गुजरातच्या विविध भागात गुंतवणूक होण्यासाठी मोदींनी सुरु केलेलं हे संमेलन दरवर्षी भरतं. एका व्यासपीठावर येण्याचं टाळणारे अंबानी बंधू मोदींच्या दोन्ही बाजुला बसलेले दिसतायत. एवढंच नाही तर टाटा, गोदरेज,महिंद्रा ही मंडळीही व्यासपीठावर आहेत. त्यांच्यासोबत देशोदेशीचे उद्योगपती गुजरातच्या गुंतवणुकीवर चर्चा करतायत. मोदींना हे जे जमलंय ते केंद्राला तरी जमेल?
गुजरात हे उद्योगी लोकांचं राज्य आहे. इथले लोक रेल्वेत टक्क्यांच्याच गप्पा मारतात हा माझा अनुभव. पण मोदी फक्त व्यापाऱ्यांचंच हित सांभाळतात का? नाही. गेल्या काही काळात मोदींनी राबलेल्या काही भन्नाट आयडीया त्याचा पुरावा. काही आठवड्यांपुर्वी गेलो होतो त्यावेळेस तिथं मोदींच्या ‘स्वागतम’ची चर्चा सुरु होती. मी थोडीशी माहिती घेतली आणि अवाक झालो.
स्वागतमची आय़डिया अशी. समजा तुमचं एखादं काम भूमी अभिलेख कार्यालयात आहे आणि तिथला अधिकारी तो करत नसेल तर ते काम घेऊन तुम्ही तालुका ‘स्वागतम’मध्ये जायचं. तहसिलदारदर्जाचा किंवा वरिष्ठाकडे तक्रार द्यायची. समजा त्यानंही काम नाही केलं तर ‘जिल्हा स्वागतम’मध्ये जिल्हाधिकाऱ्यांकडे जायचं. जिल्हाधिकाऱ्यानेही तक्रारीची दखल घेतली नाही तर मोदींकडे जायचं. मोदी स्वागतममध्ये आलेल्या तक्रारी संबंधीत विभागांकडे पाठवल्या जातात. संबंधीत अधिकाऱअयांसह राज्यभरातले जिल्हाधिकारी, एसपी मोदींसमोर लाईव्ह असतात व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे. दर काही महिन्यांनी सीएम स्वागतम असतंच.
तक्रारदाराला मोदी बाजुच्या खुर्चीवर बसवतात आणि संबंधीत अधिकाऱ्याला जाब विचारतात, का रे बाबा या व्यक्तीचं काम का नाही झालं? अधिकाऱ्यानं जर सांगितलं की तक्रारदारानं आवश्यक असलेले कागदपत्रं पुरवली नाहीत तर मोदी तक्रारदाराला विचारतात..समजा चुक अधिकाऱ्याची असेल तर मोदी तिथंच आदेश जारी करतात. आणि समजा तक्रारदारानं आवश्यकबाबींची पुर्तता केलेली नसेल तर त्याला तसं सांगतात..पण मोदी निर्णय देतात हे नक्की. विशेष म्हणजे हिरोगिरी करत नाहीत. म्हणजे उगिचच अधिकाऱ्यांना झापत नाहीत किंवा तक्रारदार सरळ मोदींकडेच आला असेल तर त्याला अगोदर संबंधीत पहिल्या अधिकाऱ्याकडे पाठवतात. तालुका स्वागतममध्ये हे विशेष.
स्वागतममध्ये जाऊन आलेल्या एका पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलेलं अनुभव अधिक बोलका आहे. एक जण मोदी स्वागतममध्ये एका अनाधिकृत बिल्डिंगची तक्रार घेऊन गेला. बिल्डींग तर अनाधिकृत आहेच पण सोसायटीतले लोक त्रास देतायत अशी तक्रार. मोदीनं संबंधीत शहराच्या जिल्हाधिकारी आणि संबंधीत पालिकेच्या अधिकाऱ्यांना विचारलं की तक्रारीत किती तथ्य आहे? अधिकाऱ्याला स्पष्ट उत्तर देता येईना? त्याची तारांबळ उडाली? मोदींनी एक साधा प्रश्न विचारला की बिल्डींग अनाधिकृत आहे की नाही? अधिकाऱ्यानं अखेर सांगितलं हो..अनाधिकृत आहे..मग पाडली का गेली नाही? मोदींचा पुढचा प्रश्न. कारण बिल्डींगमध्ये सगळे दादा लोक राहतात. अधिकाऱ्याचं उत्तर..मोदींनी फॅक्सवरून बिल्डींगचे सगळी कागदपत्रं लगेचच मागवून घेतली. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ती तिथंच तपासली आणि बिल्डींग अनाधिकृत असल्याचं सांगितलं. मोदींनी आदेश दिला की ही बिल्डींग उद्या संध्याकाळपर्यंत पडली पाहिजे मग ती कुणाचीही असो आणि तसा रिपोर्ट सादर करा..मोदींचा झटपट निर्णय.
