Saturday, March 12, 2011

चौकटीपलिकडची 'हिंदू'


नेमाडेंची हिंदू वाचण्यापूर्वी मी नेमकं सॉमरसेट मॉमचं ‘ऑफ ह्युमन बॉन्डेज’ संपवलं होतं. बॉन्डेज सॉमरसेटची आत्मचरित्रात्मक कादंबरी. सातशे पानांपेक्षा मोठी. पण बॉन्डेजमध्ये युरोपातला असाही एक काळ उभा राहतो ज्यावेळेस विविध कलेत नवनवीन अविष्कार जन्माला येत होते आणि तेच लोक जगण्यासाठी प्रचंड संघर्षही करत होते. सॉमरसेटच्या लिखाणाची जादू अशी की एवढी सोपी इंग्रजी कशी काय लिहिली जाऊ शकते असा प्रश्न पडतो. सोप्या भाषेमुळे पुस्तक प्रवाहीत राहतं आणि आपण प्रसंगाचा कधी भाग होऊन जातो कळत नाही. एका ठिकाणी सॉमरसेट म्हणतोही, सगळ्यात अवघड काय असेल तर ते सोपं लिहिणं. हिंदू वाचताना मला बॉन्डेजची आठवण येत राहिली. कारण सोप्या भाषेत हिंदू लिहिणं नेमाडेंना खरंच एवढं अवघड होतं?
हिंदूचा आवाका प्रचंड आहे. प्रत्येकालाच तो पेलेल याची खात्री देता येत नाही. हिंदूत काळ, अवकाश याची तर अशी काही गुंफण घातलीय की वाचल्यानंतर अनेकांनी वह्या घेऊन गणितं मांडायला सुरुवात केल्याचं दिसतंय. खंडेरावचं वय कुठलं? कुठल्या काळात हिंदूचं कथानक घडतं? हिंदूतल्या पात्रांची वयं किती? हिंदूत दिसलेला इतिहास आणि भूगोल खराच तसा आहे काय? हिंदूनं राम खराच कोण होता, याचं उत्तर दिलंय का? आर्य, द्रविड कसे होते? आर्य नेमके कुठले आणि त्यांच्या आताच्या पिढ्या कुठल्या? आर्यांनी खरंच द्रविड लोकांचा विश्वासघात केला का? हिंदूत दिसलेला पाकिस्तान खरंच तसा आहे काय? हिंदूत रेखाटली गेलेली त्या त्या जाती, धर्माची पात्रं वास्तववादी वाटतात का? राम खरंच मांसाहारी होता काय? हिंदूत उभ्या राहिलेल्या बायकांचं जीवन खरंच एवढं भीषण आहे काय? हिंदूच्या प्रत्येक पानावर आलेल्या ओव्या, म्हणी, अभंग वाचणाऱ्याला ठेचा देतात की आशय दिर्घ करतात? हिंदू पसरट झालीय काय? एक ना अनेक प्रश्न हिंदूनं निर्माण केल्याचं दिसतंय. खरं तर नेमाडेंच्या म्हणण्यानुसार हिंदू त्यांनी लिहिली ती अनेक प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी, शोधण्यासाठी. पण मग हिंदूनं उत्तरांपेक्षा प्रश्न जास्त निर्माण केले की प्रश्नांची उकल करता करता हिंदू क्लिष्ट झाली?
नेमाडेंची कोसला ही मराठीतली सर्वाधिक वाचली जाणारी कादंबरी. लातूर, जळगाव तर सोडाच पण पुण्या मुंबईतल्या कॉलेज कट्ट्यावर टॉम क्रुझच्या मिशन इम्पॉसिबल आणि त्याला जोडूनच कोसलावर कट्टा जमवणारे पोरा पोरींचे टोळके दिसले की नेमाडेंची क्रेझ किती पिढ्यानंतरही टिकून आहे हे दिसतं. नेमाडेंची कोसला जेवढ्या उंचीची आहे ती उंची हिंदूनं गाठलीय ?
