घटना नऊ वर्षापूर्वीची.... तरीही श्वासाइतकी ती आयुष्यात ठळक आहे. जून महिना होता. पावसाळी ढगं दाटून यायची. पडायला लागला की धो धो पाऊस पडायचा, नसेल तर काळी ढगं फक्त दाटलेली. मी त्या दिवशी गावाकडून लातूरला पोहोचलो, ते अशाच एका काळवंडलेल्या दिवशी. तारीख 21 जून 2001. हॉस्टेलला पोहोचलो तेव्हा भिजलेला होतो. दार काढत असतानाच मी शिवाची चौकशी केली. कारण मला गिरीशची काळजी वाटत होती. कुणी तरी सांगितलं शिवाच्या भावानं सुसाईड केली. माझ्या अंगावर अक्षरश: वीज कोसळली. बाहेर कोसळणाऱ्या पावसाचा आवाज अचानक जाणवेनासा झाला. ज्याची भीती होती ते आता वास्तव होतं.
काही वेळापूर्वी धो धो कोसळणारा पाऊस अचानक थिजला. काळवंडलेली ढगं अधिक गडद झाली. मी शिवाचं घर गाठलं. गिरीशचा मृतदेह जिथं पुरला होता तिथं लालभडक कुंकू पडलेलं होतं. माझा विश्वासच बसेना, पुढच्या भेटीत हेमंतकुमारचं ‘ना तुम हमे जानो’ ऐकवतो म्हणणारा गिरीश आता कायमचा मुका झालाय. का?
माणसांची स्वप्नं माणसाला मुकी बनवतात. गेल्या महिन्यात गावचे ग्रामसेवक भेटले. फार ओळख नाही. परेशानीत होते. मला ते जाणवलं. त्यांना काही तरी बोलायचं असावं पण माझ्या सोबत मित्र असल्यामुळे ते बोलत नव्हते. काहीवेळानं मित्र गेले ग्रामसेवक बोलते झाले. त्यांचा मुलगा बारावीला आहे. अहमदपूरला. गेल्या काही महिन्यातल्या टेस्टमध्ये त्याचे मार्कस् पासिंगचे सुद्धा नाहीत. चिंता वाटणं साहजिक होतं. अपेक्षा मोठ्या आणि वास्तव भयंकर. मी मुलाची चौकशी केली. दहावीला मुलाला चांगले मार्कस् होते. त्यामुळे सायन्स घेतलं. अकरावीला प्रगती चांगली होती. पण अचानक बारावीच्या उत्तरार्धात मात्र घसरण. मुलासाठी घर अहमदपूरला ठेवलेलं. स्वतःची नोकरी दुसऱ्याच गावी. दुसरा मुलगा आणि मुलगी तिसऱ्याच गावी. तेही शिक्षणासाठी. पण लक्ष्य बारावीच्या मुलावर... कारण तो डॉक्टरकीचं स्वप्न पूर्ण करेल असा विश्वास. पण त्या विश्वासाला आता तडे जातायत. ज्या एका आशेवर सगळं आयुष्य पणाला लावावं त्याचा अंत होतोय. मुलांच्या शिक्षणासाठी वेगवेगळ्या ठिकाणी मांडलेलं बिऱ्हाड आता काय कामाचं? असा उद्विग्न सवाल ग्रामसेवक विचारतायत. पण दोष कुणाचा स्वच्छंद आयुष्य जगू पाहणाऱ्या मुलाचा की अपेक्षा ठेवणाऱ्या बापाचा?
मुलींचं जीवन वडीलांकडे झुकलेलं असतं. पण ते किती झुकावं? मी गेल्या आठवड्यात एका मुलीला भेटलो. तीही १२ वीला. तास दिड तास आमची चर्चा सुरु होती. तिचं कॉलेज. तिच्या मैत्रीणी. तिचे छंद. आई-वडील याबाबत ती भरभरून बोलत होती. तिच्या बोलण्यात आत्मविश्वास होता पण टोकदारपणाही होता. ते ऐकताना मात्र भीती वाटत होती. सिनेमाला कधी गेलीस का? ती म्हणाली, नाही. कारण पप्पा जाऊ देत नाहीत. कॉलेजमध्ये मित्र आहेत का? नाहीत. कारण पप्पाला आवडत नाही. घरी टी.व्हीवर काय बघायचं कोण ठरवतं? पप्पा. आई आवडते का? नाही. आई साक्षात समोर उभी असतानाही मुलीचं हे उत्तर. बाहेर कधी फिरायला जाते का? नाही. पप्पांनी सांगितलंय जायचं नाही. मग ते फायनल. आयुष्यातलं स्वप्न काय? पप्पांना आनंद होईल असं काही तरी करायंच. पण ते नेमकं काय? सीए. स्वप्न मोठं आहे पण सिनेमाला जायचं की नाही याचं स्वातंत्र्य नसलेली मुलगी सीए होणार कशी? नाही झाली तर पुन्हा स्वप्नांचा चुराडा. आयुष्य ओझं नाही वाटणार का?