या स्वागतमचा परिणाम असा आहे की कुठलाच अधिकारी एखाद्या व्यक्तीला भेटायचं टाळू शकत नाही. कारण भेट टाळली तर तो तक्रार मोदींकडे घेऊन जाईल अशी भीती. त्यातून अधिकाऱअयांना तक्रारदारांची फक्त भेटच घ्यायचीय असं नाही तर तक्रारीचं निवारणंही करायचंय म्हणजेच काहीही करून कामातून सुटका नाही. आपल्याकडे कधी हे होईल? आमदार, मंत्र्यांचा दरबार भरवला तर त्यात तेच गायब असतात आणि अधिकारीही तिकडं फिरकत नाहीत.
मोदींनी इतर राबवलेल्या काही कल्पनांनी तर अवाक व्हायला होतं. गुजरातला वाचतं करायचंय तर काय करावं? मोदींनी सांगितलं ‘वाँच्छे गुजरात’. म्हणजे राज्यातल्या सामान्य लोकांसह सगळे अधिकारी मग तो कारकून असो की सुपर क्लास वन. सगळ्यांनी कुठल्याही वाचनालयात जाऊन तासभर वाचायचं. काहीही वाचा पण वाचा. त्याची सुरुवात खुद्द मोदींनी केली. मोदीच गेले म्हटल्यानंतर मंत्री गेले, अख्ख मंत्रीमंडळ गेलं म्हणजे अधिकारीही गेलेच, जावंच लागणार तसा अधिकृत आदेश असतो. अन्यथा कारवाई त्यामुळे दांडीला संधी कमी. वाचनाचा अहवाल अधिकाऱ्यांना सादर करावा लागतो. त्यावर चर्चा होते. आपल्याकडे जसं ज्ञानेश्वरीचं पारायण होतं तसं गुजरातमध्ये वाँछे गुजरातची पारायणं लागली. अख्खं गुजरात वाचत राहिलं. एका कल्पनेनं अख्खा गुजरात जोडला गेला. करिश्मा तयार होणार नाही तर काय?
पुढच्या दोन आयडिया ऐकल्यानंतर तर तुम्हीही मोदींना दाद द्याल. मोदींनी ‘गुणोत्सव’ नावाचा कार्यक्रम राबवला. म्हणजे राज्यातल्या सगळ्या अधिकाऱ्यांनी मग तो क्लास वन असो की सुपर क्लास वन. प्रत्येक दिवशी पाच असं तीन दिवस १५ शाळांमध्ये जाऊन शिकवायचं. तीन दिवसांसाठी ही त्यांची अधिकृत ड्युटी. राज्याच्या मुख्य सचिवाचीही सुटका नाही. काय शिकवलं त्याचा अहवाल सादर करायचा. कुठल्या अधिकाऱ्यानं कुठल्या शाळेत शिकवायचं याची अधिकृत लिस्ट दिली जाते. कुणीही उठून कुठेही जायचं नाही आणि पाट्या टाकून यायचं नाही. गावात गेल्यानंतर अधिकाऱ्यांनी गावकऱ्यांशी बोलायचं. समस्या जाणून घ्यायच्या. एखाद्या घरातले जर मुलीला शाळेत पाठवत नसतील तर त्यांच्याशी बोलायचं. पुस्तक, गणवेशाचा प्रश्न असेल तर तो तिथंच सोडवायचा. परिणाम असा की राज्याच्या मुख्य सचिवालाही शाळेची काय स्थिती आहे हे कळतं आणि लोकांनाही सरकार आपल्या शाळेत येतं याचं समाधान वाटतं. परिणाम गुजरातमधल्या जि.परिषद,पंचायत समित्यांच्या निवडणुका झाल्या. मतदानाची टक्केवारी होती ९२ टक्के. सत्ता अर्थातच भाजपाचीच म्हणजेच मोदींचीच.