कोसला अभिजात आहे आणि हिंदूचा आवाका प्रचंड. साहजिक आहे कोसला नेमाडेंनी अवघ्या काही दिवसात लिहिली आणि हिंदूसाठी नेमाडेंनी ३५ वर्ष लावले. कोसला त्यांनी सहज लिहिली तर हिंदू नेमाडेंनी संशोधन करून लिहिली? संशोधनात जे जे काही सापडलं ते ते लिहिण्याचा मोह कदाचित नेमाडेंना रोखता आलेला नाही. त्यामुळेच अनेक ठिकाणी हिंदू संदर्भहीन वाटत राहते. नेमाडेंच्या संशोधनानं आपण आश्चर्यचकित होतो. विठ्ठलाचं दर्शन झाल्याचा साक्षात्कार होईल पण वाचक म्हणून मी विठ्ठलाच्याच दर्शनाला निघालो होतो की आणखी काही हवं होतं नेमाडेंकडून? ते जे काही हवं होतं ती देण्यात यशस्वी झालीय का हिंदू?
होय! गोष्ट सांगा राव खंडेराव म्हणणाऱ्या नेमाडेंनी हिंदूत अशा काही गोष्टी सांगितल्यात की त्यातल्या प्रत्येक गोष्टीसाठी त्यांना नोबेल द्यायला हवं. कारण प्रत्येक गोष्टीला एका कादंबरीचा आवाका आहे. म्हणजेच नेमाडेंची हिंदू अनेक कादंबऱ्यांची अनुभूती देणारी एक महान कादंबरी आहे. त्यामुळे काही प्रसंग वाचल्यानंतर आपल्याला काही वेळ जाऊ द्यावा लागतो आणि मग पुन्हा मोकळे झालोत की पुढचा प्रसंग. एका दूरच्या प्रवासावर असल्याचा अनुभव. काही प्रसंग तर चार एक वाक्यात एवढे सहज आलेत पण ते केवढं मोठं आकाश आपल्यासमोर मोकळं करतात. उदाहरणार्थ अलीच्या वडीलांचा खून. जे हिंदूची प्रेतं घेऊन आलेल्या आगगाडीत रडणाऱ्या, ओरडणाऱ्या लहान मुलांना कर्फ्यु असतानाही पाणी पाजायला गेले आणि बाकाखाली लपलेल्या कोणाकडून तरी ते मारले गेले. मारणारा हिंदू होता की मुसलमान काही कळलं नाही. फाळणीची दाहकता सांगण्यासाठी नेमाडेंची एवढी एक गोष्ट पुरेशी आहे.
खुशवंतसिंग यांनी ‘ट्रेन टू पाकिस्तान’ लिहून जे काही सांगण्याचा प्रयत्न केलाय तो नेमाडेंच्या हिंदूत अवघ्या चार ओळीत आलाय. गोष्ट सांगण्याची ही केवढी मोठी हातोटी.
भाषा शुद्धतेचा आग्रह धरणारे लोक भाषेला एका विशिष्ट वर्गाची मालमत्ता करण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामुळे संकरीत भाषेलाही सदाशिव पेठी विद्वानांचा विरोध असतो. नेमाडेंच्या हिंदूत मराठीची किती रूपं पाहायला मिळावीत? पाकिस्तानमध्ये सुरु झालेला खंडेरावचा प्रवास जसजसा मुलतान, लाहोर, अमृतसर, दिल्ली आणि तिथून पुढं मध्य भारत आणि मोरगावकडे होत राहतो तसतशी नेमाडेंच्या हिंदूतली मराठी भाषा आणि प्रसंग कुस बदलत राहतात.
खंडेरावचे पाकिस्तानातले दिवस मराठीत वाचत असताना असं कुठंही वाटत नाही की जाणीवपूर्वक उर्दू किंवा हिंदी शब्द तोंडी लावण्यासाठी वापरलेत. नेमाडेंनी शमशाद बेगमचा आवाज रेडिओवर गुलशन कार्यक्रमात इतक्या सहजपणे ऐकवलाय की आपण रात्रीतून तीन वेळा मोहमदराम अज कराची ढाब्यावर सहज जाऊन येतो. डॉ.जलील, अली, दिलवर यांचं जगणं वाचताना आपल्याला आपल्या वर्गातला हनिफ आणि कॉलेजच्या गेटवर उधारीवर कधीही पैसा न विचारता चहा देणारे शुकुरचाच्या आठवल्याशिवाय राहात नाहीत. धडक रहा है दिल तो क्या की धडकने न गिन, फिर कहाँ ये रातदिन अशा काही रेकॉर्डीनी पाकिस्तान सहज जीवंत होत जातो.
