Tuesday, August 30, 2011

झऱ्यांच्या शोधातले दिवस

विदर्भात प्रवेश करताना मंठा म्हणजे मराठवाड्यातलं शेवटचं मोठं ठिकाण. त्यानंतर विदर्भ कधी सुरु होतो आणि मराठवाडा कुठं संपतो हे लक्षात येत नाही. आपण धुसररेषा शोधेपर्यंत तर लोणार सरोवराच्या काठावर असतो. डोळ्यात न सामावणारा गोलाकार भूभाग, खाली पाहिलं तर प्रचंड हिरवं पाणी, वर जूनच्या पहिल्या आठवड्यातलं स्वच्छ निरभ्र आकाश. उंच जावं आणि तिथून हा गोल पाहावा, कसा दिसेल? शक्य नाही. मग मी शहरातून विष्णू मंदिराच्या बाजूनं खाली उतरायला लागलो. मंदिराच्या कुंडात बायामाणसं झुंडीनं अंघोळ करतायत. पण या गोमुखात पाणी कुठून येतंय? तेही एवढं स्वच्छ? सोबत कधी नाही ते गाईड घेतलेला. तो म्हणाला हे अनादी काळापासून असंच सुरुय. बाराही महिने पाणी असतं. उन्हाळ्यात धार थोडी कमी होते पण पाणी कधीच थांबत नाही. आश्चर्य आहे? मी त्याच धारेनं खाली पायऱ्या उतरत गेलो तर एक दोन ठिकाणी आणखी काही जण अंघोळ करत होते. मी हे ऐकून होतो की लोणारच्या गंधकयुक्त पाण्यानं त्वचेचे रोग दूर होतात पण लोक तर स्वच्छ पाण्याखाली उभे? शेवटी पायरस्ता तुडवत त्या हिरव्यागार पाण्याजवळ गेलो तर प्रचंड वास येत होता. समोरच केळीची बाग. गंधकयुक्त पाण्यावर केळी? तिकडे गेलो तर लक्षात आलं की गोमुखातून जी धार खाली आलीय तिच्यावरच ही केळीची बाग फुललीय. मला लोणारच्या हिरव्या पाण्यापेक्षाही उत्सुकता वाटली ती गोमुखातून निघालेल्या स्वच्छ पाण्याची. वर आल्यावर हॉटेलमध्ये एक वयस्कर गृहस्थ भेटले. बोलके वाटले. त्यांना विचारलं, गोमुखातली धार जर बारा महिने वाहते तर मग जगप्रसिद्ध लोणारमध्ये पाणीटंचाई नसेल?
हैदराबादला जायचं तर बिदर ओलांडावच लागतं. हैदराबादमध्ये शिक्षित झालेली पण आता उतारवयात असलेली मराठवाड्यातली पिढी अजूनही जिवंत आहे. त्यामुळे बिदरचं नृसिंह मंदिर किंवा तिथला प्रसिद्ध किल्ला लोकांच्या बोलण्यात सहज येतो. आम्ही काही जणांनी फेब्रुवारी महिन्यातल्या सकाळी सकाळी बाईक्स काढल्या आणि उदगीरमार्गे बिदर गाठलं. रमत गमत गेल्यानं थोडा उशीर झाला. पण नृसिंह झरना बघताच दिवसभरात अंगावर चढलेलं ऊन उतरून गेलं. इथंही गोमुखातून पाणी बाहेर पडतंय तेही गढूळ. पण लोकांना त्याचं काय? आंघोळीसाठी इथंही झुंबड उडालेली. ‘नरशा’चं दर्शन घ्यायचं तर अंगावरचे सगळे कपडे काढून कंबरेइतक्या पाण्यातून चालत जावं लागतं तेही बोगद्यात. प्रचंड गढूळ पाणी, वर लटकलेल्या वटवाघळी अगदी डोक्याला लागतील अशा, त्यातच बल्बचा पिवळा उजेड हॉरर सिनेमातल्यासारखा. विशेष म्हणजे ह्या बोगद्यातलं पाणीही असंच अनादी काळापासून सुरुय. नृसिंह झरना म्हणून तो प्रसिद्ध. बोगद्यातून दर्शन घेऊन बाहेर आलं की समोर ओसाड प्रदेश दिसतो. पाऊस माहित असेल का या प्रदेशाला? केवढा हा विरोधाभास?
नानक झिरा साहिब यांचा गुरुद्वाराही आहे बिदरमध्ये. दक्षिण भारतातल्या महत्वाच्या गुरुद्वाऱ्यांपैकी एक. आम्ही पोहोचलो त्यावेळेस गुरुद्वाऱ्यात जाण्याऐवजी काही जण बाजूच्या एका खोलीकडे जात होते. आम्हीही गेलो. आश्चर्य म्हणजे इथंही पाण्याची धार आहे जिचा उगम कुणालाही माहित नाही. गुरु नानक देवजींनी खडकाला स्पर्श केला आणि हा झरा सुरु झाल्याची अख्यायिका. येणारे पाण्याचं दर्शन घेतात, खिशातली काही नाणी टाकतात आणि निघून जातात.
पाण्याचा हा चमत्कार फक्त काही लोणार, बिदरमध्येच नाही. दौलताबादचा किल्ला चढून गेल्यानंतर किंवा विस्तीर्ण कोयना डॅम नावेतून पार करत, पाच एक तासाचा ट्रेक करून आपण ज्यावेळेस वासोटा किल्ल्याच्या माथ्यावर पोहोचतो त्यावेळेस तिथं एका डबक्यातलं पाणी बघून आश्चर्यचकीत होतो. ऐन उन्हाळ्यात किल्ल्याच्या माथ्यावर पाणी? महाबळेश्वरमध्ये तर एकाच गोमुखातून पाच नद्यांचा उगम. मला मोह आवरला नाही. झऱ्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला पण काही ठावठिकाणा लागला नाही. पन्हाळगडावर तर पाणी चक्क हाताला येतं. आपण डोकावून बघितलं तर स्वच्छ पाण्यात आपलं प्रतिबिंब बघत राहावं असं. बरं पन्हाळ्यात अशा किती तरी विहिरी. मग पन्हाळ्यात पाणी टंचाई नाही? दुर्देवानं उत्तर भीषण आहे. लोणारमध्येही पाणीटंचाई आहे. देवाच्या धारेनं कुठं दुष्काळ जातो का? हे कधीही न विसरता येणारं त्या वयस्कर गृहस्थाचं वाक्य. मग देवाच्या या चमत्कारीत धारेचा शोध का नाही घेतला जात? तेही पिढ्यानपिढ्या? मला वाटतं ज्याला तेलाच्या विहिरी सापडल्या तो खरं तर पाण्याच्या शोधात गेला असावा. असं पाणी ज्यानं त्याला चकीत केलं असेल. आपल्याला कदाचित तेल नाही सापडायचं. पण कमीत कमी दुष्काळ तरी दूर होईल? पिढ्यानपिढ्या डोळ्यावर बांधलेली पट्टी तरी उतरेल? डोळ्यावर पट्टी बांधून घेतलेल्या पिढ्या एक तर पाण्यात जातात किंवा त्यांच्यावर पाणी पडतं. म्हणजे व्यर्थ.
1 comment:

  1. मस्त रे माणिक आवडलं खुप खरंच तू लिहीत रहा

    ReplyDelete