लोक आणि प्रशासन यांच्यातलं अंतर मिटवायचं? काय करावं? मोदींनी सांगितलं ‘खेलोत्सव’ म्हणजे अख्ख्या गुजरातनं खेळायचं. कल्पना चांगली आहे पण वाटतं तितकी सोपी नाही. पैसा, व्यवस्था राबवावी लागते. पण ती हिट झाली. खेलोत्सवमध्ये अगोदर गाव पातळीवर लोका, स्थानिक नेते,अधिकाऱ्यांनी खेळायचं. खेळ कुठलाही असो. खेळायचं. नंतर तालुक्यावर खेळायचं त्यानंतर जिल्ह्यावर नंतर विभागावर आणि नंतर फायनल राज्यपातळीवर. इथंही सगळं अधिकृत..खेळासाठी मोदी सरकार पैसे उपलब्ध करतं. खेळणाऱ्या अधिकाऱ्यांच्या ड्युटी तशा लावल्या जातात. गाव, तालुका, जिल्हा, विभाग सगळीकडे खेळ होतायत म्हणजेच आपोआपच मैदानं तयार झाली, असलेली सुधारली, नवीन खेळाडू मिळाले. अधिकाऱ्यांसोबत दोन हात करायची संधी लोकांना मिळाली. लोकांचा आणि अधिकाऱ्यांचा उत्साह ओसंडून वाहणारा. काही अधिकारी त्यांच्या टीमची चर्चा करतायत हे दृश्यच मला सुखावणारं होतं. मोदी द ग्रेट.
आणखी एक गोष्ट सांगण्याचा मोह आवरत नाही. आता ज्या ठिकाणी व्हायब्रंट गुजरात समिट होतेय तिथंच मोदींनी महात्मा मंदीर उभारलंय. मंदीर म्हणजे गांधीजींचं मंदीर नाही तर त्यांच्या नावावर एक मोठी वास्तु उभी केलीय ज्यात समिट होतेय. महात्मा मंदीराची उभारणीही भन्नाट झालीय. मंदीराच्या पायाउभारणीचा दिवस ठरवला. त्या दिवशी प्रत्येक गावच्या सरपंचाला गावची माती आणि पाणी घेऊन गांधीनगरला बोलवलं. खुद्द मोदींनी प्रत्येक सरपंचाकडून माती-पाणी स्वीकारलं आणि त्यातून पायाभरणी झाली. प्रत्येक जोडप्याची व्यवस्थित आणून सोय केली. बोलवलं आणि वाऱ्यावर सोडलं असं नाही. मोदींच्या एका कल्पनेनं दूर गावात असलेला गावकरी आणि समिटमध्ये बसून चर्चा करणारा उद्योगपती जोडला गेला. चर्चा करणारे कुठल्या तरी दुसऱ्या जगातले लोक आहेत ही भावना त्या गावकऱ्याच्या मनात येण्याऐवजी तो आपसूकच उद्योगपतींशी जोडला जातो. म्हणजे भारत आणि इंडिया मोदींनी एका कल्पनेनं जोडण्याचा प्रयत्न केलाय.
गुजरात आणि महाराष्ट्र दोन्ही जुळी भावंडं. दोन्ही सुवर्णमहोत्सव साजरा करतायत. मला महाराष्ट्रात एकदाही त्याचा फील आला नाही. गुजरातमध्ये त्याचा विसर पडत नाही. मी इथं एकही प्रश्न उपस्थित करणार नाही कारण हे वाचल्यानंतर जे तुमच्या मनात येईल तेच माझ्या मनात आहे.
पुढची निवडणुक ज्यावेळेस येईल त्यावेळेस जर राहुल गांधींना मतदान द्यायचं की पंतप्रधानपदासाठी मोदींना तर मी मोदींची निवड करण्याचं निश्वित केलंय. कारण दंगली कोण घडवत नाही? पण एखादा तरी सुपर क्लास वन अधिकारी मग तो आयएएस असो की आयपीएस मला माझ्या गावात येताना पाहायचंय जे सध्यस्थिती अशक्य वाटतं.