पाकिस्तानमधला प्रवास रेखाटताना नेमाडेंनी ज्या पद्धतीनं तिरोनी आत्याचं पात्र हिंदूत पेरलंय त्याला तोड नाही. नेमाडेंच्या कोसलातल्या मनुचा मृत्यू जसा आपला आयुष्यभर पिच्छा पुरवतो तसंच खंडेरावच्या तिरोनी आत्याचं होतं. तिरोनी आत्याचा न लागलेला शोध आपल्या डोक्यात पोकळी निर्माण करतो आणि त्या पोकळीत आपण तिला शोधू लागतो. ही केवढी मोठी भग्नअवस्था?
दिलवरचं आयुष्य मांडताना कोळ्याच्या नशीबाची सांगितलेली गोष्ट, जागोजागी फैजच्या पेरलेल्या नज्म, नुरजहाँची एका ओळीत मांडलेली शोकांतिका, इक्बालच्या ओळी आपल्या डोक्यातला पाकिस्तान सहज बदलून टाकतात.
विशेष म्हणजे मुस्लिम समुदयाचं चित्रं रेखाटताना बुरखे, नमाजाचे भोंगे, मशिदी यांचं वर्णन कऱण्याचा मोह अनेकांना आवरत नाही, नेमाडेंनी मात्र तो प्रकर्षानं टाळलाय आणि तरीही नेमाडेंचा पाकिस्तान अमृता प्रीतम, गुलजार, सआदत हसन मंटो यांच्या कथा कादंबऱ्यात दिसलेल्या पाकिस्तान एवढाच परिपूर्ण आहे.
हिंदूतली तिरोनी आत्या जर कोसलातल्या मनुची आठवण करून देत असेल तर हिंदूतलं धनजी बुवाचं मडकं कशाचं आठवण करून देतं? जी.ए. कुलकर्णींच्या राधीची की कोसलात गायब झालेल्या गिरधरची? शेवटच्या वेळेस त्यानं चल म्हणाला तर जायला हवं होतं त्यानं आपल्याला त्याच्या आयुष्यातलं काही तरी भयंकर सांगितलं असतं अशी खंत कोसलात पांडुरंग सांगवीकर शेवटी व्यक्त करतो. त्यानंतर आपण आयुष्यभर गिरधरनं काय सांगितलं असतं या भोवऱ्यात सापडतो. तोच भोवरा हिंदूत दिसतो तो धनजी बुवाच्या मडक्यात.
धनजी बुवाच्या मडक्याचा प्रसंग वाचल्यानंतर मी पुढं नाही वाचू शकलो. पुस्तकात खून केली आणि ठेवून दिलं. कुणाशीच न बोलता तसाच अंधारात बराच काळ पडून राहिलो. कुणाशी बोलण्याची वासनाच नाही राहिली. असं का झालं? धनजीबुवानं जे दु:ख अनुभवलं जे नेमाडे इतकीवर्ष अश्वथ्थाम्याच्या जखमेसारखं स्वत:बरोबर घेऊन फिरले असतील, ते दु:ख आपल्याला सांगून नेमाडेंची मुक्तता झाली असेलही कदाचित. पण आपण त्या भोवऱ्यात कायमचे अडकलो त्याचं काय?
धनजीबुवाचा प्रसंग उणापुरा पाटपोट पाणाभराचा. पण तो एक प्रसंग काय सांगत नाही? आपली अवस्था धनजीसारखी नाही कशावरून? घरदार,शिवार सोडून पैसा कमवण्यासाठी देशोदेशी आपण काय उगीचच मनोरंजन म्हणून भटकतोय? किती काळ? अनंत पिढ्यांची ही साखळी? धनजीला जसं वाटलं की छनछन कलदार चांदीचा आवाज म्हणजे सगळ्या जगावर हुकूमत गाजवता येण्याचा आत्मविश्वास तसं आपल्याला वाटत नाही? असे आपण एकटेच आहोत की ही न संपणारी लाल मुंग्यांची जमात? आपण एकटेच असतो तर मग वास्को द गामा भारतात आला असता का आणि कोलंबसला अमेरिकेचा शोध लागला असता? लाखो लोक एकमेकांच्या घामाचा वास घेत शंभर एक किलोमीटर एकमेकांच्या तंगड्यात तंगडे टाकून मुंबईच्या लोकलमधून काय पर्यटनासाठी ये जा करतात? संध्याकाळी घरी परतल्यानंतर त्यांना धनजीसारखा नोटांचा आवाज न येताच ते सुखानं झोपत असतील? धनजीनं शेवटी स्वत: जवळचे सगळे रूपये मडक्याच्या आत टाकून मधूर प्रतिध्वनी ऐकण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस त्याला काय सापडलं? पोकळी. सकाळी घराबाहेर पडणाऱ्या माणसाला आज काय सापडतं पोकळीच ना? जसा धनजी अनंत वर्षाचा तळ पाहात राह्यला तसेच आपणही कित्येक ना? शेवटी ते पाहण्यातच धनजी गुदमरला आणि मडकं त्याच्या मुंडक्याला तसंच राह्यलं. खरं तर तो एकदाचा सुटला. आपला तर रोजच धनजी होतो त्याचं काय? दररोज मरण्याचा आपल्याला शाप नेमक्या कुठल्या जन्मात मिळाला असेल? नेमाडे शेवटी म्हणतातही, खंडेराव, ह्या आकाशाच्या पोकळीत तूही तसाच तोंड खुपसून पाहतो आहेस. हे तेच मडकं आहे.