अशाच कुठल्या तरी ओझ्यानं गेल्या आठवड्याभरात पाच जणांचा जीव संपवलाय. त्यात तीन शाळकरी मुलं आहेत, तर दोन इंजिनीअरिंगच्या मुली. गिरीशही याच साखळीतला होता. घुसमट झाली आणि त्यानं स्वत:ला संपवलं. गिरीश उत्तम स्केचिंग करायचा. रंगरेषा हा त्याचा श्वास. घरात वातावरण मात्र घुसमटीचं. वडील कडक शिस्तीचे. संघाचे कार्यकर्ते. त्यांच्या घरात मी कधी कुणी उंच आवाजात बोलल्याचं ऐकलं नाही. गिरीश नेमका उलटा. तो मुंबईत राहिला. काही काळ कोल्हापुरातही होता. गोव्यातही फिरून आला. तो स्वच्छंद होता. हेमंतकुमार त्याचा आवडता गायक. घरच्यांनी त्याच्यावर बळजबरी केली. लग्न मनाविरोधातच लावून दिलं. तो काही फार समाधानी नव्हता. त्याला रंगरेषांशिवाय फारसं काही आयुष्य नसावं. त्याला व्हेनिसमध्ये जाऊन चित्रं रंगवायची होती. पिकासोबाबत तो भरभरून बोलायचा. त्याचं पेंटिंगप्रेम घरच्यांना आवडलं नाही. पेंटिंगचं सामान घरचे लपवून ठेवतात, असं तो मला एकदा म्हणाला होता. अखेर त्याच्या डोक्यावर परिणाम झाला. त्याला वेड लागलं. त्यातच त्यानं सुसाईड केली.
माणूस आत्महत्या कधी करतो? मी दहावीला होतो, अहमदपूरला. 95 साल असावं. त्यावेळेस महाराष्ट्रातल्या सर्वोत्तम शाळांपैकी माझी शाळा होती यशवंत विद्यालय. आमची तुकडी हुशार मुलांची म्हणजे या तुकडीतले मुलं मेरिटमध्ये येणार असं गृहीत धरलेलं. त्यादिवशी निकाल लागला. बोर्डावर निकाल लावलेला होता. मेरिटला आलेल्यांचं फोटोसेशन सुरु होतं. सगळीकडे आनंदी वातावरण. मी मेरिटचा विद्यार्थी नाही, नव्हतो. मी बोर्डावरची पहिली लिस्ट बघितली. माझ नावच नको. काळजाचा ठोका चुकला. मी दुसरी लिस्ट बघितली, तिसरी बघितली माझं नाव सगळीकडून गायब. काळजाच्या ठोक्यांनी धोक्याची पातळी ओलांडी. पाय थरथर कापायला लागले. आपल्या बापानं आपल्याला चौथीपासून शिक्षणासाठी काय काय उद्योग करून बाहेर ठेवलं, ते सगळे प्रसंग डोळ्यात जमा व्हायला लागले. मी माझं नाव शोधत होतो आणि ते सापडत नव्हतं. तसा घसाही कोरडा पडायला लागला. तितक्यात कुणीतरी म्हणालं, नापासांची नाव लावत नसतात. आभाळच कोसळलं. आता काय करायचं ? नापास होऊन घरच्यांना तोंड दाखवण्यापेक्षा मेलेलं बरं. विचार डोक्यात घोळायला लागला. मी तसाच आपल्याला कुणी बघणार नाही, याची काळजी घेत शाळेच्या गेटकडे निघालो. त्याचवेळी साबळे सरांनी मला हटकलं. ते इतिहास शिकवायचे. मला शब्दच फुटेना. त्यांना माझी अडचण समजली. मी नापास झालोय असं म्हणालो. त्यांचा विश्वासच बसेना. ते म्हणाले असं कसं होईल? त्यांनी मला परत शाळेत नेलं. बोर्डाकडे गेलो. नाव शोधलं, नाव नव्हतं. साबळे सरांनी ऑफिसात नेलं. तिथं निकाल बघितला. मी पास झालो होतो. मार्कसही चांगले होते. मी पुन्हा पुन्हा खात्री करून घेतली. साबळे सरांनी बोर्डावर पुन्हा चाचपणी केली तर तिथली एक लिस्टच कुणीतरी गायब केली होती. जिच्यावर माझं नाव होतं. माझ्या शरीरात पुन्हा जीव आला. आपल्या डोक्यात आत्महत्येचा आलेला विचार मला हास्यास्पद वाटला. पण साबळे सर जर मला त्यावेळी भेटले नसते तर? गिरीशला स्वातंत्र्य हवं होतं. आयुष्यात धुकं जमा होतंय असं वाटत असताना पिकासोबद्दल बोलणारा कुणी तरी. मुलांना ‘काय झालं रे’ म्हणून सहज विचारपूस करणारे साबळे सर. मृत्यू चुकला असता की नाही माहिती नाही पण क्षण कदाचित चुकला असता. नेमाडेंच्या कोसलातली शेवटची वाक्य त्यासाठी समर्पक. “शेवटच्या वेळी तो म्हणाला, चल तर मी जायला पाहिजे होतं. त्यानं काही तरी प्रचंड आपल्याला सांगितलं असतं. अशी माणसं आपल्या जवळून जातात पण आपल्याला त्यांची किंमत कळत नाही. आपल्या आयुष्यातही वैताग आहेच पण वांझोटा. ज्या प्रमाणे घरात दिवा असला की खिडक्यातून दारातून झरोक्यातून उजेड दिसतो आणि आपल्याला कळतं घरात दिवा आहे. त्याप्रमाणे प्रत्येक थोर माणसाच्या वागण्यातून बोलण्या-चालण्यातून असा उजेड दिसलाच पाहिजे, नाही तर त्या घरात दिवा नाही. तो माणूस भंपक.”
No comments:
Post a Comment