Sunday, June 27, 2010

कोसलाचे दिवस

मी नेमाडेंची कोसला वाचली त्यावेळेस पंचवीशीत होतो. लातूरला शाहू कॉलेजला ग्रॅज्युएशन करत होतो. आमच्या वक्तृत्व मंडळाची जबाबदारी त्यावेळेस ‘धुळपेरणी’चे लेखक शेषराव मोहितेंकडे होती. खरं तर अनेक चांगल्या पुस्तकांची ओळख मला त्यांच्यामुळेच झाली. कोसलाही त्यापैकीच एक. कोसला देताना ते म्हणाले, ‘एक तर कोसला वाचून तिला डोक्यावर घेऊन नाचणारे आहेत किंवा तिला कचऱ्यात फेकणारे. बघ तुझं काय होतं.’ मी कोसला बद्दल ऐकलेलं होतं. आणि बहुतांश जण कोसला डोक्यावर घेऊन नाचणारेच भेटलेले होते. त्यामुळे आपण कचऱ्यात फेकणाऱ्यांच्या पंगतीत असू नये असं ओझंही जाणवलं. त्याकाळात मी झपाटल्यासारखा वाचायचो. म्हणजे एकदा पुस्तक हातात पडलं तर ते संपवल्याशिवाय दुसरं काहीच करायचं नाही. मग कॉलेजलाही दांडी. एक दिवस जावो की आठवडा. पुस्तक संपलं तरच दुसऱ्या कामांना सुरुवात. विश्वास पाटलांची हजार पानांची महानायक मी अशीच संपवलेली. त्या पाचही दिवसात मी हॉस्टेलची रूम सोडलेली नव्हती. कोसलाबद्दल तर मी अधिक उत्सुक होतो.
पुस्तक असो की फिल्मस् किंवा एखादा टीव्ही प्रोग्राम. माझी दोनच मतं असतात. एक तर ती ‘भारी’ असतात किंवा टाकाऊ. एकदा वाचण्यासारखी किंवा एकदा पाहण्यासारखी असं मला कधी म्हणता येत नाही.. मी तसं म्हणत नाही. असं म्हणणाऱ्यांना नेमकी त्यांचीच चव कळलेली नसते किंवा ते संभ्रमित असतात असा माझा अनुभव. कोसला हातात आली त्यावेळेसही मी याच मताचा होतो. मला नक्की आठवतं,कोसला वाचायला घेतली त्यावेळेस लातूरमध्ये भरपूर पाऊस पडत होता. त्यामुळे हॉस्टेलच्या भोवती तळं साचलेलं होतं. रूमवर जाताना कोसला पाण्यात पडता पडता राहिलेली. हॉस्टेल म्हणजे पन्नास एक खोल्यांचं हॉस्टेल. सर्वात वरच्या मजल्यावर सर्व दादा लोक राहायचे. जिथं एका खोलीत तीन जण राहू शकायचे तिथं दादा मंडळींनी स्वतंत्र खोली लाटलेली. त्यातल्या सर्वात शेवटच्या कोपऱ्यातली खोली माझी. रूम नंबर ३३.
पुढचे दोन दिवस तरी रूम नंबर ३३ ला मी मुक्कामी होतो. मेसवाल्याला डब्बा रूमबाहेरच ठेवून जायला सांगितलं, कुठली वक्तृत्त्व स्पर्धा आली तरी जायचं नाही हे निश्चित केलं. आणि कोसला उघडली. त्यावेळेस ढगाळ वातावरणामुळे नेमके किती वाजलेत याचा अंदाज यायचा नाही. माझ्या रूमच्या खिडकीच्याबाहेर एक पिंपळाची फांदी फुटलेली होती. त्यावर पावसाच्या पाण्याचा रपरप आवाज यायचा. त्यामुळे पाऊस सुरु आहे की बंद हे बघण्यासाठी खिडकी उघडी ठेवायची गरज नव्हती. त्याच खिडकीला लागून कॉट होती. जिथं मी कोसलाची सुरुवात केली. पुस्तक आवडेल की नाही याचा अंदाज बांधायची माझी पहिली पट्टी म्हणजे तिचं पहिलं पान. म्हणजे पुस्तक आई वडिलांना अर्पण वगैरे केलं असेल तर ते नक्की दुय्यम दर्जाचं. कोसला शंभरातील नव्व्याण्णवास अर्पण केलीय. पुढच्या पानावर कुठल्या तरी तिबेटीयन ओळी छापलेल्या. त्या अजुनही समजलेल्या नाहीत. त्या समजून घेण्याच्या प्रयत्नात न पडता पुढे सुरु ठेवलं.