नेमाडेंची हीच गोष्ट सआदत हसन मंटोच्या ‘टोबा टेक सिंह’ची आठवण करून देते. टोबा टेक सिंह आणि धनजी बुवा म्हणजे तळ न सापडलेल्या कोट्यावधी लोकांच्या जगण्याचं प्रतीक.
हिंदू ही स्थलांतरीतांची कादंबरी आहे. खुद्द हिंदूचा नायक हा एका प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशात जाणारा तिथल्या सामाजिक, सांस्कृतिक कोलाजच्या प्रेमात पडणारा. एवढंच नाही तर एका प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशात स्थिरावणाऱ्या माणसांमुळेच मुळच्या समाजाचा विकास होतो, त्यांच्या जगण्याची श्रीमंती वाढते असा वैश्विक संदेश देणारा आहे, भलेही त्यात संघर्ष असेल. हिंदूत ‘ग्रेट मायग्रेशन’ मांडताना नेमाडेंनी जी सकलेच्या मारवाड्याची गोष्ट सांगितलीय ती वैश्विक आहे. एवढंच नाही तर शेतकऱ्याच्या दारिद्र्याचं मुळ शेतीतच असल्याचं वास्तवही मांडते. दारीद्र्यातून मुक्त व्हायचं असेल तर शेतीतून बाहेर पडा असं सांगणाऱ्या शरद जोशींच्या शेतकरी आंदोलनाची आठवणही हिंदू वाचताना होते. बहुजन ‘भारता’तच का राहिले आणि ब्राम्हण,मारवाडी असे समाज ‘इंडिया’चे कसे झाले याचा विस्तीर्ण पट नेमाडेंनी सकलेच्या मारवाड्याच्या गोष्टीतून मांडलाय.
सकलेच्या मारवाड्याची गोष्ट एवढी चांगली आहे की आपण आपसुकच नेमाडेंना दाद देऊन जातो. सुकलाल हा खंडेरावचा लहानपणीचा दोस्त. सुकलालच्या आजोबांना खंडेरावच्या आजोबांनी मारवाडहून स्वयंपाकी म्हणून घेऊन आले. त्यावेळेस सुकलालचे आजोबा स्वयंपाकी होते तर खंडेरावच्या आजोबांची पत काशीला सोन्याची मांजर अर्पण करण्याची. आता त्यांच्याच पुढच्या पिढ्यांची स्थिती काय आहे? खंडेराव २०० रूपये महिना पगाराची नोकरी शोधतोय तर सुकलाल आणि त्याचे पाच काका जळगावच्या शंभर कोटीच्या व्यापाराचे मालक आहेत. हे कसं झालं?
एकदा सुकलाल दुकानावर बसलेला. त्याचे वडिलही दुकानात आहेत. त्यावेळेस तिथं एक दारूडा येतो आणि खजुरला राकेलचा वास असल्याचं सांगत शिवीगाळ सुरु करतो. सुकलालचे वडील त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न करतात. पण दारूड्याची शिवीगाळ सुरुच राहते. काही वेळानं दारूडा निघून जातो. त्यावेळेस सुकलाल वडिलांना संतापून म्हणतो, काय ऐकून घेता नानाजी? किती शिव्या दिल्या त्यानं? त्यावेळेस सुकलालचे वडील त्याला म्हणतात, काही तरी देऊनच गेला नं? घेऊन तर गेला नाही नं? कुछ देकं ही गया नं? लेकं तो कुछ नही गया नं? खुशी राख्यो. खुशी महत्वाची.