कोसलाची सुरुवात आवडली. मी पांडुरंग सांगवीकर. आज उदाहरणार्थ अमक्या अमक्या वर्षाचा आहे वगैरे. कोसला हे काही मी वाचलेलं पहिलं पुस्तक नाही. त्याअगोदर वि.स.खांडेकर,वपु काळे, ना.सी.फडके असं उठता बसता नाव घेतले जाणारे लेखक वाचलेले होते. एवढच नाही तर सुहास शिरवळकर,बाबा कदम या मराठीतल्या सिडने शेल्डनचीही पुस्तकेही वाचलेली. खांडेकर,फडकेंच्या कादंबऱ्या म्हणजे जोहर,सुरज बडजात्याच्या फिल्मसच. खांडेकरांच्या कादंबऱ्यातलं २० -२० पानांचं वर्णन वाचून विलक्षण आश्चर्य वाटायचं. पण, नंतर कॉलेजच्या शब्दगंध मध्ये असं लिहिणारे आमच्याच वर्गात भरपूर सापडले. मग मात्र खांडेकर,फडके कधी उडाले कळालच नाही. त्या पार्श्वभूमीवर कोसलाची सुरुवात एकदम वास्तववादी वाटली. त्यातल्या त्यात पांडुरंग सांगवीकर हे नाव एकदम जवळचं वाटणारं. आमच्या गावातूनही असे अनेक पांडुंरग गावाबाहेर पडलेले त्यामुळेही असेल कदाचित. खरं तर मी त्यांच्यापैकीच एक. सुरुवातीच्या पानांवर पहिल्या उताऱ्यात आलेलं वगैरे वगैरे थोडंसं खटकलं पण ते कधी मागे पडलं कळालं नाही. बाहेर जसं अंधारून येत राहिलं तसं कोसलातली पानंही मागे पडत गेली. कधी तरी रात्री पोटात खड्डा पडला त्यावेळेस कोसला बाजूला सारली आणि डब्बा काढला. जेवत असताना खरं तर कोसलावरच लक्ष अधिक. जेवण संपेपर्यंत वाचलेली अख्खी कोसला रिपीट होतेय असं वाटलं. एक गोष्ट प्रकर्षानं जाणवली, कोसलाला भयंकर स्पीड आहे. कोसलात कुठंच वर्णन नाही की एखादं पात्रं उभं करण्याचा प्रयत्न केलेला नाही. पात्रं अशी काही भेटतात की दादरच्या मोठ्या दादऱ्यावर रात्री पिक अवरला माणसं मुंग्यांसारखी येऊन आदळतात तशी. काही क्षणांपूर्वी आपल्याला नेमकं कोण भेटलं? असा प्रश्न पडावा आणि पुढच्याच क्षणी आता कोण भेटणार असं दचकून उभं राहावं तसं. आणि तरीही काही पात्रं पुन्हा पुन्हा भेटतात ते डोक्यावर वेगवेगळे ढग घेऊन. कोसला आपली होते ती इथंच.
कोसला कधी संपली हे कळलं नाही. पण तिला संपायला दोन दिवस लागले नाहीत. दुसऱ्या दिवशी कधी तरी ती दुपारी संपली. बाहेर पावसाळी वातावरण असल्यानं तिची सुरुवात आणि शेवट एकाच बिंदूत जाणवतो. पण कोसला संपल्यानंतर माझं काय झालं? मुंग्यांनी वारूळ करावं तसं माझ्या आयुष्यात कोसलातल्या पात्रांनी वारूळ केलं. मी कुणालाही एक शब्द न बोलता त्या दिवशी शहरभर फिरून आलो. पावसाची सुरु असलेली भूरभूर जाड होत गेली. रस्त्यावरच्या लोकांमध्ये कोसलातली पात्रं दिसायला लागली. आणि स्वत:च्या जीवनातली काही माणसं अधिक भयाण झाली.