काहीच टाकाऊ न समजणारा समाज कसा समृद्ध होत जातो आणि त्यातूनच समृद्ध सांस्कृतिक अडगळ कशी तयार होते हे सांगायला सकलेचा मारवाड्याचा प्रसंग पुरेसा आहे.
भौतिकदृष्ट्या विकसित असलेल्या किंवा पैसा असलेल्या समाजाचा समाचार घेणारी काही गृहीतकं फार प्रेमानं पूर्वापार बाळगली जातात. मग त्यात ब्राम्हण आहेत मराठा आहेत आणि मुसलमानही. मारवाडी बायकाही त्यातून सुटलेल्या नाहीत आणि पुरूषही. पण गृहीतकं कुठल्या गर्भाशयात जन्माला येतात? नेमाडेंनी तेही शोधलंय. सुकलालच्या पाचही काकांच्या बायका राजस्थानातल्या. सारख्या दिसणाऱ्या. एकत्र कुटुंब पद्धती. एकाच घरात पाच जणांच्या पाच झोपायच्या खोल्या. रात्री जेवणं झाल्यावर सगळेच जण दिवसभराचा हिशेब करत बसायचे आणि नंतर एक एक जण खोलीत जाऊन झोपायचा. एकदा धाकटा नथूमल चुकून मधल्याच खोलीत शिरून झोपला. त्यामुळे नंतर आलेले सगळेच असेच चुकीच्या खोलीत झोपले. सकाळी हे सगळं उघड झालं पण व्हायची ती गोष्ट होऊन गेलेली. नंतर ही गोष्ट गावभर झाली. मग काय मारवाड्याच्या सारख्या दिसणाऱ्या पोरांना गावातल्या बायका बोलवायच्या आणि कुणाचा रे तू म्हणून विचारायच्या. त्यानं बापाचं नाव सांगितलं की पोट धरून हसायच्या.
हसायच्या शब्दानंतर कुठलाही फापट पसारा न मांडता नेमाडेंनी फक्त एक शब्द लिहिलाय. ‘धनमत्सर’ आणि पूर्णविराम दिलाय. मारवाड्यांना विशेषत: बायकांना एका शब्दात नेमाडेंनी संशयमुक्त केलंय.
अशा कित्येक गोष्टी नेमाडेंनी हिंदूत सहजपणे सांगितलेल्या आहेत. पण हिंदूचं मोठेपण नेमाडेंनी सांगितलेल्या गोष्टीत नाही. ते उत्तम गोष्टी सांगतात हे कोसला, बिढार, झूल, जरीला या त्यांच्या कादंबऱ्यांनी अगोदरच सिद्ध केलंय. हिंदूची संपत्ती आहे ती नेमाडेंनी हिंदूत जीवंत केलेल्या बायका.
मी उद्धव शेळकेंची ‘धग’ वाचलीय. एक कलाकृती म्हणून ती कोसलापेक्षा कितीतरी पटीनं सरस आहे. पण शेळकेंनी धगमध्ये जी कौतिक उभी केलीय तिची सर अजून तरी कुणाला नाही. शेषराव मोहितेंच्या ‘ असं जगणं तोलाचं ’ मधल्या धुरपा, कासा आणि आनंद यादवांच्या झोंबीतली तारा, रा.रं. बोराडेंच्या पाचोळ्यातली ‘ पार्बती ’ या काही इतर नायिका ज्या कौतिकच्या परिघरात उभ्या राहतात पण ‘ कौतिक ’ होत नाहीत.
नेमाडेंच्या हिंदूत नेमक्या किती बायका येतात आणि जातात हे लक्षात ठेवणं अवघड आहे. पण एका वाक्यापुरता जीव असूनही त्या आपल्या जगण्यात खड्डा पाडतात जो बुजणं अवघड आहे. मग ती खंडेरावची आई असो की आजी-पणजी. एवढंच नाही तर बिजा, छबा, सुभी, आंधळी काकू, धाकटी शशी, मुकी काकी, बायडी, तायडी अशा एक ना अनेक. धनाबय महारीण, सोनफुई चांभारीण, अंबू मांगीणमाय अशी काही पात्रं तर फक्त उल्लेखापुरतीच येतात आणि अडगळीत पडलेल्या एक जगाचा कवडसा दाखवतात पण तेवढ्याशा उजेडानंही आपल्या जगण्यावर सावली पडते.