माझी आजी होती. आईची आई. ती गेली त्यावेळेस बिलकुलच रडलो नाही. म्हणजे डोळ्यात पाणीच आलं नाही. याचा अर्थ असा नाही की ती मला आवडायची नाही. उलट तिच्या चेहऱ्यावरच्या रेषा पाहिल्या की तिनं जगलेल्या आयुष्याची धग जाणवायची. पण अडगळीत पडलेल्या जीवाबद्दल कुणाला काय वाटणार..मी पोटात होतो त्यावेळेस माझे आजोबा गेले. त्यानंतर आजीनंच पाचही मुलींचं सगळं केलं. आजोबा गेले म्हणजे त्यांचा काही नैसर्गिक मृत्यू झाला नाही. भजन कीर्तन करणाऱ्या या माणसानं भर दुपारी गावाच्या पाठीमागच्या विहिरीत कंबरेला दगड बांधून उडी घेतली. संध्याकाळी कधीतरी त्यांचं प्रेत सापडलं. तेव्हापासून गावकऱ्यांनी ती विहीर टाकली आणि आजीही अडगळीत पडली ती कायमचीच. पण कोसला वाचल्यानंतरच ही धग अधिक गडद झाली. का? त्याला कारण आहे ती कोसलाची मनी. मनी भेटते ती कोसलाच्या मध्यावर. म्हणजे पांडुरंग सांगवीकरचे कॉलेजचे प्रताप अनुभवल्यानंतर.
कुठलंही कथानक त्याच वेळेस टिकतं ज्यावेळेस ते पुढं काय? याची उत्सुकता निर्माण करतं. मनी भेटते ती अशाच एका वळणावर. नेमाडे ग्रेट ठरतात ते इथंच. मनीचा मृत्यू हाच कोसलाचा आत्मा आहे. मनी, तिचं जीवन आणि तिचा मृत्यू याचं वर्णन कोसलात ज्या पद्धतीनं आलंय एवढा जिवंत मृत्यू ना वाचण्यात आलाय ना पाहण्यात, ना ऐकण्यात. मनी गेल्यानंतर नेमाडेंनी एक वाक्य टाकलंय ते वाक्य अल्बर्ट कामुच्या outsider मधल्या mother died today. or, may be yesterday. i can't be sure. या वाक्याएवढंच किंवा त्यापेक्षाही जास्त चिरंतन आहे. कोसलातलं ते वाक्य असं. मनी गेली आणि तिच्यासोबत तिचं इवलसं गर्भाशयही. तिनं खानेसुमारीची मोठीच ओळ वाचवली. या प्रसंगानंतर कोसला जी उंची गाठते ती शेवटपर्यंत सोडत नाही. पुढच्या प्रत्येक प्रसंगात कोसलात घडतो तो फक्त साक्षात्कार. कोसलाची जशी सुरुवात आहे तसाच क्लास क्लायमॅक्स आहे आणि शेवटही. पण कुठेही कोसला नाटकी नाही ना जाणीवपूर्वक पेरलेला शेवट नाही. गिरीधर जो कोसलातून गायब झालाय त्याचा शोध मी अजुनही का घेतोय? मनीचा मृत्यू माझ्या अंगावर शहारे का आणतो? रात्री अपरात्री ती माझा पिच्छा का पुरवते?. गिरीधरसारखी माणसं आपल्याही आयुष्यात आहेत. जी चूक पांडुरंगनं केली ती आपल्याही हातून कधी घडेल याची भीती का वाटत राहते? पांडुरंगला न दिसलेला दिवा आपल्याला दिसेलच याची काय खात्री? पांडुरंग म्हणतो तसं आपापली वर्षे वगैरे उरलेलीच असतात, वाया वगैरे गेली हे साफ खोटं. तर मग आपला मृत्यू काय आहे? मला वाटतं मी थांबलेलं बरं. कोसला तुम्ही वाचलेली बरी. जगलेली बरी.

Tuesday, February 23, 2010

हजारो ख्वाहिशें ऐसी..

दोन बातम्या माझ्या डोक्यातून जात नाहीयत. एक आहे विश्वविक्रमी उसेन बोल्टची आणि दुसरी विनोद कांबळीची. कोण किती ग्रेट आहे आणि कोण किती नशीबवान यात मला फारसा रस नाही. पण एका व्यक्तीला कुठली गोष्ट जिंकत ठेवते आणि एका व्यक्तीकडे जिंकण्याची सर्व साम्रगी असतानाही तो पराभूत कसा काय होतो याची मला मोठी उत्सुकता आहे.
उसेन बोल्ट म्हटलं की कष्ट आणि कष्ट आणि विनोदी कांबळी म्हटलं की नशीब, नियती असे शब्द वापरले जातात. खरं तर विजेत्याला एका चौकटीत आणि पराभूत झालेल्याला दुसऱ्या चौकटीत टाकून आपण मोकळे होतो. पण म्हणून काही जय पराजयाचं भयानक वास्तव बदलत नाही. श्वास करपणं आणि श्वास श्रीमंत होणं हे त्यातलंच.
विनोद कांबळी क्रिकेटमधून निवृत्त झाला. खरं तर तो शेवटचा कधी खेळला हेच आठवणं कठीण. त्यामुळे त्याच्या निवृत्तीला महत्व शून्य. लक्षात राहिल असा तो खेळला त्याला दीड दशक उलटून गेलंय. उजवा पाय किंचितसा वर घेऊन हूक मारणार डावखुरा विनोद, डोळ्याच्या बाहुलीवर जशास तसा कोरला गेलाय. मी आता तिशीचा आहे आणि माझ्या विशीत ज्या क्रिकेटर्सच्या प्रेमात पब्लिक पागल होती त्यात कांबळी सर्वात वरचा. सचिनपेक्षाही तो अधिक भावलेला. विनोदला क्रिकेटची देणगी होतीच, याबद्दल शंकाच नाही. पण प्रॅक्टीससाठी लोकलच्या दुसऱ्या वर्गातून प्रवास करणारा विनोद अधिक जवळचा झाला. त्याच्या दिसण्यातलं “गल्ली”पण असेल किंवा त्याच्या नावातला कांबळी शब्द. त्यामुळे तो श्रीमंतांच्या क्रिकेटमध्ये “आपला” जरा लवकरच झाला. क्रिकेटवर अधिराज्य गाजवण्यासाठी खेळाची सर्वकाही देणगी मिळाली असतानाही विनोद अपयशी का ठरला?
यश आणि अपयश यात एका बाराखडीचं अंतर. “अ”. इंग्रजीत दोन. म्हणजे SUCCESS आणि UNSUCCESS मधे “UN”. सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी यांच्यातलं यश-अपयश या एका बाराखडीत सामावलंय. पण एकाचं आयुष्य Larger than life आणि दुसऱ्याचं आयुष्य “Small things of god”
माझ्यापेक्षा तुम्ही सचिन किंवा कांबळीबद्दल अधिक वाचलं असेल किंवा ऐकलं असेल. पण ऐकीव हे शेवटी ऐकीवच. ते वास्तवाच्या जवळ असतं पण वास्तव नसतं. त्यामुळे सचिन-कांबळीबद्दलच्या तुलनेत उणीवा राहिल्या तर त्या माझ्या. मी सचिनला भेटलेलो नाही पण कांबळीला भेटलोय. त्याच्याशी फार बोलणं झालंय असंही नाही पण काही काळ त्याचं निरीक्षण केलय. मी झी 24 तासला असतानाची गोष्ट. कांबळीचा आमच्याकडे शो होता. तो सकाळी चालायचा आणि सायंकाळीही. एक प्रसंग पुरेसा असतो महानतेची प्रचिती यायला. विनोद सकाळी लवकरच पोहोचायचा. स्टुडिओत खायला प्यायला परवानगी नसते. विनोदला त्याची किती तरी वेळेस कल्पना दिली पण तो काही बदलला नाही. अशा एक ना अनेक गोष्टी. शेवटी चॅनलनं विनोदलाच बदललं. विनोद बेशिस्त आहे का? याच बेशिस्तीनं विनोदला संपवलं का? माईक टायसनच्या कुळातला आहे विनोद?
सचिन आणि कांबळी दोघेही गाणी भरपूर ऐकायचे. दौऱ्यावर असतानाही. रात्री उशिरापर्यंत कांबळींच्या रूममध्ये आवाज यायचा. सचिनचा लवकरच थांबायचा. सचिन सकाळी प्रॅक्टीससाठी हजर असायचा तर कांबळीची दांडी. परिणाम आपल्यासमोर आहे. सचिन विक्रमादित्य तर विनोदला ओहोटी. विनोदच्या डोक्यात यशाची हवा गेली? सचिननं नवनवे विक्रम केले पण तो कायम भुकेला दिसला? विनोदची भूक लवकरच संपली? मध्यमवर्गीय मुलांना यश मिळालं की ते समाधानी होतात आणि कायमचे संपतात.
मोजता न येणारा पैसा खोऱ्यानं मिळतो. स्वप्नातल्या बायका प्रत्यक्षात अवतरतात, फार कमी मध्यमवर्गीय मुलं यातून सहीसलामत सुटतात, काही अडकतात? सचिन आणि विनोदचं वर्गीकरण या दोन्हीत करता येईल? अपयश अनाथ असतं आणि यशाला बाप अनेक. नऊ वेळेस कमबॅक करणाऱ्या विनोदलाही ही पट्टी लावता येईल?