विशेष म्हणजे कौतिक, धुरपा, कासा, पार्बती आणि हिंदूतल्या बायकांचं जगणं हे एकाच जातकुळीतलं आहे. हिंदूतल्या बायकांचं जग पुरूषप्रधान संस्कृतीच्या गराड्यात बायका कुठल्या स्तरापर्यंत पिचल्या जातात, शोषल्या जातात याचं ज्वलंत चित्रं उभं करतं.
याच पार्श्वभूमीवर नेमाडेंनी मंडीचं पात्र उभं केलंय. डॉ. मंडी ही संशोधनासाठी लंडनहून आलेली स्कॉलर. संशोधनासाठी तिनं नवऱ्यालाही घटस्फोट दिलाय. लभाणी बायकांची परंपरा ऐकूण ती मोरगावला येते. झेंडीच्या प्रणयनितान्ततेचे रहस्य शोधून काढण्याचा प्रयत्न करते. मंडीचे संशोधकी उद्योग उभे करतानाच भारतीय बायकांची मुक्ती कशात आहे ते नेमाडेंनी भावडूच्या पत्रातून दाखवलंय. ह्या विदुषी बाईमुळेच मला कळलं की, लैंगिकदृष्ट्या मुक्त झाल्याशिवाय असा निधडेपणा बायकांना येणार नाही. बस. बाकी दुसरं काही नाही. मुक्त ह्या संस्कृत शब्दाऐवजी आपला देशी शब्द मोकाटच ह्या संदर्भात वापरला पाहिजे. बस. तेवढं एक झालं की आपल्या मुली सुधारल्याच समज. नेमाडेंनी स्त्री मुक्तीची मांडलेली ही भूमिका काही पहिल्यांदा आलेली नाही पण त्यांनी ज्या पद्धतीनं ती हिंदूत पेरलीय ती एक सहजप्रक्रिया वाटते आणि म्हणूनच पटतेही.
मराठ्यांनी देशभर बाळगलेली पेंढारी संस्कृती, लभाणी बायकांचा बेधडक आणि जगण्याचा बेधुंदपणा, झेंडी गणिकेची गोष्ट, वारा, गजरा , इरदत्नी, आवंती, हरखू, खरखोती या लभाणी बायकांच्या गोष्ट सांगताना उभ्या राहिलेल्या काळानं आपला सांस्कृतिक परिघ दिर्घ होतो. ज्या काळात ‘एकेरी’ सांस्कृतिक चळवळीचे आवाज ऐकायला मिळतायत त्यावेळेस हिंदूतला हा व्यामिश्र सांस्कृतिक पट समृद्धतेचा संदेश देतो. एवढंच नाही तर इतिहासाच्या पुस्तकातून ही संस्कृती पिढ्यानपिढ्या दूर ठेवून आपण काय मिळवलंय हे समजत नाही.
नेमाडेंच्या लिखाणाची एक पद्धत आहे. हिंदूत शेकडो स्त्री-पुरूष पात्रं येतात. त्यातलं कोण कुणास बोलतंय हे नेमाडेंनी कुठंही लिहिलेलं नाही. तरीही कोण कुणास बोलतंय हे स्पष्टपणे कळतंय. नेमाडे कधीही पात्रं उभी करण्याच्या भानगडीत पडत नाहीत. त्यामुळे पात्रं एखाद्या वस्तुसारखे अंगावर येऊन कोसळतात. कधी कधी त्यांची एवढी गर्दी होते की आपल्याला दोन ओळीच्या पूर्वी कोण भेटलं होतं आणि आता कोण भेटतंय हेच कळत नाही. आपण एखाद्या चेंगराचेंगरीत तर सापडत नाहीत ना असं होऊन जातं पण ते आपल्या अनुभूतीचा आनंद हिरावत नाहीत हेही तितकच खरं.
आणखी एक गोष्ट हिंदूत प्रत्येक पानावर आहे. ती म्हणजे भन्नाटपणे केलेले भाष्य. ऐतखाऊ नागरी समाज आधीच स्वत:च्या आतल्या हिंसेच्या भुसभुशीत पायावर उभा असतो किंवा ज्या शोधाला वेड्यात काढलं नाही त्या शोधाचं भविष्य धोक्यात असतं किंवा मनापासून कोणालाच वाटत नाही की आपलं नशीब पुन्हा झोपावं. एकदा लाथ मारलेलं नशीब पूर्ण सूड उगवूनच तुमच्याबरोबर कबरीत झोपी जाईल. किंवा आलेला दिवस का मुक्कामाला असतो अशा वाक्यांचं संकलन केलं तरी ते काही पानांचं वेगळं पुस्तक तयार होईल. विशेष म्हणजे नेमाडेंची अशी वाक्य टाकण्याची प्रकृती नाही. कोसला, बिढार, जरीला, झूल, हूल या कादंबऱ्यांमध्ये एखादा प्रसंग आल्यानंतर प्रसंगाची गरज म्हणून काही वाक्य आलेले आहेत पण नेमाडेंचा नायक मग तो पांडुरंग सांगवीकर असो की चांगदेव पाटील हा फक्त ‘ बघ्या ’ राहिलेला आहे. हिंदूचा खंडेराव मात्र सक्रिय झालाय. त्यामुळेच नेमाडेंच्या आतला तत्वेत्ता हिंदूत जागा झालेला दिसतो.
हिंदूतलं स्थलांतर स्थिरावलेलंही दिसतं. अनेक लहान मोठ्या जमातींचं वास्तव चित्र नेमाडे रेखाटतात. त्यामुळे हिंदूची वीण बहुरंगी झालीय. गावाकडे अजुनही गोधडी शिवली जातात. त्या गोधडीला घरात पडलेल्या धोतराचं पातही जोडलेलं असतं आणि लहानग्याच्या चड्डीचा खिसाही. दोरा वापरला जातो तोही वेगवेगळ्या रंगांचा. मिळेल तसा. त्यामुळे गोधडी बहुरंगी, बहुढंगी दिसते. भिल्ल, लभाणी, पावरा, नाईक, कोरकू, तडवी, धनगर, अशा किती तरी जमाती हिंदूत पसरलेल्या आहेत. त्यामुळे हिंदूही बहुरंगी, बहुढंगी झालीय. त्या त्या जमाती शिवताना नेमाडेंनी त्याच जमातीतल्या शब्दांचा दोऱ्यासारखा वापर केलाय. त्यामुळे तथाकथित प्रमाण भाषेत नसलेले शेकडो शब्द हिंदूत जागोजागी सापडतात. उदाहरणार्थ अधोडी, बिंदल्या, करगोटी, उदाशी, बन, उंडगी, काळमुखं, कटप, वैरणं, पाखडणं, भड, असे शेकडो शब्द. या शब्दांनी फक्त हिंदूच श्रीमंत झालीय असं नाही तर मराठी भाषेचं भांडारही वाढलंय. नेमाडेंचं हे योगदान कसं नाकारता येईल?
एक गोष्ट खरी की पाना पानावर रूढ अर्थानं वापरात नसलेले अनेक शब्द येत असल्यानं त्यांची प्रतिमा आपल्या मेंदूत चमकत नाही. त्यामुळे काही वेळेस हिंदू आपल्याला धाप लावते. एका कादंबरीकारावर एक संशोधक भारी पडला की काय अशीही शंका येत राहते. पण काय सांगता येईल तशा प्रतिमांच्याच शोधात एक दिवस एखादी पिढी निघेल ज्यावेळेस नेमाडेंची हिंदू त्यांचं ‘ बायबल ’ होईल. ‘हिंदू’ मराठीतून गेलेल्या किंवा लोप पावत असलेल्या किंवा परिचीत नसलेल्या अशा हजारो शब्दांची डिक्शनरी आहे.
हिंदूच्या पसाऱ्यानं सहा प्रकरणं व्यापलीयत. यातलं पाचवं प्रकरण ११८ पानांचं आहे. पहिली चार प्रकरणं म्हणजे नेमाडेंच्या चार अभिजात कादंबऱ्या. सहावं प्रकरणही क्लासिक ज्यात खंडेरावच्या बापाचा अंत्यसंस्कार होतोय. तो फार धगधगीत आहे. पाचवं प्रकरण म्हणजे नेमाडेंचा राम गोपाल वर्मा कसा झाला याचं उदाहरण. राम गोपाल वर्मानं ‘ सत्या ’सारखा एक अभिजात सिनेमा तयार केला आणि नंतर तो वेगवेगळ्या नावानं स्वत:च्याच सिनेमाचं रिमेक करत सुटला. परिणाम आपल्यासमोर आहे.
नेमाडेंच्या कोसलात एक मोठा ट्रॅप आहे. खरं तर तो ट्रॅप बिढार, झूल, जरीला यांच्यातही आहे ज्यात अनेक चांगल्या मराठी कादंबरीकारांचे बळी गेले.