शाहरूख खान असो की अमिर खान, हे काही शतकातले महान कलाकार नाहीत. पण आपल्या जवळ जे “एवढूसं” आहे ते कसं जपायचं आणि दाखवायचं त्याचं “एवढं” मोठं डोकं त्यांच्याकडे आहे. त्याच्या मुलाखती ऐकल्या की त्याची प्रचिती येतेच. विनोद कांबळीसारखी गुणी पोरं यात कमी पडतात का? प्रत्येक माणसाच्या आयुष्यात त्याच्या पातळीएवढी यशाची लाट येतेच, पण प्रत्येकाला ती समजतेच असं नाही. ज्यांना त्या लाटेवर स्वार होता येतं ते पुढच्या लाटेत फेकले जातात तर इतर पहिल्याच लाटेत गटांगळ्या खातात. Some survive better than others. विनोदबाबतही असच घडलं असावं का? या रांगेत विनोद एकटा आहे, असं म्हणावं की तुमच्या माझ्यासारखे कित्येक जण?
बोरीस बेकर आणि स्टेफी ग्राफ हे माझे आवडते टेनिसपटू. मला टेनिस फार कळत नाही पण बेकरच्या कारकिर्दीचा विनोद झाला तर स्टेफीच्या कारकिर्दीचा सचिन. विश्वास बसत नाही की स्टेफी आणि बेकर एकत्र प्रॅक्टीस करायचे. बेकरबाबत मी आजही काही वाचलं, ऐकलं की हळवा होतो रूखरूख लागते जशी विनोदबद्दल. पण त्यांच्या पराभवाचं काय? की यशाला चौकट बिकट काही नसते? तिला नसते नियती आणि कसलीच वासना? यश हे यश असतं. ना आघाती आणि ना अपघाती ? का यश अपयशाची तुलनाच फुटकळ, जिंकणारे जिंकतात हारणारे हारतात. काहींच्या नशीबात यश आणि यशच आणि काहींच्या नशीबात पराभवाचे फेरे?
पण असं म्हणून सगळी संकटं, माणसं अंगावर घेऊन जिंकणाऱ्या आयन रँडच्या रोअर्कवर किंवा गेल वायनँडवर आपण अन्याय तर करत नाहीत ना? उसेन बोल्ट, मायकल शूमाकर, रॉजर फेडररसारखे जगज्जेते यात मोडतात का? उसेन बोल्टनं तर वीज चमकवलीय. त्याच्याबद्दल वाचताना वाटलं, साल्यासोबत आपणही पळायला पाहिजे. काय हरकत आहे. आपण शेवटून पहिले येऊ फार तर. पण बोल्टच्या सोबत स्पर्धा केली हे काय कमी आहे?
काही पराभव यशापेक्षा किती तरी मोठे असतात. खरं तर सकाळी लवकर उठणंसुद्धा मला जमत नाही. पण काही तरी वाटणं हाच तर जिवंतपणा. असमाधानी असण्याची पहिली खूण. गालिबच्या शब्दात,
हजारो ख्वाहिशे ऐसी की हर ख्वाहिश पर दम निकले बहुत निकले मेरे अरमाँ फिर भी क्यूँ कम निकले.....
मला स्वत:ला असं वाटतं की माणूस एकदा हवं ते मिळवण्यात समाधानी झाला की तो संपला, हे बेसिक. बाकी इतर गोष्टी लढण्याच्या. अपयश येत नाही असं नाही पण “चल साले की बजाते है” म्हणण्याची हिंमत असलीच पाहिजे. तुम्हाला “गुलाल” मधला रणसा आठवतो. तो दहा वेळेस मार खातो पण अकराव्या वेळी मारण्याची हिंमत ठेवतो. तो एकदा म्हणतोही, देने गये थे, बना, पर लेने पडे पण म्हणून काही रणसाचं महत्व कमी होत नाही.
विनोदला जर निवृत्ती जाहीर करेपर्यंत असं वाटलं असेल की मिळाली संधी तर देऊ दणका तर तो ग्रेटच. तो रणसा. पण यातलं काहीच नसेल तर आयुष्य म्हणजे गाठोडं. न सुटलेलं. श्वास जड करणारं.