तो ट्रॅप असा की नायक कॉलेजात शिकणारा असेल तर त्याचे कॉलेजचे किस्से रंगवायचे आणि तो कॉलेजात शिकवणारा असेल तर सहकाऱ्यांचे किस्से रंगवायचे. पण कोसला अभिजात झाली ती पांडुरंग सांगवीकरच्या भन्नाट जगण्यानं त्याच्यासोबत मनूसारख्या गोष्टी सांगितल्यानं. जरीला, झूल, बिढार, हूल यांच्यातही नेमाडेंनी तोच धागा कायम ठेवलाय पण नेमाडेंनी चारही कादंबऱ्यांमधून जो समाज चितारलाय त्यानं नेमाडेंना फक्त मराठीतलेच नाही तर भारतीय भाषांमधल्या सर्वोत्तम कादंबरीकारांच्या पंगतीत बसवलं. नेमाडेंच्या याच फॉरमॅटचा मोह कित्येक कादंबरीकारांना आवरता आला नाही. मग त्यात राजन गवसची ‘कळप’ अडकली, शेषराव मोहितेंची ‘ धूळपेरणी ’ सापडली आणि कमलेश वालावलकरच्या ‘ बाकी शून्या ’च्या शेवटी फक्त शून्य राहिले.
नेमाडे ज्यांनी ज्यांनी वाचला आणि नंतर जे जे लिहिते झाले त्यापैकी फार थोडे नेमाडेंच्या गारूडातून मुक्त होऊन स्वत: चं लिहू शकले. खरं तर चाळीशीपर्यंत कुठलाही कलाकार अभिजात निर्मिती करतो आणि नंतर तो पहिल्याचं कॉपी करत जातो. खुद्द नेमाडेही त्यातून सुटले नाहीत याचं उदाहरण म्हणजे पाचवं प्रकरण. हे प्रकरण रटाळ आहे, वाचलं जाऊ शकत नाही, नेमाडेंनी लिहिलंय म्हणूनही नाही. ते पुढच्या आवृत्तीत शक्य असेल तर काढून टाकावं एवढं ते टाकाऊ आहे.
ज्या वेळेस एखाद्या दोन पानाचं ललित लिहायचं असतं त्यावेळेस ते कसंही शब्दबद्ध केलं तरी चालतं. कारण वाचणाऱ्याला माहित असतं आपल्याला फक्त दोनंच पानं वाचायचीयत त्यामुळे तो सहज वाचून जातो. पण ज्यावेळेस सहाशे पानांपेक्षा जास्त पसारा मांडायचाय त्यावेळेस त्याला एक सांगाडा लागतो. कान, नाक, डोळे, हात पाय असं सगळं लागतं. एवढंच नाही तर ते सगळं जिथल्या तिथं लागतं आणि तेही व्यवस्थित तरच एक चांगला जीव तयार होतो.
वाचनीयता ही कुठल्याही पुस्तकाची पहिली अट आहे. मला जे काही हिंदूबद्दल एक वाचक म्हणून वाटलं ते मी लिहिण्याचा प्रयत्न केलाय. एखादी कादंबरी मला अनेक आयुष्य जगण्याचा अनुभव देतं का एवढी एक माफक फुटपट्टी लावून मी वाचत जातो. सॉमरसेटला मी वाचत गेलो कारण त्यानं मला ‘द मून अँड सिक्सपेन्स’मध्ये चार्ल्स स्ट्रीकलंडच्या रूपानं अकल्पीत व्यक्तीचं आयुष्य जगण्याचा अनुभव दिला. नंतर मग मी त्याची द पेन्टेड वेईल, द समिंग अप ही पुस्तकही झपाटल्यासारखी वाचली. संथ समुद्रात दूरवर प्रवास करून आल्यासारखं वाटलं. हिंदूनंही मला असेच अनेक आयुष्य जगण्याचा अनुभव दिला. कादंबरी लिहिण्याचे तीन नियम आहेत आणि दुर्देवानं ते कुणालाही माहित नसल्याचं सॉमरसेट म्हणतो. हिंदू फसली असं म्हणणारे, किंवा त्यात शिव्या भरपूर दिलेल्या आहेत असं म्हणणारे किंवा यात बौद्धांचं असं झालं, रामाचं असं नव्हतंच अशी हाकाटी पेटणारे स्वत:च्या वर्षानुवर्ष तयार असलेल्या चौकटांमध्ये हिंदूला बसवण्याचा प्रयत्न करतायत जेव्हा की हिंदू कुठल्याच चौकटीत न बसणारी एकमेव मराठी कादंबरी आहे.

No comments:

Post a Comment